दापोली येथील पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
दापोली – दापोली आणि मंडणगड या दोन्ही शहरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहेत. या योजना राबवण्यासाठी दापोलीसाठी ५० कोटी रुपये, तर मंडणगडसाठी ३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर दोन्ही नगरपंचायतींना राज्य नगरोत्थान निधीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. १९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले,
१. दापोली शहरात नाट्यगृहासाठी विकास आराखड्यात जागा संमत असून तेथे नाट्यगृह न करता ‘मल्टिपर्पज हॉल’ जसा आम्ही वेंगुर्ला (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे केला आहे, तसा करावा, यासाठी एक आराखडाही सिद्ध करावा, असा पर्याय आपण सुचवला आहे.
२. दापोली येथे असलेल्या म्हाडाच्या जागेत १६० घरे उभारण्यात येणार आहेत. त्यातील १०० घरे ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून ६० घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी असतील. त्यासाठी १८ कोटी रुपये संमत झाले असून त्या घरांचा दर लवकरच म्हाडा घोषित करेल.