वैद्यकीय सेवेतील कर्मचार्यांना संप करावा लागणे हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! – संपादक
नागपूर – विविध मागण्यांसाठी राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी २३ फेब्रुवारीपासून २ दिवसांच्या संपावर गेले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये येथे (मेडिकल) आणि अधिष्ठाता (डीन) कार्यालयासमोर प्रदर्शन केले. आंदोलनकारी कर्मचार्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन केले. सध्या चालू झालेले आंदोलन २४ फेब्रुवारी या दिवशी कायम रहाणार असून नागपूर येथील ६ सहस्रांहून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत, असा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे.
कोविड महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतांना कोविड प्रभागात आधुनिक वैद्यांच्या खांद्याला खांदा लावून चतुर्थ श्रेणी कर्मचारी, लॅब असिस्टंट आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी काम करत होते. असे असतांनाही अजूनपर्यंत चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना भत्ते देण्यात आलेले नाहीत. त्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी सहस्रो चतुर्थी श्रेणी कर्मचार्यांनी ‘काम बंद’ आंदोलन चालू केले आहे.
कर्मचार्यांच्या मागण्या
कर्मचार्यांची जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करावी, कर्मचार्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, खासगीकरणाचे धोरण रहित करावे, अश्या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.