फोंडा (गोवा) येथील श्रीमती रेखाराणी वर्मा (वय ७२ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

देवावर श्रद्धा आणि अखंड अनुसंधान असल्यामुळे देव श्रीमती रेखाराणी वर्मा यांना आतून मार्गदर्शन करतो ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

अ. श्रीमती वर्माकाकू यांच्याकडे पाहूनच शांत आणि स्थिर वाटते. ‘त्यांच्यामध्ये भाव आणि भक्ती असून त्या देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवते. ‘त्या आपल्यात असूनही नसल्यासारख्या आहेत (म्हणजे अलिप्त आहेत)’, असे जाणवते. ‘मायेत राहूनही त्यापासून मनाने अलिप्त रहाणे’, हे केवळ भगवंतावरील श्रद्धेमुळेच होऊ शकते.

आ. श्रीमती वर्माकाकूंना ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी व्हावी, यापेक्षा ईश्वरप्राप्ती व्हावी’, हा ध्यास प्रबळ आहे. यातून ‘त्यांची आंतरिक साधना चांगली आहे’, हेच दिसून येते. त्यांचे देवाशी अखंड अनुसंधान असल्याने देव त्यांना आतून मार्गदर्शन करतो. श्रीमती वर्माकाकूंना केवळ देवाचे विचार ग्रहण होतात, असे नाही, तर त्याप्रमाणे त्यांचे आचरणही आहे. त्यामुळेच त्यांची जलद आध्यात्मिक प्रगती होत आहे. यातून ‘तात्त्विक माहितीपेक्षा आचरणाला महत्त्व आहे’, हेच दिसून येते.

इ. नंदिताताईंना (मुलीला) त्या विविध प्रसंगांत वेळोवेळी योग्य दृष्टीकोन देतात आणि साधनेला पूरक असे सकारात्मक विचार देऊन साधनेत साहाय्य करतात. श्रीमती वर्माकाकूंना देवच आतून योग्य दृष्टीकोन सुचवत असल्यामुळे त्या मुलीला एका आध्यात्मिक मैत्रिणीप्रमाणे दिशादर्शन करू शकतात, हे सिद्ध होते.

ई. ‘आपले गुरु किती सामर्थ्यवान आहेत’, ते श्रीमती वर्माकाकू यांच्या उदाहरणांवरून कळते. गुणवान व्यक्तींची आंतरिक साधना ओळखून गुरुदेव त्यांना साधनेची पुढील दिशा देतात आणि त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करतात. (११.२.२०२२)


९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्री. शिरीष देशमुख यांनी ६२ टक्के आणि श्रीमती रेखाराणी वर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. या आनंदाच्या क्षणी श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केलेले मनोगत, त्यांचे साधनेविषयीचे प्रगल्भ विचार, श्रीमती वर्मा यांची कन्या नंदिता वर्मा यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी श्रीमती वर्मा यांच्या साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

श्रीमती रेखाराणी वर्मा

१. श्रीमती रेखाराणी वर्मा यांचे साधनेविषयीचे प्रगल्भ विचार !

अ. मी अन्य संप्रदायाने सांगितलेल्या मार्गानुसार साधना करत आहे. आमच्या संप्रदायात गुरु करत नाहीत. त्यामुळे ईश्वर हाच माझा गुरु आहे.

आ. भूतकाळात जे घडले, ते घडले. भविष्यात काय घडेल, ते मला ठाऊक नाही; पण वर्तमानकाळात राहून देवाशी अनुसंधान साधणे महत्त्वाचे आहे आणि तसे मी करते.

इ. मुले रुग्णाईत झाल्यावर त्यांची काळजी घेण्यासह मी त्यांना देवावर सोपवले. जीवनातील असे अनेक प्रसंग देवावर सोपवल्याने मी ताणविरहित आणि आनंदी जीवन जगत आहे. आपण काही करू शकत नाही. देवच सर्वकाही बघत असतो.

ई. सनातनच्या साधकांचे विचार ऐकून मला पुष्कळ चांगले वाटले. श्री. शिरीष देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांचे जीवनाविषयीचे विचार पुष्कळ चांगले असून तसेच विचार माझेही आहेत.

उ. देवाने मला भरपूर दिले आहे. ‘देव जे काही करील, ते चांगल्यासाठी करील’, असा विचार असतो. आपण जे काही भोगतो, ते आपल्या कर्माने भोगतो. देवाने प्रत्येकाचे आयुष्य निर्धारित केले आहे. त्यामुळे मी या आयुष्यात चांगले कर्म करण्यासह नामजप करते. सतत भगवंतावर श्रद्धा ठेवल्याने माझ्या जीवनात कोणते संकट आलेच नाही, असे मला वाटते आणि जरी संकट आले, तरी त्यातून भगवंताने मला पार केले.

नंदिता वर्मा

२. श्रीमती रेखाराणी वर्मा यांनी ६१ टक्के पातळी घोषित केल्यानंतर व्यक्त केलेले मनोगत :

मला आध्यात्मिक पातळीचे काही वाटत नाही. आध्यात्मिक पातळी न्यून किंवा अधिक होत असते; पण मला सतत ईश्वराच्या सोबत रहायचे आहे.

३. श्रीमती रेखाराणी वर्मा यांची कन्या नंदिता वर्मा यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

३ अ. सनातनच्या आश्रमातील साधकांचे कुटुंबाप्रमाणे वागणे पाहून श्रीमती वर्मा यांची मुलीच्या सुरक्षिततेविषयी चिंता मिटणे : आईला माझी चिंता वाटायची. मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी देवद (पनवेल) येथील आश्रमात रहायला गेल्यावर एक दिवस आई आणि बाबा मला भेटायला आले होते. त्या वेळी आश्रमातील साधकांचे कुटुंबाप्रमाणेच वागणे पाहून आईने ‘माझी तुझ्याविषयीची चिंता मिटली. तू सुरक्षित ठिकाणी आहेस’, असे सांगितले.

यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितले की, श्रीमती वर्मा यांना वाटण्यामागे ‘जशी इंग्रजीत म्हण आहे, ‘Face is Mirror of Mind’ (चेहरा हा मनाचा आरसा आहे.) त्याप्रमाणेच सनातनचे आश्रम हे परात्पर गुरुदेव शिकवत असलेली आदर्श जीवनपद्धत, परात्पर गुरुदेवांनी साधकांमध्ये निर्माण केलेली कौटुंबिक भावना, तसेच त्यांनी शिकवलेली व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा आरसा आहे. त्यामुळेच श्रीमती वर्मा यांना सनातनच्या आश्रमातील वातावरण सुरक्षित जाणवले.’ आपले (सनातनचे) आश्रम गुरुकुलासारखे आहेत.

३ आ. परात्पर गुरुदेवांच्या भेटीच्या वेळी श्रीमती वर्मा यांनी ‘माझ्या मुलीला तुमच्याकडे सोपवले’, असे सांगणे : वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आणि आईची रामनाथी आश्रमात भेट झाली. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी तिला ‘‘आता चिंता वाटत नाही ना ?’’, असे विचारले. तेव्हा आई त्यांना म्हणाली,‘‘माझ्या मुलीला मी तुमच्याकडे सोपवले आहे.’’

३ इ. पतीचे निधन झाल्याच्या कठीण प्रसंगात स्थिर रहाणे : वर्ष २०११ मध्ये माझ्या बाबांचे निधन झाले. त्या वेळी आई आतून पुष्कळ स्थिर होती. त्या कठीण प्रसंगातही ती ‘देवाने बाबांचे सर्व चांगले केले आणि तो पुढेही त्यांचे चांगले करील’, ‘पतीच्या आधी जर माझे निधन झाले, तर माझ्यानंतर माझ्या पतींची काळजी कोण घेईल ? याची चिंता नाही’, असा आई विचार करत होती. वडिलांचे निधन झाल्यानंतर मी त्यांचे छायाचित्र ठेवण्याविषयी विचारले असता त्या वेळीही तिने ‘त्यांच्यात न अडकता आता देवालाच सतत आठवायचे’, असे सांगितले.

३ ई. कुटुंबियांकडून कोणतीही अपेक्षा नसणे : आई मला नेहमी सेवेला प्राधान्य देण्यास सांगते आणि ती स्वतः घरातील सर्व कामे करते. तिला माझ्याकडून कोणतीही अपेक्षा नसते. एवढेच नव्हे, तर तिला कुटुंबियांकडूनही अपेक्षा नसतात. ती कुटुंबामध्ये अडकलेलीही नाही. ती पुष्कळ अलिप्त आहे.

३ उ. मुलीला साधनेचे दृष्टीकोन सांगून सकारात्मक रहाण्यास प्रोत्साहन देणे : ‘आईची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, असे मला काही कालावधीपासून जाणवत होते. मला काही कारणाने निराशा आली असल्यास आई मला ‘अनुसंधानात आणि सकारात्मक कसे रहायचे ?’, याविषयी सांगायची. मुंबईत रज-तम वातावरण असूनही मी घरी गेल्यावर मला चांगले म्हणजेच आश्रमासारखे वाटायचे. आईमुळे माझा आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढली. तिने दिलेल्या दृष्टीकोनांचा मला साधनेत पुष्कळ लाभ झाला.

४. कु. रेणुका कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी

मी श्रीमती वर्माकाकूंच्या शेजारी रहात असून त्यांचा मला आधार वाटतो. त्यांच्या घरी त्यांनी सर्व वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. त्या वस्तूंकडे पाहून माझी भावजागृती होते.

५. घराचा आश्रम करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या श्रीमती रेखाराणी वर्मा ! – आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

मध्यंतरी मी श्रीमती वर्मा यांच्या घरी गेलो होतो. त्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘‘आश्रमात आल्यासारखे वाटते ना ?’’ यातून मला त्यांचा आश्रमाविषयीचा भाव लक्षात आला. त्या साधकांची आपुलकीने वाट बघत असतात.

(११.२.२०२२)


आनंदी, सकारात्मक आणि गुरूंप्रती भाव असणार्‍या श्रीमती रेखाराणी वर्मा !

१. ‘आईला कसलीच चिंता नसते. ती नेहमी आनंदी असते.

२. आईला घरगुती आयुर्वेदाच्या औषधांचे, तसेच ‘धान्ये, डाळी, भाज्या आणि इतर साहित्य कसे टिकवून ठेवायचे ?’, याचे चांगले ज्ञान आहे.

३. सर्वांशी जुळवून घेणे

नातेवाइकांमध्ये आई सर्वांची लाडकी आहे. तिचे सगळ्यांशी चांगले जुळते. सर्वांना आईच्या सान्निध्यात रहायला आवडते. आई मितभाषी आहे. ती कधी कुणाला रागावून बोलत नाही. आईचे वडिलांशी ((कै.) शंभूदयाल वर्मा (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्याशी) भांडण झाल्याचे आम्ही कधीच पाहिले नाही.

४. सकारात्मकता

एका व्यक्तीमुळे मला ५ – ६ वर्षे फार दुःख भोगावे लागले. त्या संदर्भात मी आईशी बोलले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘तुझ्या प्रारब्धात दुःख होते; पण त्या व्यक्तीने एक चांगले काम केले ना ! तुला साधनेत आणले आणि गुरुदेवांशी जोडून दिले.’’

५. निरपेक्षता

आईने आम्हा मुलांकडून कधीच कोणतीही अपेक्षा केली नाही. मी घरातील कामे करू लागले की, ती मला म्हणते, ‘‘तू सेवा कर. मी घरकाम करते.’’

६. मुलगी सनातनच्या आश्रमात रहात असल्याने तिची चिंता न वाटणे

मी साधना करायला लागल्यावर आरंभी तिला वाटायचे, ‘मी (नंदिता वर्मा) नोकरी सोडून साधना केली, तर भविष्यात माझे कसे होईल ?’ नंतर तिने रामनाथी आश्रमातील वातावरण बघितले. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘माझ्यापेक्षा आश्रमातील साधक तुझी अधिक काळजी घेतात. आता माझी चिंता मिटली.’’ त्यानंतर तिने मला आश्रमातून कधीच घरी बोलावले नाही.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचना देऊन मनातील नकारात्मक विचारांवर मात करणे

वर्ष २००८ मध्ये आई ४ दिवसांसाठी रामनाथी आश्रमात आली होती. तेव्हा तिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आईने त्यांना विचारले, ‘‘माझ्या मनात नकारात्मक विचार येतात. मी कोणते प्रयत्न करू ?’’ तेव्हा गुरुदेवांनी तिला दिवसातून ७ – ८ वेळा स्वयंसूचना द्यायला सांगितली. मी आईला स्वयंसूचना बनवून दिली. तिने स्वयंसूचना लिहिलेला कागद स्वयंपाकघराच्या भिंतीवर लावला. ती दिवसातून ८ वेळा येता-जाता त्या स्वयंसूचना वाचत असे. असे केल्यावर तिच्या मनातील नकारात्मक विचार दूर झाल्याचे माझ्या लक्षात आले.

८. भाव

८ अ. सनातन संस्था आणि साधक यांच्याप्रतीचा भाव : मुंबईला घरी असतांना आईला सनातन संस्थेवर बंदीचे सावट आल्याचे समजले. तेव्हा ती घरी पूजा करतांना साधकांची साधना चांगली होण्यासाठी प्रार्थना करत असे. प्रत्यक्षात असे करण्याविषयी तिला कुणीच सांगितले नव्हते.

८ आ. गुरूंप्रतीचा कृतज्ञताभाव : आई सनातन संस्थेच्या मार्गदर्शानुसार साधना आणि सेवा करत नाही. आम्ही मुंबईहून गोवा येथे नवीन घरात रहायला आल्यावर मी देवघरात देवतांची चित्रे ठेवली. तेव्हा मी प.पू. भक्तराज महाराज यांचेही छायाचित्र ठेवले. मी आईला म्हणाले, ‘‘आई, देवघरात गुरूंचे छायाचित्र ठेवले आहे. चालेल ना ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘ज्यांच्या कृपेमुळे आपले सर्व चांगले झाले, त्यांचा आशीर्वाद आपल्याला हवाच ना ! देवघरात गुरूंचे छायाचित्र ठेवलेस, हे चांगले झाले.’’

माझी आई मला माझ्या आध्यात्मिक मैत्रिणीसारखी वाटते. तिच्याशी बोलतांना आणि तिच्या सान्निध्यात असतांना मला पुष्कळ सकारात्मकता जाणवते. मला अशी आई दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– नंदिता वर्मा (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ऑक्टोबर २०२१)