मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा वेश्या व्यवसाय, ड्रग्ज पेडलिंग (अमलीपदार्थांची तस्करी) आणि देशविरोधी कारवायांशी संबंध असल्याचा आरोप भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
कंबोज यांनी याविषयी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ नवाब मलिक यांना राजीनामा देण्यास सांगावा, अशी मागणीही कंबोज यांनी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे.
मोहित कंबोज म्हणाले की,
१. नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवत होते. या प्रकरणी अनेक मुलींची ‘स्टिंग ऑप्रेशन्स’ (छुपेपणाने पुरावे गोळा करून वृत्त सिद्ध करणे) केली असून त्यामध्ये मुलींनी नवाब मलिक यांनी बलपूर्वक वेश्या व्यवसायामध्ये ढकलल्याची कबुली दिली. हे पुरावे अन्वेषण यंत्रणांकडे देणार आहे.
२. मलिक यांच्या जावयाचे आंतरराष्ट्रीय ‘ड्रग्ज पेडलर्स’शी संबंध आहेत.
३. मलिक यांनी टाडाच्या कलमाखाली गुन्हे नोंद असणार्या आरोपीकडून मालमत्ता खरेदी केली. त्यांनी संविधानाच्या संरक्षणाची शपथ घेतली; मात्र पदाचा दुरुपयोग केला.