‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी तेथे काही दैवी बालके उपस्थित होती. त्या सत्संगात उपस्थित असलेले साधक त्यांच्या शंका, तसेच ते करत असलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सांगत होते. तेव्हा गुरुदेव त्या दैवी बालकांना विचारत होते, ‘‘हे ऐकून तुम्हाला काय वाटते ?’’ तेव्हा दैवी बालकांनी दिलेली उत्तरे ऐकून मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
दैवी बालकांच्या पालकांचे कर्तव्य !
‘काही पालक ‘नातेवाईक काय म्हणतील ?’, या विचाराने त्यांच्या मुलांना साधना करण्यास विरोध करतात; परंतु ते लक्षात घेत नाहीत की, हे नातेवाईक केवळ याच जन्मातील आहेत. पालकांनी ‘जन्मोजन्मींचे नाते असणार्या देवाला काय अपेक्षित आहे?’, याचा प्रथम विचार केला पाहिजे आणि मुलांना साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य केले पाहिजे. ती त्यांची साधनाही होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.११.२०२१) |
१. उत्तम आकलनक्षमता
या दैवी बालकांची वयाच्या मानाने आकलनक्षमता अधिक आहे. सत्संगात चालू असलेल्या विविध विषयांचे त्यांना सहज आकलन होते. त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना ती सहजतेने उत्तरे देतात.
२. दैवी बालकांमध्ये बुद्धीचा अडथळा अत्यंत अल्प आहे.
३. दैवी बालकांची सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता !
३ अ. सत्संगात साधक बोलत असतांना ‘सूक्ष्मातून काय जाणवते ?’, याचा अभ्यास करणारी दैवी बालके ! : सत्संगात उपस्थित असलेली दैवी बालके केवळ ‘साधक काय सांगत आहेत ?’, याविषयी न सांगता ते साधक बोलत असतांना ‘स्वतःला कोणता सूक्ष्म गंध जाणवला ? मनाची स्थिती कशी होती ? साधक बोलत असतांना वातावरणात कोणत्या प्रकारची स्पंदने पसरत होती, उदा. भाव, चैतन्य इत्यादी. त्या साधकांचे बोलणे ऐकतांना भाव जागृत होत होता का ?’, अशा प्रकारे सांगत होती. यावरून ‘ती दैवी बालके ‘केवळ कानाने न ऐकता सूक्ष्म स्तरावर काय जाणवते ?’, याचाही अभ्यास करत होती’, असे माझ्या लक्षात आले आणि हे मला पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण वाटले.
३ आ. देवाला विचारून मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवणे : दैवी बालकांना विविध प्रश्न पडत असतात; पण ती ते प्रश्न कुणाला तरी विचारण्यासाठी थांबत नाहीत. दैवी बालके ते प्रश्न भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांना मनातल्या मनात विचारतात. ‘त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे आतूनच मिळतात आणि त्यांना मिळालेली उत्तरे योग्यच असतात’, असे माझ्या लक्षात आले.
४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
एके दिवशी देवाच्या कृपेने मला कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि वय १४ वर्षे) ही घेत असलेल्या बालसाधकांच्या दैनंदिन सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘एवढ्या लहान वयातही दैवी बालके प्रतिदिन साधनेचे ध्येय घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ध्येयानुसार ‘किती प्रयत्न जमले किंवा कोणते जमले नाही ?’, ते दुसर्या दिवशी आढाव्यात सांगतात आणि ‘प्रत्येकाने केलेले प्रयत्न हे वैशिष्ट्यपूर्ण असतात’, असे माझ्या लक्षात आले.
५. कुठल्याही सत्संगाला न जाता सहजस्थितीत, भावाच्या आणि उच्च आध्यात्मिक स्तरावर बोलणारी दैवी बालके !
दैवी बालके आतापासूनच साधनेच्या पुढच्या टप्प्यावर आहेत. ‘ती आध्यात्मिक स्तरावर जीवन जगत आहेत’, हे माझ्या लक्षात आले. खरेतर ती वयाने पुष्कळ लहान आहेत. ‘आपल्या समोर प्रत्यक्ष गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहे, तसेच सत्संगात उपस्थित साधक वयाने पुष्कळ मोठे आहेत’, याचे त्यांच्यावर दडपण येत नाही. त्यांचे वागणे आणि बोलणे अगदी सहजस्थितीत असते. त्यांचे बोलणे उच्च आध्यात्मिक स्तरावरचे आहे. ही दैवी बालके कुठल्याही सत्संगाला गेलेली नाहीत. त्यांचे वय ५ वर्षांपासून १५ वर्षांपर्यंत आहे, तरीही ती ‘सूक्ष्म-गंध’, ‘वाईट शक्ती’, ‘चांगली-वाईट स्पंदने’, तसेच ‘भक्ती, आपतत्त्व, तेजतत्त्व, चैतन्य, आनंद, शांती, शरणागती’, अशा शब्दांचा सहज वापर करतात.
६. दैवी बालकांचे दैनंदिन जीवन अनुभूतीमय असणे
त्यांना सत्संगात बोलण्याविषयी सांगण्यात येते. तेव्हा ती ‘दैनंदिन जीवनातील प्रसंगांमध्ये देवाने त्यांना कसे साहाय्य केले ? कशी अनुभूती आली ?’, अशा प्रकारचे सर्व प्रयत्न सांगतात. त्यांचे दैनंदिन जीवन अनुभूतीमय आहे. ‘त्यांच्या भावस्थितीमुळे ती सतत भगवंताची अनुभूती घेत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
७. दैवी बालकांना एवढ्या लहान वयात जीवनातील साधनेचे महत्त्व कळणे
दैवी बालकांमधील मुले शाळेत जाणारी होती; परंतु जीवनातील साधनेचे महत्त्व कळल्यानंतर अधिकाधिक साधना करता येण्यासाठी प्रयत्न करतात. एवढ्या लहान वयात त्यांना साधनेचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात आले आहे. ‘अध्यात्मामध्ये सर्वस्वाचाच त्याग करायचा असतो’, हे त्यांना कळलेले आहे.
८. दैवी बालकांमधील कृतज्ञताभाव
‘एवढ्या लहान वयात आपल्याला आश्रमात रहायला मिळत आहे. साधना शिकायला मिळत आहे आणि प.पू. गुरुदेवांचे मार्गदर्शन मिळत आहे’, याविषयी त्या दैवी बालकांमध्ये पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवला.
९. दैवी बालकांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती असलेला उत्कट भाव !
दैवी बालके बोलत असतांना ‘त्यांचा गुरुदेवांच्या प्रती पुष्कळ उत्कट भाव आहे’, असे मला जाणवले. ‘प.पू. गुरुदेव श्रीविष्णूचा अवतार असून ते साक्षात् ईश्वरच आहेत’, अशी दृढ श्रद्धा त्यांच्या मनात निर्माण झाली आहे आणि त्याच भावाने ती प.पू. गुरुदेवांशी बोलतात.
१०. दैवी बालकांच्या सत्संगात मला बर्याच वेळा सूक्ष्मगंधाची अनुभूती आली.
११. वैशिष्ट्यपूर्ण दैवी गुण असल्यामुळेच दैवी बालके ‘ईश्वरी राज्य’ चालवू शकणार असणे
गुरुदेव म्हणतात, ‘पुढे येणारे ‘ईश्वरी राज्य’ ही मुले चालवणार आहेत.’ याचे कारण म्हणजे या बालकांमध्ये असलेली प्रगल्भता, त्यांचे ईश्वराशी असलेले अनुसंधान, जिज्ञासू वृत्ती, साधनेचे गांभीर्य आणि तळमळ, आज्ञापालन करण्याची वृत्ती इत्यादी दैवी गुण ! ‘या दैवी गुणांमुळे ही मुले पुढे ‘ईश्वरी राज्य’ चालवणार आहेत’, हे सहज लक्षात आले.
१२. आतापर्यंत धर्मग्रंथांमुळे भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ इत्यादी दैवी बालकांविषयी ठाऊक असणे; परंतु केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच कलियुगातील दैवी आणि संत बालके प्रत्यक्षात पहाण्याची संधी मिळणे
आपल्याला आतापर्यंत हिंदु धर्मग्रंथांमुळे भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ इत्यादी काही दैवी बालकांविषयी ठाऊक आहे; परंतु सनातनमध्ये अशी असंख्य दैवी बालके आहेत. त्यांना आम्ही पाहू शकतो आणि त्यांच्याशी बोलूही शकतो. त्यातील दोन बालके पू. भार्गवराम (वय ४ वर्षे) आणि पू. वामन (वय ३ वर्षे) हे जन्मतःच संत आहेत. ही आमच्यासाठी किती भाग्याची गोष्ट आहे ! या घोर कलियुगात अशी दैवी बालके पहाण्याचे भाग्य केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला लाभले आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्य भिकाजी भोसले (वय ७० वर्षे) यांची ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
या लेखावरून दैवी बालिका कु. प्रार्थना पाठक हिचे ‘दुसर्यांना जाणून घेण्याचे’ वैशिष्ट्य लक्षात येते.
१. प्रेमभाव
१ अ. लहानांशी लहान होऊन वागणे : ‘भोसलेकाका माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत, तरीही ते माझ्याशी माझ्या वयाचे असल्याप्रमाणे बोलतात. त्यांचे बोलणे आणि माझ्याशी वागणे पाहून मला ‘कधी एकदा त्यांच्या समवेत सेवेला जाते ?’, असे वाटते.
१ आ. प्रेमाने चुका सांगणे : काका अतिशय प्रेमळ आहेत. ते मला प्रेमाने चुका सांगतात. त्यामुळे मला वाईट न वाटता खंत वाटते.
२. सेवेतील बारकावे समजावून सांगणे
त्यांनी मला रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ‘आरतीची सेवा कशी करायची ?’, हे शिकवले. माझ्याकडून चूक होत असेल, तर ते मला लगेच जाणीव करून देतात.
३. अंतर्मुख
‘साधकांकडून एखादी चूक झाली किंवा साधक प्रायश्चित्त घेत आहेत’, हे पाहून काका अंतर्मुख होऊन ‘स्वतःकडूनही अशा चुका होत नाहीत ना ?’ याचे चिंतन करतात.’
– कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२१)