१. प्रीती
१ अ. प्रथम भेटीतच साधिकेवर प्रीतीचा वर्षाव करणार्या पू. मराठेआजी ! : ‘वर्ष २०१० मध्ये एकदा मी कार्यालयातून घरी येतांना पाहिले की, घराजवळील एका दुकानाबाहेर एक आजी सनातनचे भित्तीफलक लावत होत्या. आजींची या वयातील तळमळ पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. आजींजवळ जाऊन मी त्यांना सांगितले, ‘‘मीही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करते अन् या भागातच रहाते.’’ ते ऐकून त्यांनी मला जवळ घेऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझी प्रेमाने विचारपूस केली. अशा पद्धतीने पू. मराठेआजींशी माझी पहिली भेट झाली. त्या दिवसापासून पू. आजींच्या देहत्यागापर्यंत मला त्यांची प्रीती अखंड अनुभवता आली.
१ आ. साधिकेच्या मुलीच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर पू. आजींनी साधिकेची अन् तिच्या मुलीची प्रेमाने काळजी घेणे : मी गरोदर असतांना आणि माझी मुलगी कु. प्रार्थना (कु. प्रार्थना महेश पाठक, वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) हिच्या जन्मानंतर पू. आजींचा मला पुष्कळ आधार होता. त्या वेळी पू. आजी मला प्रेमाने विचारत, ‘‘बाळ लहान आहे. काही हवे आहे का ?’’ त्यांनी प्रार्थनासाठी सुंदर कुंची (लहान बाळाची टोपी) शिवली होती. त्या कुंचीकडे पाहून माझा भाव जागृत होत असे.
१ इ. साधिकेला शारीरिक त्रास होत असतांना तिची प्रेमाने विचारपूस करणे आणि ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने तू बरी होणार’, असे सांगून तिला आश्वस्त करणे : काही वर्षांपासून मला शारीरिक त्रास होत असल्याने मला पू. आजींकडे प्रत्यक्ष जाता आले नाही; परंतु भ्रमणभाषद्वारे आम्ही संपर्कात असायचो. त्या वेळीही त्या माझी प्रेमाने विचारपूस करत असत. त्या ‘प.पू. गुरुदेवांचे लक्ष आहे. तू काळजी करू नकोस. तू बरी होणार’, असे सांगून मला आश्वस्त करत असत.
२. परिस्थितीला हसतमुखाने सामोरे जाणे
पू. आजींच्या जीवनात अनेक चढउतार आले. प्रत्येक प्रसंगाला त्या हसतमुख आणि स्थिर राहून सामोर्या गेल्या. त्या आनंदाने सांगत, ‘‘गुरुदेवांचे सर्व नियोजन आहे. ते आपण स्वीकारायलाच हवे. आपले प्रारब्ध याच जन्मात भोगून संपवायला हवे.’’
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट आणि सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) विमल फडकेआजी यांच्या समवेत केलेली सेवा’, यांविषयी साधकांना सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांची भेट अन् त्यांचा सहवास यांविषयीच्या सर्व आठवणी पू. मराठेआजी आम्हाला सांगत असत. त्या सांगण्यातून ‘प.पू. गुरुदेवांची भेट झाली’, असे आम्हा साधकांना वाटत असे.
सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) विमल फडकेआजी पूर्वी पुण्यात रहात होत्या. तेव्हा त्यांनी आणि पू. मराठेआजी यांनी बरीच वर्षे एकत्रित सेवा केली होती. त्या दोघी आध्यात्मिक मैत्रिणी होत्या. प.पू. (कै.) फडकेआजींच्या समवेत केलेल्या सेवेच्या संदर्भातही पू. आजी आम्हाला सांगायच्या.
४. पू. आजींनी ‘साधिकेचे यजमान तिच्या आधी आध्यात्मिक प्रगती करतील’, असे काही वर्षांपूर्वी सांगणे आणि प्रत्यक्षातही तसेच घडणे
काही वर्षांपूर्वी पू. आजींना माझे यजमान श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांची ओळख करून देतांना मी म्हटले, ‘‘हे अजून साधनेत नाहीत. आता ते साधनेला प्रारंभ करतील.’’ तेव्हा पू. आजी म्हणाल्या, ‘‘अगं, हा श्रीराम आहे. तू त्याला ओळखले नाहीस. तो तुझ्या आधी साधनेत पुढे जाणार. माझे वाक्य लक्षात ठेव.’’ प्रत्यक्षातही श्री. महेश यांची माझ्या आधी आध्यात्मिक प्रगती झाली. त्यांचे मन लहान मुलाप्रमाणे निर्मळ आहे. त्यांच्यातील गुण पू. आजींनी तेव्हाच ओळखले होते.
५. सेवेची तीव्र तळमळ
अ. पू. आजी साधकांसाठी नामजप करत असत. त्यांच्या देहत्यागापर्यंत त्या समष्टीसाठी नामजप करत होत्या. पू. आजींची शारीरिक स्थिती थोडी चांगली असल्यास त्या लगेचच ‘मनीषा, समष्टीसाठी नामजप करायचा आहे का ?’, असे आवर्जून विचारत असत.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात असणार्या पू. मराठेआजी !
पू. आजी अखंड प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात असायच्या. ‘प.पू. गुरुदेव समवेतच आहेत’, या भावाने पू. आजी त्यांच्याशी अखंड बोलायच्या. चहा घेतांना त्या ‘परम पूज्य, तुम्हीही चहा घ्या. चहामध्ये साखरेचे प्रमाण योग्य आहे ना ? आज चहा थोडा गोड झाला आहे का ? सावकाश प्या’, असे बोलायच्या. ‘आत्मनिवेदन भक्ती कशी करावी ?’, हे पू. आजी प्रत्यक्ष कृतीतून आम्हाला शिकवायच्या. ‘दिवसातील प्रत्येक क्षणी परम पूज्यांना अपेक्षित असेच आपल्याला घडायचे आहे’, असा त्यांचा भाव असे. परात्पर गुरुदेवांचे नाव जरी घेतले, तरी त्यांची पुष्कळ भावजागृती होत असे. त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ प.पू. गुरुदेवच दिसायचे.
७. गुरूंप्रती भाव
पू. आजींकडे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई (डॉ. (सौ.) कुंदा आठवले) यांचे एक छायाचित्र आहे. त्यांनी ते छायाचित्र देवघरात ठेवले आहे. पू. आजी त्या छायाचित्राची प्रतिदिन भावपूर्ण पूजा करायच्या.
८. पू. आजींच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. पू. आजींना ऐकायला अल्प यायचे. जेव्हा आम्ही साधक प.पू. गुरुदेवांविषयी बोलत असू, तेव्हा ते बोलणे त्यांना व्यवस्थित ऐकू येत असे.
आ. मी कधी कधी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ किंवा सनातनची सात्त्विक उत्पादने देण्यासाठी पू. आजींच्या घरी जात असे. तेव्हा ‘आश्रमातच आलो आहोत’, असे मला वाटायचे. त्यांच्या घरात पुष्कळ चैतन्य जाणवायचे. त्या वेळी माझे मन स्थिर आणि शांत व्हायचे. माझा नामजप आपोआप चालू व्हायचा.
इ. त्यांच्यातील प्रीतीमुळे माझा थकवा निघून जायचा. त्यांच्या स्पर्शातून मला सेवा करण्यासाठी जणू भरभरून चैतन्यच मिळायचे.
ई. पू. आजी ज्या माळेने नामजप करायच्या, ती माळ पुष्कळ हलकी झाली आहे. ‘त्या माळेला वजनच नाही’, असे जाणवते. ‘पू. आजींमधील चैतन्यामुळे असे झाले असावे’, असे वाटते.
९. पू. आजींच्या देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे
अ. २२.९.२०२१ या दिवशी पू. आजींनी देहत्याग केल्याचे त्यांचा मुलगा श्री. प्रसाद मराठेदादा यांनी मला कळवले. तेव्हा मला जाणवले, ‘पू. आजी सूक्ष्म रूपाने प.पू. गुरुदेवांच्या चरणांशीच आहेत. आता त्यांना देहाच्या मर्यादा राहिल्या नाहीत.’
आ. मला सूक्ष्मातून पू. आजींचे अस्तित्व जाणवले आणि ‘त्यांचे चैतन्य सर्व साधकांना मिळत आहे.’, असे वाटले.
१०. पू. आजींविषयीची सूत्रे लिहितांना भावजागृती होणे
जेव्हा मी पू. आजींविषयी सूत्रे लिहायला घेतली, तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘त्यांच्या समवेत अनुभवलेले क्षण, त्यांची समष्टीची तळमळ, उत्कट गुरुभक्ती आणि प्रीती’, यांविषयीचा एकेक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर तरळत होता.
‘प.पू. गुरुदेवांनी अशा प्रीतीस्वरूप संतांचा सहवास दिला’, त्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे (१४.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |