बीड येथील जिल्हा शल्य चिकित्सकांवर वित्तीय अनियमितता, तसेच अपव्यवहार केल्याचा आरोप !

बीड जिल्हा रुग्णालय

बीड – येथील जिल्हा शल्य चिकित्सक आधुनिक वैद्य सूर्यकांत गित्ते यांनी त्यांच्या अधिकाराचा अपवापर करून पदावर कार्यरत असतांना अपव्यवहार आणि वित्तीय अनियमितता केली असल्याचे १ जानेवारी २०२१ या दिवशी निदर्शनास आले आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्ण स्वतःच्या रुग्णालयात पाठवणे, रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार आणि बोगस आरोग्य भरती, तसेच त्यांच्या खासगी रुग्णालयात रुग्णांनी केलेली आत्महत्या अशा अनेक प्रकरणांविषयी त्यांच्यावर आरोप प्रविष्ट करण्यात आले आहेत. याबाबतची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याविषयीचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिले आहे.

या प्रकरणी उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर यांनी २४ फेब्रुवारी २०२२ च्या आदेशान्वये गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या वतीने चौकशी चालू असून सदर समितीचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना लेखी उत्तरात दिली आहे.