श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘समर्थांनी सांगितलेली साधकाची लक्षणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अभिप्रेत असलेले साधकत्व’, यांत कसे साम्य आहे !’, याविषयी सांगितले. ती सूत्रे आज जाणून घेऊया.
१. ‘समर्थ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधकत्वाच्या संदर्भातील लिखाणातील साम्य अन् साधकांनी करायचे आत्मपरीक्षण
१ अ. जिज्ञासा
१ अ १. समर्थांनी केलेले जिज्ञासूवृत्तीचे विवरण : समर्थांनी साधकाचे पहिले लक्षण सांगितले आहे की, जो स्वतःच्या मनातील निरनिराळ्या प्रकारचे संदेह आणि शंका यांचे निरसन व्हावे, यासाठी संतांकडे जातो, त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि त्यानुसार अनुभव घेत जो दृढ निष्ठेने संतांच्या सत्संगात (सत्मध्ये) रहातो, तो ‘साधक’ होय.
१ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना विविध माध्यमांतून करत असलेले मार्गदर्शन : साधना करतांना आपल्या मनात अनेक शंका आणि संदेह असतात. त्यांचे निरसन व्हावे आणि आपल्याला योग्य प्रकारे साधना करता यावी, यासाठी परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्याला संतांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देतात. ते आपल्याला ‘सत्संग, सनातनचे ग्रंथ आणि सनातनची नियतकालिके’ यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून साधनेची पुढील दिशा दाखवतात.
१ अ ३. साधकांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाचा किती लाभ करून घेतो ?’, याचे आत्मपरीक्षण करावे ! : हे सत्य असले, तरी ‘आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेण्याची तळमळ आणि जिज्ञासा आपल्या मनात किती असते ? आपण मनातील शंका, प्रश्न, अडचणी उत्तरदायी साधकांना सांगतो का ? आपण ते प्रश्न चर्चा करून सोडवतो का ? ‘उत्तरदायी साधक आपल्याला जे सांगतात, ते गुरुवचनच आहे’, या भावाने त्यावर निष्ठा ठेवून त्याप्रमाणे आपण किती प्रयत्न करतो ?’, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. गुरुदेव वेळोवेळी देत असलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेत श्री गुरूंच्या अखंड सान्निध्यात, त्यांच्या सत्संगात दृढ निष्ठेने रहायला हवे.
१ आ. अवगुणांचा त्याग (स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन) करणे
१ आ १. समर्थांनी साधकाचे आणखी एक लक्षण सांगितले आहे की, जो दिवसेंदिवस अवगुणांचा त्याग करून उत्तम गुण आत्मसात करतो, तो ‘साधक’ होय.
१ आ २. परात्पर गुरुदेवांनी सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणारी प्रक्रिया साधकांसाठी वरदान असणे : परात्पर गुरुदेवांनी आपल्याला स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी दिशा दिली आहे. खरेतर प्रतिदिन आपल्यातील अवगुणांचा त्याग करून गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आपल्याला शक्य झाले नसते; परंतु प.पू. गुरुदेवांनी आपल्यासाठी व्यष्टी साधनेचे आढावे आणि विविध सत्संग चालू केले आहेत. हे आढावे आणि सत्संग यांच्या माध्यमातून आपल्याला प्रयत्नांसाठी दिशा मिळते आणि ध्येय ठरवून प्रयत्न करण्यास साहाय्य होते. प.पू. गुरुदेवांनी आपल्याला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्या रूपात मोठे वरदानच दिले आहे. त्या माध्यमातून तेच आपल्याकडून प्रतिदिन अवगुणांचा त्याग करवून घेत आहेत. प्रतिदिन प्रयत्न होऊन नकळतपणे दैवी गुणांची वृद्धी होत असते.
१ आ ३. साधकांनी ‘स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचा त्याग होण्यासाठी किती प्रयत्न करतो ?’, याचे चिंतन करावे ! : ‘आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा त्याग होण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न किती असतात ? परात्पर गुरुदेवांनी शिकवलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आपण अंतर्मनापासून राबवतो का ? त्यासाठी आपण तळमळीने कसे प्रयत्न करतो ?’, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. साधनेत आड येणारे स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांवर साधकांनी प्रयत्नपूर्वक मात करावी. गुरुदेवांची सर्वांवर कृपा आहेच; परंतु त्याला प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळाली, तर प्रत्येक क्षणी आपण गुरुदेवांना अनुभवू शकणार आहोत.
१ इ. सतर्कता
१ इ १. समर्थ रामदासस्वामी यांनी साधकाच्या सतर्कतेचे सांगितलेले लक्षण म्हणजे योग्य-अयोग्य जाणणे : साधकाची लक्षणे सांगतांना समर्थ म्हणतात, ‘जो सदैव दक्ष असतो, त्याला साधक म्हणावे. तो नेहमी नित्यानित्य विवेक करतो आणि मीपणाचा संग सोडून सत्संग धरतो’, म्हणजे ‘सतर्कता’ हे साधकाचे लक्षण आहे. ‘प्रत्येक क्षणी जो काय योग्य आणि काय अयोग्य, याचा विचार करतो आणि कर्तेपण सोडून संतांच्या सत्संगात रहातो’, त्याला साधक म्हणावे’, असे समर्थांनी सांगितले आहे.
१ इ २. परात्पर गुरुदेवांनी साधकांना ‘प्रत्येक विचार, कृती आणि सेवा करतांना त्यातून साधना झाली का ?’, हे अंतर्मुख होऊन पहायला शिकवलेले असणे : आपल्यालाही परात्पर गुरुदेवांनी ‘प्रत्येक विचार, कृती आणि सेवा करतांना त्यातून साधना झाली का ? साधना होते का ?’, हे अंतर्मुख होऊन पहायला शिकवले आहे. ‘साधकांनी आपली साधना कशातून होते ?’, हे पहायला हवे आणि सावध अन् सतर्क राहून साधनेसाठी हानीकारक असणार्या, साधनेला धरून नसणार्या गोष्टी टाळायला हव्यात. आपल्या साधनेला पूरक असणार्या गोष्टींसाठी आपण प्रत्येक क्षणी सतर्क रहायला हवे.
१ इ ३. साधकांनी साधना करतांना बाळगायची सतर्कता
१ इ ३ अ. कर्तेपणा अंतर्मनापासून गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायला हवा ! : साधक बनण्यासाठी प्रत्येक क्षणी दक्ष असणे आवश्यक आहे. साधना करत असतांना अनेक चढ-उतार येत असतात. काही वेळा साधकांचे कौतुक होते, तर काही वेळा साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली जाते. जेव्हा कौतुक होते, तेव्हा आपण सावध रहायला हवे. ‘कौतुकाने हुरळून न जाणे आणि आपला अहं वाढू न देणे’, याकडे आपण लक्ष द्यायला हवे. तो कर्तेपणा अंतर्मनापासून गुरुदेवांच्या चरणी अर्पण करायला हवा.
१ इ ३ आ. साधकांकडून चुका झाल्यास त्यांनी त्यातून शिकून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायला हवे ! : जेव्हा साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली जाते, तेव्हा त्यांनी निराश न होता शिकण्याच्या स्थितीत राहून प्रयत्न करायला हवेत. ‘आपण साधनेत शिकून पुढे जाण्यासाठी आलो आहोत’, हे लक्षात घेऊया, तरच साधकत्वाचा ‘सतर्कता’ हा पैलू आपण आत्मसात केला, असे होईल. गुरुदेवांच्या चरणी लवकरात लवकर पोचण्यासाठी सतर्क राहून योग्य दिशेने वाटचाल करत रहायला हवे.
१ ई. माया आणि देहबुद्धी यांचा त्याग
१ ई १. मायेचा त्याग
१ ई १ अ. समर्थ पुढे म्हणतात, ‘साधक निर्धाराने संसार बाजूला सारतो, विवेकाने सर्व व्याप सोडून देतो आणि शुद्ध आचारांनी व्यवहारातून अनाचाराला हाकलून देतो.’
१ ई १ आ. गुरुदेवांनी साधकांमध्ये साधनामय दृष्टी निर्माण केली असणे : या सूत्राचा विचार करतांना आपल्या लक्षात येते, ‘सनातनच्या साधकांवर गुरुतत्त्वाची अपार कृपा आहे. आपण ज्या परिस्थितीत आहोत, त्यात आपण साधना कशी करू शकतो’, याचे मार्गदर्शन गुरुदेवांनी आपल्याला वेळोवेळी केले आहे आणि अजूनही करत आहेत. त्यांनी आपल्यात साधनामय दृष्टी निर्माण केली आहे. ‘माया म्हणजे भ्रम, सर्व अशाश्वत आहे’, हे त्यांनी आपल्या मनावर बिंबवले आहे. प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्याला मायारूपी जंजाळातून बाहेर काढून शाश्वत अशा भगवंताकडे, म्हणजे आनंदाकडे घेऊन जात आहेत. त्या माध्यमातून ते साधकांकडून मायेचा त्याग करवून घेत आहेत.
१ ई १ इ. साधकांनी मनाने मायेचा त्याग करायला हवा ! : समर्थांनी सांगितलेले साधकाचे हे लक्षण सनातनचे शेकडो साधक प्रत्यक्ष अनुभवत आहेत. साधना करायची ठरवल्यानंतर अनेक साधकांनी माया आणि मोहमयी प्रपंच यांचा त्याग केला आहे. ते गुरुधामी राहून पूर्णवेळ साधना करत अाहेत. अनेक साधक संसारात राहूनही अनासक्त आहेत. ‘साधना करणे’, हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. ‘स्थूलरूपाने ते जरी संसार आणि प्रपंच यांत गुंतलेले आहेत, असे दिसत असले, तरी प्रपंचातील कर्तव्ये पूर्ण करत ते अंतरातून साधना करत आहेत’, असेच लक्षात येते. आपण सर्वांनी स्वतःचे निरीक्षण करूया की, आपण देहाने नव्हे, तर मनाने मायेचा त्याग किती केला आहे ? मोहमयी प्रपंचातून अनासक्त झालो आहोत का ?’ साधकांनी मनाने मोहमायेपासून मुक्त होऊन गुरूंच्या भावबंधनात रहायला हवे.
१ ई २. देहबुद्धीचा त्याग
१ ई २ अ. साधकाचे लक्षण सांगतांना रामदासस्वामी पुढे सांगतात, ‘जो निश्चय करून स्वतःतील देहबुद्धीचा त्याग करून सतत श्रवण, मनन, चिंतन करतो, तो ‘साधक’ होय.’
१ ई २ आ. परात्पर गुरुदेव साधकांना विविध सेवांचे माध्यम उपलब्ध करवून देऊन त्यांच्याकडून देहबुद्धीचा त्याग करवून घेत असणे : परात्पर गुरुदेवांनी आपल्याला देहबुद्धीचा त्याग करण्यासाठी विविध सेवांचे माध्यम उपलब्ध करवून दिले आहे. आश्रमात राहून विविध सेवांच्या माध्यमातून वैयक्तिक गोष्टींचा त्याग करून, आवड-नावड बाजूला ठेवून रात्रंदिवस गुरुसेवेत स्वतःला समर्पित करण्याची संधी दिली आहे, तसेच घरी रहाणार्या साधकांना थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता झोकून देऊन गुरुकार्याचा प्रसार करण्याची संधी दिली आहे.
१ ई २ इ. साधकांनी ‘स्व’ अस्तित्व विसरून गुरुसेवेशी एकरूप होण्यासाठी किती तळमळीने प्रयत्न करतो ?’, याचे अवलोकन करावे ! : ‘गुरुदेवांनी उपलब्ध करून दिलेल्या प्रत्येक सेवेतून, साधनेच्या प्रयत्नांतून आपल्या देहबुद्धीचा त्याग होतो का ? साधक देहबुद्धी आणि ‘स्व’ अस्तित्व विसरून गुरुसेवेशी एकरूप होण्यासाठी किती तळमळीने प्रयत्न करतात ?’, याचे त्यांनी अवलोकन करावे अन् देहबुद्धीचा त्याग करण्यासाठी मिळालेली कोणतीही संधी न सोडता तळमळीने आणि झोकून देऊन प्रयत्न करावेत.
१ उ. शरणागती
१ उ १. पुढे समर्थ म्हणतात, ‘जो संतांना शरण जातो आणि ज्याला संतांनी ‘आपला’ म्हणून त्याचे हित करण्याचे आश्वासन दिले असेल, त्याला साधक असे म्हणतात.’
१ उ २. साधक जेव्हापासून सनातनशी जोडले गेले, तेव्हापासूनच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना अव्यक्त स्वरूपात त्यांचे हित करण्याचे आश्वासन दिले असणे : ‘परम प्रीतीमय, वात्सल्यसिंधु गुरुमाऊलीने आपल्या जीवनात प्रवेश केला’, यासारखी परम भाग्याची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. जेव्हापासून आपण सनातनशी जोडले गेलो, तेव्हापासूनच त्यांनी आपल्याला अव्यक्त स्वरूपात आपले हित करण्याचे, म्हणजेच साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करण्याचे आणि साधकांना त्याही पुढील स्थितीत नेण्याचे, म्हणजे मोक्ष प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गुरुदेवांनी दासबोधातील हे समर्थवचन पूर्ण केले आहे. आता आपल्याला केवळ आपल्या महान अवतारी गुरूंना सातत्याने शरण जाऊन साधक असल्याचे कर्तव्य पूर्ण करायचे आहे.
२. साधकांनी साधनामार्गात ठेवायचे ध्येय
२ अ. ‘साधकांनी साधकाची लक्षणे आत्मसात केली आहेत ना’, याचे आत्मपरीक्षण करून स्वतःतील उणिवा भरून काढण्यासाठी भावाची जोड देत प्रयत्न वाढवूया ! : समर्थ रामदासस्वामींनी साधकाची अनेक लक्षणे सांगितली आहेत. प्रत्यक्षात ते देत असलेले ज्ञान अनंत आहे. त्यांनी अजूनही पुष्कळ लक्षणे सांगितली आहेत; परंतु मुख्यत्वे आपल्या साधनेसाठी आवश्यक असलेली काही लक्षणे उलगडली आहेत. परात्पर गुरुदेवांनी आपल्याला ही सूत्रे वेळोवेळी सांगितलेलीच आहेत; परंतु ‘आपण जी साधक लक्षणे ऐकली, ती आपण किती आत्मसात केली आहेत ?’, याचे आपण आत्मपरीक्षण करायला हवे आणि स्वतःतील उणिवा भरून काढण्यासाठी भावाची जोड देत प्रयत्न वाढवायला हवेत.
२ आ. परात्पर गुरुदेवांनी जे शिकवले आहे, त्याप्रमाणे आचरण करणे, म्हणजे दासबोधाचेच आचरण करणे आहे ! : परात्पर गुरुदेवांनी आपल्याला जे शिकवले आहे, त्याप्रमाणे आचरण करणे, म्हणजे दासबोधाचेच आचरण करणे आहे. आपण सर्वांनी महान गुरुदेवांना अपेक्षित अशी सर्व साधक लक्षणे स्वतःत आत्मसात करायची आहेत. केवळ चांगला साधक बनणे, एवढेच आपले ध्येय नसून साधक ते शिष्य, सत्शिष्य, संत आणि त्यापुढील आध्यात्मिक स्तरांपर्यंत आपल्याला पोचायचे आहे’, याचे सतत स्मरण ठेवायला हवे.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (११.२.२०२२)
समर्थ रामदासस्वामींनी श्रीरामाला केलेली आर्त प्रार्थना – ‘कल्याण करी रामराया ।’ हिचा भावार्थ !
१. समाजाची बिकट स्थिती पाहून समर्थ रामदासस्वामींनी प्रभु श्रीरामाला समाजाचे हित करण्यासाठी कळवळून केलेली प्रार्थना !
‘अखिल मानवजातीच्या उद्धाराचा अवतारी गुरूंना, राष्ट्रगुरूंना किती कळवळा असतो, त्यांची किती तीव्र तळमळ असते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदासस्वामी ! समर्थांच्या काळी लोकांवर अनेक संकटे कोसळत होती. परकीय आक्रमणांनी लोक भयाकूल झाले होते. कुठेही आशेचा किरण दृष्टीस पडत नव्हता, तरीही सगळे जण अगदी निद्रिस्त होते. घराला आग लागलेली असूनही ते निवांत होते. समाजाची ही बिकट स्थिती पाहून समर्थ लोकांच्या कल्याणासाठी तळमळायचे. ते रामरायाला अत्यंत कळवळून प्रार्थना करायचे.
२. समर्थ रामदासस्वामींना मानवाच्या ऐहिक सुखासह त्याचे आत्मिक सुखही अभिप्रेत असणे
ते प्रभु रामचंद्राला लोकांचे कल्याण करण्यासाठी आर्त विनवणी करायचे, ‘कल्याण करी रामराया… । कल्याण करी रामराया… ।’ समर्थ रामदासस्वामींच्या वाणीतील चैतन्याने ओतप्रोत असलेली ही विनवणी म्हणजे त्यांचे करुणामृतच आहे. समर्थांनी ‘कल्याण’ हा शब्द मोक्षासाठी वापरलेला आहे. समर्थांना मानवाला ऐहिक सुखप्राप्ती होण्यासह आत्मिक सुखही लाभणे अभिप्रेत आहे आणि अशा सुखाची प्राप्ती हाच मनुष्य जीवनाचा अंतिम उद्देश आहे. संत ज्ञानेश्वरांनी जसे विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले, अगदी त्याचप्रमाणे समर्थ रामदासस्वामी सर्वसमर्थ रामारायाला मानवाच्या उद्धारासाठी कळवळून प्रार्थना करत असत. त्यांची ही प्रार्थना म्हणजे जणू प्रभु श्रीरामचंद्राकडे मागितलेले पसायदानच आहे. त्यांच्या या प्रार्थनेतील कारुण्य हृदयाला भिडणारे आहे. या प्रार्थनेतील कारुण्य त्यांच्या प्रत्येक शब्दातून अनुभवता येते.
३. समर्थ रामदासस्वामींनी श्रीरामाला केलेली आर्त प्रार्थना !
३ अ. कल्याण करी रामराया । जनहित विवरी ।।
प्रभु श्रीरामरायाला जनकल्याणार्थ आळवतांना समर्थ म्हणतात, ‘हे रामराया, तूच आता या सर्वांना मार्ग दाखव. अनेक संकटांनी कोलमडून गेलेल्या लोकांची तुझ्याविना कोण बरे काळजी घेणार ? त्यांना तुझ्याविना दुसरा आधार तरी कुणाचा आहे ? सर्व लोक दुःखाने त्रासले आहेत. त्यांच्या हिताचा विचार करून या संकटाच्या दरीतून तूच त्यांना बाहेर काढ. हे रामराया, या जनांचे कल्याण कर. सर्वांचे कल्याण करून त्यांना मुक्त कर. रामराया, त्यांना मुक्त कर !
३ आ. तळमळ तळमळ होतची आहे । हे जन हाति धरी दयाळा ।।
हे परम दयाळू रामराया, या लोकांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यांच्यावरील हे अत्याचार पाहून माझा जीव तळमळत आहे. या लोकांची ही स्थिती पाहून माझ्या जिवाची तगमग होत आहे. देवा, तूच त्यांना हाताला धरून योग्य मार्ग दाखव. ‘त्यांचे चांगले होईल’, असे बघ. त्यांचा सांभाळ कर. तुझ्याविना त्यांच्याकडे कोण बरे लक्ष देणार ? हे रामराया, धाव आता. कल्याण कर. रामा, कल्याण कर…
३ इ. अपराधी जन चुकतची गेले । तुझा तूचि सावरी दयाळा ।।
हे वात्सल्यस्वरूप रामराया, अनेक महाभयंकर संकटांनी ग्रासलेले आणि अगतिक झालेले हे सर्व लोक चुकांवर चुका करत आहेत. परकियांचे प्रहार सोसत पडलेल्या या निद्रिस्त समाजबांधवांना त्याची जाणीवही नाही. त्यांना जागे करूनही ते जागे हाेत नाहीत. हे रामा, तू सर्वज्ञ आणि सर्वसामर्थ्यवान आहेस. हे लोक दीनदुबळे आणि अपराधी आहेत. त्यांनी अनेक अपराध आणि पापे केली असूनही त्यांना त्याची जाणीव नाही. त्यांना त्याची खंतही नाही. हे रामराया, ते अज्ञानरूपी अंधःकारात भटकत आहेत. ते मायेच्या पसार्यात अडकून पडले आहेत. आता तूच त्यांना सांभाळ, सावर आणि त्यांना सन्मार्ग दाखव रामराया. हे रामराया, या सकल जनांचे तूच कल्याण कर !
३ ई. कठीण त्यावरी कठीण जाले । आतां न दिसे उरी दयाळा ।।
हे रामा, आधीच हा भवसागर पार करणे कठीण असते. त्यातच सभोवतालची परिस्थिती अगदी कठीण आहे. परकियांच्या अत्याचारांनी सगळे भरडले जात आहेत. त्यामुळे आहे ती परिस्थिती आणखीनच अवघड होत चालली आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी काय करावे ? त्यांनी कुठे जावे ? कुणाकडे जावे रामा ? तुझ्याविना त्यांना या सर्वांतून कोण सोडवेल ? रामा, तूच सर्वांना या महाभयंकर परिस्थितीतून बाहेर काढ ! हे रामा, सर्वत्र विनाशाचा वणवा पेटला आहे. कुणालाच त्यातून बाहेर पडायला मार्ग सापडत नाही. रामराया, तूच त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव. रामराया, त्यांच्यावर कृपा कर. त्यांचे कल्याण कर !
३ उ. ‘कोठे जावे काय करावे । आरंभिली बोहली दयाळा ।।’
या समाजाला दैन्यावस्थेतून, मायेच्या भोवर्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत. सगळ्यांचे जीवन सुखी आणि समाधानी व्हावे; म्हणून आम्ही त्यांना समजावतोय; पण कितीही प्रयत्न केले, तरी हे रामराया, जोपर्यंत तुझी कृपादृष्टी आमच्याकडे वळत नाही, तोपर्यंत आमच्या सामान्य प्रयत्नांना यश येणार नाही. तुझ्या केवळ एका कटाक्षाने सर्वकाही नीट होईल. तेव्हा हे दयाळा, दयावंत हो ! तुझ्या दयेचा ओघ आमच्यापर्यंत येऊ दे. एकदा का तू दया केलीस, एकदा का तुझी कृपा झाली की, कशाचीच न्यूनता (कमतरता) रहाणार नाही. यासाठी मी तुझ्याकडे मागणे मागतो, ‘रामराया, सर्वांचे कल्याण कर !’
३ ऊ. दास म्हणे आम्ही केले पावलो । दयेसी नाहीं सरी दयाळा ।।
हे रामराया, सगळे स्वकीय हतबल झाले आहेत. त्यांची ही स्थिती पाहून मी आता शांत बसू शकत नाही. हे माझ्या रामराया, करुणाघना, कृपा कर देवा ! या अपराधी जनांचा उद्धार कर ! हे करुणामय रामराया, तुझ्या करुणेचा, तुझ्या कृपेचा कटाक्ष, तुझी ती दिव्य वात्सल्यमय दृष्टी टाकून सर्वांचे कल्याण कर ! सर्वांना मुक्त करून त्यांचा उद्धार कर ! हे रामराया, माझी तुझ्या चरणी अनंत कोटी वेळा हीच प्रार्थना आहे. कल्याण कर रामराया, कल्याण कर !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (११.२.२०२२)