कर्णावती (गुजरात) – येथे २६ जुलै २००८ या दिवशी झालेल्या बाँबस्फोट मालिकांच्या प्रकरणाच्या संदर्भात निकाल देतांना विशेष न्यायालयाने म्हटले, ‘‘प्रकरणातील ३८ दोषी हे फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत; कारण अशा दोषींना समाजात राहू देणे; म्हणजे नरभक्षक वाघाला उघड्यावर सोडण्यासारखे आहे. हे आतंकवादी कोणताच विचार न करता लहान मुले, युवक अथवा वयस्कर अशा निर्दाेष लोकांना ठार करतात.’’
१. विशेष न्यायाधीश ए.आर्. पटेल यांनी त्यांच्या आदेशामध्ये पुढे म्हटले आहे, ‘दोषींनी अशांती निर्माण करून राष्ट्रविरोधी कारवाया घडवून आणल्या. अशांना घटनात्मक पद्धतीने निवडून आलेल्या केंद्र आणि गुजरात सरकार यांच्याप्रती कोणताच आदर नसून यांच्यापैकी काही जण सरकार आणि न्याययंत्रणा यांच्यापेक्षा केवळ अल्लावर विश्वास ठेवतात.’
२. जुलै २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या मालिकांमध्ये ५६ लोक ठार झाले होते, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले होते. या प्रकरणी ३८ दोषींना फाशी, तर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही पहिलीच वेळ आहे की, एकाच प्रकरणात एवढ्या लोकांना फाशी सुनावण्यात आली.
३. न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रात म्हटले आहे की, जर आक्रमणात साहाय्य करणार्या ११ जणांना आजन्म कारावासापेक्षा अल्प शिक्षा केली, तर ते पुन्हा अशा प्रकारची आक्रमणे प्रत्यक्ष करण्याची अथवा आक्रमण करणार्यांचे साहाय्य करण्याची दाट शक्यता आहे.