मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या मुलींना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
७.३.२०२२ या दिवशी श्रीमती उपदेश आनंद यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
२४.२.२०२२ या दिवशी मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या मुलींना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
१ अ. आईची शारीरिक स्थिती पूर्वीपेक्षा खालावली असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगणे : ‘१९.२.२०२२ या दिवशी आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘आईची शारीरिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक खालावली आहे. नातेवाइकांना त्यांना भेटण्यासाठी बोलावणार असाल, तर बोलावून घ्या.’’
१ आ. १९.२.२०२२ या दिवशी सकाळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘आईची जाण्याची वेळ जवळ आली आहे, तरी तुम्ही दोघींनीसुद्धा आपल्या मनाची सिद्धता करून ठेवली पाहिजे.’’
१ इ. आईला तिच्या भावंडांना भेटायला बोलावण्याविषयी विचारल्यावर तिने होकार देणे आणि बहीण आल्यावर तिने आनंद व्यक्त करणे : २०.२.२०२२ या दिवशी आई बोलण्याच्या स्थितीत होती. त्या वेळी ‘तुझ्या बहिणीला बोलवायचे का ?’, असे तिला विचारल्यावर तिने त्वरित होकार दिला आणि भावाला बोलावण्याविषयी ती म्हणाली, ‘‘त्याला वेळ नसतो; परंतु तरीही एकदा विचार.’’ नंतर ती माझा पाठपुरावा घेत होती, ‘‘त्यांना तिकीट मिळाले कि नाही ?’’ माझी मावशी बेंगळुरूमध्ये होती. ती आईला भेटण्यासाठी लगेचच आली. आईने तिला भेटल्यावर आनंद व्यक्त केला.
१ ई. मावशीला स्वप्नात निधन झालेला धाकटा भाऊ आईला भेटायला आलेला दिसणे; परंतु आईला त्याच्याविषयी आसक्ती नसल्याचे मावशीने सांगणे : मावशी (श्रीमती जया घई, मैहर, मध्यप्रदेश) आनंदपूर आश्रमाद्वारे साधना करते आणि ती चांगली साधिका आहे. जेव्हा मावशी रुग्णालयात आईच्या जवळ बसली होती, तेव्हा थोडा वेळ तिचा डोळा लागला होता. त्या वेळी तिला स्वप्नात काही मासांपूर्वी निधन झालेला आईचा धाकटा भाऊ खोलीच्या बाहेर दरवाजाजवळ दिसला. तो मावशीला पुनःपुन्हा म्हणत होता, ‘मला दीदीला (श्रीमती आनंद यांना) भेटायचे आहे’; परंतु तो आत येऊ शकत नव्हता. या संदर्भात मावशीने सांगितले, ‘‘आईला (श्रीमती आनंद यांना) त्याच्याविषयी आसक्ती राहिली नाही. त्यामुळे आई त्याला ओळखत नाही; परंतु लहान भावाला आसक्ती असल्यामुळे तो येण्याचा प्रयत्न करत होता.’’
१ उ. आईला नातेवाइकांविषयी आसक्ती नसली, तरी त्या सर्वांना आईला भेटल्याचे समाधान मिळणे : आमचे इतरही जवळच्या नातेवाइकांना आईची स्थिती सांगून ठेवली होती. ज्यांची आईशी जवळीक होती, ते सर्व जण तिला भेटायला आले होते. हेसुद्धा ईश्वराचेच नियोजन होते. त्यांना आईला भेटल्याचे समाधान मिळाले. आईला त्यांच्याविषयी आसक्ती नसली, तरी जे आईशी जोडले गेले होते, त्या सर्वांना ईश्वराने समाधान आणि आनंद दिला.
१ ऊ. आईला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा स्पर्श जाणवणे, त्या आईकडे सूक्ष्मातून येत असल्याचे जाणवणे आणि तिने साश्रू नयनांनी त्यांना नमस्कार कळवायला सांगणे : २२.२.२०२२ या दिवशी आईने ७ – ८ वेळा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे नाव घेतले. त्या वेळी आम्ही तिला विचारले, ‘‘तुला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई दिसतात का ?’’ तेव्हा ती आम्हाला म्हणाली, ‘‘त्या प्रत्यक्ष दिसत नाहीत; परंतु मला त्यांचा स्पर्श जाणवतो.’’ त्यानंतर रात्री आम्ही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना याविषयी सांगितल्यावर त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘मी सोहम्ला (त्यांच्या मुलाला) थोड्या वेळापूर्वी सांगितले की, आज दिवसभर मला शौर्याच्या आईची पुष्कळ आठवण होत होती.’’ यावरून ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सूक्ष्मातून आईकडे येऊन जात होत्या’, असे आमच्या लक्षात आले. आम्ही आईला विचारले, ‘‘तुला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना काही सांगायचे आहे का ?’’ तेव्हा तिच्या डोळ्यांतून भावाश्रू आले आणि ती म्हणाली, ‘‘माझा त्यांना कोटी कोटी नमस्कार सांगा.’’
१ ए. आई बेशुद्धावस्थेत जाऊ लागणे, यकृताच्या आजारामुळे तिची मूत्रपिंडे व्यवस्थित कार्य करत नसणे आणि तिचे हृदय बळकट असल्याने तिला इतर शारीरिक त्रास सहन करता येणे : २३.२.२०२२ या दिवशी दुपारी आई हळूहळू बेशुद्धावस्थेत जाऊ लागली. तिच्या यकृताच्या आजारामुळे तिची मूत्रपिंडेही व्यवस्थित कार्य करत नव्हती. आधुनिक वैद्यांच्या मतानुसार असे झाल्यावर हृदयावर दाब येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते; परंतु आईचे हृदय बळकट असल्यामुळे ती आतापर्यंत हे सर्व सहन करू शकत होती. त्यामुळे ती अधिक काळ बेशुद्धावस्थेत राहू शकली. यकृताच्या रुग्णांच्या संदर्भात ‘रक्ताची उलटी होणे, पचनसंस्थेतील रक्तस्राव होणे (gastrointestinal bleeding), श्वास घेण्यास त्रास होणे’, अशा प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते; परंतु ‘आईच्या वेदना न्यूनतम कशा करता येतील आणि तिला काही त्रास होणार नाही’, यासाठी आधुनिक वैद्य प्रयत्न करत होते.
१ ऐ. आईने सतत ‘परम पूज्य’ हा नामजप करणे : आईला उपायांसाठी सांगितलेला नामजप करणे कठीण होऊ लागले होते. ती केवळ ‘परम पूज्य’ असा नामजप करत होती. तिला झोपेतही ‘नामजप चालू आहे का ?’, असे विचारल्यावर ती ‘हो’ म्हणत असे. तिला ‘कोणता नामजप करतेस ?’, असे विचारल्यावर ती ‘परम पूज्य’, असे उत्तर देत असे.
१ ओ. आईच्या शरिराची हालचाल बंद होणे, तिचा केवळ श्वासोच्छ्वास चालू असणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र दाखवल्यावर तिने हसणे : २३.२.२०२२ या दिवशी सकाळी अल्पाहारानंतर आई गाढ झोपली. तिच्या संपूर्ण शरिरात कसलीही हालचाल होत नव्हती. केवळ तिचा श्वासोच्छ्वास चालू होता. दुपारी केवळ १० मिनिटांसाठी तिने डोळे उघडले आणि नंतर ती पुन्हा झोपली. त्या वेळी मी तिला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र दाखवले. त्यावर ती हसली आणि पुन्हा झोपली. तिला पाणी आणि भोजनही ग्रहण करणे शक्य नव्हते; म्हणून तिला अन्न देण्यासाठी नळी (राईल्स ट्यूब) लावली होती.
१ औ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे आईसाठी नामजप करणे आणि त्याविषयी तिला सांगितल्यावर तिने प्रतिसाद देणे : त्याच रात्री श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला तिच्यासाठी ‘श्रीकृष्णाय नमः ।’, हा नामजप करायला सांगितला. त्याप्रमाणे आम्ही नामजप चालू केला आणि खोलीत भ्रमणभाषवर नामजप लावला. आम्ही आईला नामजपाविषयी सांगितले. तेव्हा तिने प्रतिसाद दिला. एरव्ही ती कसलाच प्रतिसाद देत नव्हती.
२. निधनाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आईला परात्पर गुरु डॉक्टरांचे नाव घ्यायला सांगितल्यावर तिने त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देणे : २४.२.२०२२ या दिवशी रात्री ८.३० वाजता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आईला भेटायला रुग्णालयात आल्या होत्या. ‘आई त्यांची प्रतीक्षा करत होती’, असे आम्हाला वाटले. जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी तिला गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) नाव घेण्यास सांगितले, तेव्हा आई बेशुद्धावस्थेत असूनही तिने त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला. ते पाहून आमच्या लक्षात आले, ‘आईला त्याची आंतरिक जाणीव होत आहे.’
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आई नामजपातून चैतन्य ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी आईचे हात-पाय पाहून सांगितले, ‘‘त्यांचे हात-पाय निर्जीव झाले आहेत. आता जे काही आहे, ते शरिराच्या वरच्या भागात बाकी आहे.’’ खोलीत नामजप चालू ठेवला होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘काकू नामजपातून चैतन्य ग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’
२ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आश्रमातून आणलेले तीर्थ आईला पाजणे आणि सर्व कुटुंबियांनी आईसाठी नामजप करणे : रुग्णालयातून निघतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी आश्रमातून आणलेले तीर्थ आमच्याकडे दिले आणि ते आईला पाजायला सांगितले. त्यांनी आम्हाला आईसाठी अखंड नामजप करण्यास सांगितला. त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘आता केवळ थोडासाच वेळ शिल्लक आहे.’’ आईच्या अंतिम क्षणासाठी तिच्या हातात तुळशीची पाने देऊन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई रात्री ९.१० वाजता रुग्णालयातून आश्रमात जाण्यासाठी निघाल्या. आम्ही आईला नळीतून तीर्थ पाजले. दीपिकाताई आईसाठी अखंड नामजप करू लागली आणि मी (सौ. शौर्या) नातेवाइकांना घरी सोडण्यासाठी रुग्णालयातून निघाले. आम्ही सर्व जण गाडीतून प्रवास करत असतांना आईसाठी अखंड नामजप करत होतो.
३. निधन
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आश्रमात पोचेपर्यंत आईसाठी नामजप करणे, त्यांनी भक्तीसत्संगात बोलणे चालू करण्यापूर्वी आईचे निधन होणे आणि ‘त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे आईचा अंतिम प्रवास सुलभ झाला’, असे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई स्थुलातून रुग्णालयातून निघाल्या होत्या; परंतु त्यांचे मन आईजवळच होते. त्या गाडीतून प्रवास करत असतांनाही हाताची मुद्रा करून आईसाठी नामजप करत होत्या. रात्री ९.४० वाजेपर्यंत, म्हणजे त्या आश्रमात पोचेपर्यंत आईसाठी नामजप करत होत्या. रात्री ९.४५ वाजता त्यांनी भक्तीसत्संगात बोलायला चालू करण्यापूर्वी रात्री ९.४२ वाजता आईने शेवटचा श्वास घेतला. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यामध्ये किती सामर्थ्य आहे !’, याची अनुभूती गुरुदेवांनी आम्हाला दिली. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आईला गती देण्यासाठीच रुग्णालयात आल्या होत्या. त्यामुळे आईला काहीही त्रास न होता तिचे प्राण गेले’, असे आम्हाला जाणवले. एरव्ही रुग्णालयातील वातावरण वेगळे असते; परंतु ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या आगमनाने तेथील संपूर्ण वातावरण पालटले आणि आईचा अंतिम प्रवास सुलभ झाला’, असे आमच्या लक्षात आले.
३ आ. ‘आईची भक्ती आणि त्याग यांमुळे साक्षात् श्रीविष्णूरूपी परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या माध्यमातून तिला वैकुंठात स्थान दिले’, असे जाणवणे : आईच्या अंतिम दिवसांचा प्रवास पुष्कळ सुंदर होता. ही आईवरील आणि आम्हा सर्वांवरील गुरुकृपाच आहे. आईने जीवनभर तप, त्याग आणि भक्ती केली. तिने आम्हा दोन्ही बहिणींनाही गुरुकार्यासाठी समर्पित केले. त्याचेच हे फळ होते. ‘साक्षात् श्रीविष्णुरूपी परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या माध्यमातून तिला आपल्या वैकुंठात स्थान दिले’, असे आम्हाला जाणवले. गुरुदेवांचे हे किती सुंदर होते ! आम्ही त्यांच्या चरणी अपार कृतज्ञ आहोत.
४. आश्रमातून आईच्या अंत्यविधीचे नियोजन चांगल्या प्रकारे केले जाणे, पुरोहितांनी शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यविधी करणे आणि ते पाहून नातेवाइकांनी समाधान व्यक्त करणे : रामनाथी आश्रमातून आईच्या अंत्यसंस्काराचे चांगले नियोजन करण्यात आले. त्या दिवशी आमच्या साहाय्यासाठी आश्रमातून साधक आणि पुरोहित आले. साधकांनी अत्यंत सहजपणे सर्वकाही चांगले सांभाळून घेतले. हे नियोजन पाहून आमचे नातेवाईकही प्रभावित झाले आणि त्यांना पुष्कळ आनंद झाला. ते आम्हाला म्हणाले, ‘‘आम्ही अंत्यसंस्काराचे एवढे सुंदर नियोजन या पूर्वी कधीही कुठेही पाहिले नाही. स्मशानात जे विधी झाले, ते अत्यंत पद्धतशीर झाले.’’ आईचे अंत्यविधी पुष्कळ चांगल्या प्रकारे झाल्यामुळे सर्वांचे समाधान झाले.’
– सुश्री (कु.) दीपिका आनंद (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि सौ. शौर्या सुनील मेहता (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) ((कै.) श्रीमती उपदेश आनंद यांच्या मुली), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |