-
मराठी राजभाषादिनाच्या पूर्वसंध्येला शिरवळ (पुणे) येथे सनातन संस्थेच्या वतीने व्याख्यान
-
इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही विद्यार्थ्यांनी मराठीतील बोधकथा, भावगीतांचे सादरीकरण केले आणि गुढीपाडवा, नागपंचमी, नवरात्री, दीपावली, होळी या हिंदु सणांच्या माहितीची प्रात्यक्षिके सादर केली.
भोर (जिल्हा पुणे) – चैतन्य, माधुर्य, सहज आणि सुंदर अशा मराठी भाषेने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी यांसह अनेक संत महात्मे घडवले. प्रत्येक शब्दाला भावार्थ असलेल्या आणि देववाणी संस्कृतची कन्या मायमराठीचा प्रत्येकाने अभिमान राखायला हवा, असे आवाहन सनातन संस्थेचे भोर येथील साधक प्रा. विठ्ठल जाधव यांनी केले. ते शिरवळ, ता. खंडाळा येथील ‘ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्थे’च्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी राजभाषादिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला ३५० विद्यार्थी आणि २० शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आला. या वेळी प्रा. विठ्ठल जाधव यांनी भारतीय संस्कृती, संस्कार, प्रार्थना, श्लोक, स्तोत्रे आणि नमस्काराच्या योग्य पद्धती याविषयी माहिती दिली. देवाविषयी श्रद्धा, भाव आणि भक्ती वाढवून आनंदी कसे राहू शकतो ? याविषयी उदाहरणासह उपस्थितांना अवगत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सौ. शितल माने यांनी आजचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नक्कीच लाभदायी ठरेल. यापुढेही संस्थेची व्याख्याने आम्ही आयोजित करत जाऊ, असे सांगितले.