कोल्हापूर, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – संयुक्त उत्तरेश्वर शुक्रवार पेठ ‘शिवाई ग्रुप’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्म काळ साजरा करण्यात आला. या वेळी संयुक्त उत्तरेश्वर पेठ-शुक्रवार पेठेतील ‘शिवाई ग्रुप’च्या वतीने सौ. यशश्री घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुले-मुली यांनी शिवजन्मोत्सवानंतर शिवगर्जना सादर केली. या प्रसंगी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महापालिका आयुक्त सौ. कादंबरी बलकवडे, भाजप प्रदेश प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक यांसह अन्य उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक भारतीयाला प्रेरक वाटत आले आहे ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप
सांगली, २१ फेब्रुवारी – महाराष्ट्र धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केले. एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहून महाराज त्याची निवड करत होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक भारतीयाला प्रेरक वाटत आले आहे, असे विचार भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रकाशतात्या बिरजे, नगरसेवक संजय कुलकर्णी, रविंद्र बाबर, सचिन बालनाईक, सचिव अतुल माने, आबा जाधव, श्रीधर जाधव यांसह अन्य उपस्थित होते.
मिरज – मिरज शहरात भाजप आमदार श्री. सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी करणभैया प्रदीप कोरे, नगरसेवक पांडुरंग कोरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव जयगोंड कोरे, अनिलअण्णा रसाळ, शशिकांत वाघमोडे, मिरज शहर अध्यक्ष राजेंद्र नातू, आकाश सुतार, बंडू कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस,महापौर दिग्विजय सूर्यवंशी, तसेच मान्यवर उपस्थित होते.