|
बीड – २६ जानेवारी या दिवशी एक महिला आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लिंबाच्या झाडावर चढली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील २ झाडे आणि न्यायालयासमोरील १ महाकाय वृक्ष प्रशासनाने तोडला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ३ झाडे मागील १० दिवसांत प्रशासनाकडून तोडण्यात आली आहेत. राज्यातील न्यून वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यात बीडचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने शासनाने कुर्हाडबंदीही केलेली आहे, असे असतांना येथील प्रशासनच वृक्षतोड करत असल्याने वृक्षप्रेमी नागरिक संतप्त झाले आहेत.
महिलेने झाडावर चढून आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला काही सूचना केल्या. या सूचनांनंतर आंदोलक महिला ज्या झाडावर चढली ते झाडच वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करत सार्वजनिक बांधकाम विभागाने हे झाड तोडले. (५० हून अधिक वर्षांपूर्वीच्या तीनही झाडांपासून आजपर्यंत वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही; मात्र आंदोलक महिला झाडावर चढल्यानंतर ते झाड प्रशासनासाठी अडचणीचे कसे बनले ? क्षुल्लक कारणासाठी एवढा मोठा निर्णय कुणी घेतला त्यांना याविषयी विचारणे अपेक्षित आहे. – संपादक) ‘महिला आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढली आणि ते तोडण्यात आले, त्याप्रमाणे उद्या कुणी प्रशासकीय इमारतीवर चढून आंदोलन केल्यास ती इमारत पाडली जाणार का ?’, असा प्रश्न वृक्षप्रेमी नागरिकांनी या वेळी उपस्थित केला.