अविनाश ठाकरे समितीकडून २०० पानांचा चौकशी अहवाल महापौरांना सादर !

  • नागपूर महापालिका स्टेशनरी घोटाळा प्रकरण !

  • ठपका ठेवण्यात आलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई होणार !

भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी ! – अविनाश ठाकरे, प्रमुख, चौकशी समिती

चौकशी समितीचे प्रमुख अविनाश ठाकरे म्हणाले की, स्टेशनरी भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी असल्यामुळे चौकशीसाठी अधिक वेळ हवा होता. समितीने अल्प वेळात प्राथमिक तथ्य अहवालात समाविष्ट केले. निवृत्त न्यायाधीश एस्.पी. मुळे यांचे मार्गदर्शन लाभले.

अविनाश ठाकरे समितीतर्फे महापौर दयाशंकर तिवारी यांना अहवाल देताना

नागपूर – येथील महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा प्रकरणी २०० पानांचा चौकशी अहवाल अविनाश ठाकरे समितीने महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे नुकताच सुपुर्द केला आहे. या अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत तिवारी यांनी दिले आहेत.

महापालिकेत सध्या स्टेशनरी घोटाळा प्रकरण गाजत असून प्रतिदिन नवे खुलासे होत आहेत. कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता बनावट आस्थापनांच्या नावे कोट्यवधी रुपये उचलण्यात आले आहेत. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला. २०० पानांच्या या अहवालात १७ पाने निष्कर्षांची आहेत. समितीच्या १४ बैठका झाल्या असून घोटाळ्याशी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्यात आली आहे, असे समितीचे प्रमुख अविनाश ठाकरे यांनी सांगितले. ४ मार्च या दिवशी महापालिकेचा कार्यकाळ संपत असल्यामुळे समितीने प्राथमिक अहवाल दिला. तो महापालिकेच्या सभेत ठेवला जाईल आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे तिवारी यांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात ५ कर्मचारी आणि अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे. (असे भ्रष्टाचारी कर्मचारी आणि अधिकारी यांना नुसते निलंबित न करता त्यांना बडतर्फ करून त्यांच्याकडून घोटाळ्यातील रक्कम वसूल केली पाहिजे ! – संपादक)