रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद यांच्या समवेत सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. आनंदकाकूंच्या मैत्रीपूर्ण वागण्याने आश्रमात आल्यावर आश्रम जीवनातील आरंभीचा संघर्ष सुसह्य होणे
वर्ष २००६ मध्ये मी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले. आरंभी आश्रमजीवन स्वीकारण्यासाठी माझ्या मनाचा संघर्ष होत होता. त्या वेळी आनंदकाकू प्रतिदिन सकाळी मडगाव येथून आश्रमात यायच्या. आम्ही दोघी ग्रंथांशी संबंधित सेवा करत होतो. त्यांचे निर्मळ हास्य पाहून मला हलके वाटून मी त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलत असे. त्या माझ्यासाठी आणि अन्य साधकांसाठी घरून खाऊ आणायच्या. एकदा त्या मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या आणि त्यांनी माझ्या आवडीचे पदार्थ मला खाऊ घातले. माझी आनंदकाकूंशी मैत्री झाल्यामुळे माझ्या आश्रमजीवनातील आरंभीचा संघर्ष सुसह्य झाला.
२. मितभाषी आणि नम्र
काकू मितभाषी होत्या. त्या प्रत्येकाशी नम्रतेने बोलायच्या. त्या कधीही रागावून बोलल्याचे मला आठवत नाही. त्या खोलीतील सहसाधिकांच्या चुका शांतपणे आणि नम्रतेने सांगायच्या.
३. व्यवस्थितपणा
मी काही मास काकूंच्या खोलीत रहात होते. त्या खोलीतील साहित्य आणि कप्पे व्यवस्थित ठेवायच्या.
४. शिवणकलेत निपुण
त्यांनी ध्यानमंदिरातील देवतांच्या चित्रांखाली आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राखाली ठेवायच्या वस्त्रांची निवड अभ्यासपूर्ण केली होती. त्यांनी त्या वस्त्रांची शिलाई चांगली आणि नावीन्यपूर्ण केली होती.
५. मुलींना साधनेत साहाय्य करणे
काकूंच्या दोन्ही मुली (सौ. शौर्या सुनील मेहता, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के आणि सुश्री (कु.) दीपिका आनंद, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) पूर्णवेळ सेवा करतात. मुलींकडून सेवा व्हावी; म्हणून काकू घरी राहून घरातील सर्व कामे करायच्या. त्यांनी त्याविषयी कधीही गार्हाणे केले नाही.
६. इतरांचा विचार करणे
त्या मागील २ वर्षांपासून रुग्णाईत होत्या. त्यांना चालणेही कठीण होत होते, तरीही त्या आश्रमात आल्यावर स्वतःची कामे स्वतः करायच्या. त्यांना थोडे बरे वाटले की, त्या भोजनकक्षात जाऊन महाप्रसाद ग्रहण करायच्या. ‘अन्य साधकांनी त्यांच्या सेवेचा वेळ आपल्यासाठी देऊ नये’, असे त्यांना वाटायचे.
‘परात्पर गुरुदेवांनी मला निर्मळ मनाच्या आणि प्रेमळ आनंदकाकूंच्या समवेत रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी दिली’, याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. देवी प्रताप कापडिया (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२२)