भारतात आरक्षणप्रणाली नसती, तर भारतातच शिकून आधुनिक वैद्य झाले असते !

युक्रेन येथून आलेली गोमंतकीय विद्यार्थिनी कॅरन फर्नांडिस हिने व्यक्त केली खंत !

भारतात केवळ १० वर्षे आरक्षणाची पद्धत राबवण्याची सूचना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती, हे आपण लक्षात घ्यायला हवे ! – संपादक 

फोंडा – भारतात आरक्षणासारखी अन्यायकारक पद्धत नसती, तर आम्हीसुद्धा भारतातच शिकून आधुनिक वैद्य झालो असतो, अशी खंत युक्रेन येथून गोव्यात परतलेल्या कॅरन फर्नांडिस या विद्यार्थिनीने व्यक्त केली. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कॅरन फर्नांडिस ३ मार्च या दिवशी गोव्यात परतल्या. कॅरन फर्नांडिस फोंडा, गोवा येथे रहातात. घरी परतल्यानंतर कॅरन फर्नांडिस पत्रकारांशी बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘भारतात उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण मिळते; परंतु येथील आरक्षण पद्धतीमुळे हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नाही. खासगी विद्यालयांमध्ये प्रवेश घेणे सर्वांनाच परवडणारे नसते. भारतात खासगी विद्यालयात वैद्यकीय पदवी घेण्यास एका विद्यार्थ्याला जेवढा खर्च येतो, त्या खर्चात युक्रेन येथे ४ विद्यार्थी आधुनिक वैद्य बनू शकतात.’’