महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘महाशिवरात्री हे व्रत माघ वद्य चतुर्दशी या तिथीला करतात. महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना, अभिषेक, पूजा आणि जागरण करण्याची परंपरा आहे. महाशिवरात्रीला (२१.२.२०२० या दिवशी) सनातनच्या काही साधकांनी धामसे (गोवा) येथील पू. भय्याजी यांच्या आश्रमात शिवपिंडीवर अभिषेक केला. ‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ अ. शिवपिंडीवर अभिषेक केल्याने साधकांवर सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

२. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. महाशिवरात्रीला शिवाची उपासना केल्यामुळे वाईट शक्तींचा दाब न्यून होणे : ‘भगवान शिव माघ वद्य चतुर्दशीला रात्रीच्या चार प्रहरांपैकी एका प्रहरी विश्रांती घेतो. (महाशिवरात्रीला शिवपूजनाची वेळ उत्तररात्री १२ ते १.३० या कालावधीत असते. हा काळ साधारण दीड घंट्याचा आहे.) महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र पुढीलप्रमाणे आहे. ‘शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्या वेळी शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून अधिकाधिक शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर अर्पण करतात किंवा अभिषेक करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही.’ (संदर्भ : सनातनचे संकेतस्थळ – https://www.sanatan.org/mr/a/424.html)

२ आ. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून होण्याचे कारण : शिवपिंडीला अभिषेक केल्यावर त्यातून प्रक्षेपित झालेले चैतन्य (शिवतत्त्व) साधकाने त्याच्या क्षमतेनुसार ग्रहण केले. त्यामुळे त्याच्या देहातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती, तसेच त्याच्या भोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून झाले. त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली.

२  इ. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होण्याचे कारण : या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा होती. शिवपिंडीला अभिषेक केल्यावर त्यातून प्रक्षेपित झालेले चैतन्य (शिवतत्त्व) साधकाने ग्रहण केले. त्यामुळे त्याच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.८.२०२०)

ई-मेल : [email protected]

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक