आचारधर्माविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘आध्यात्मिक त्रास होत असल्यास ते दूर व्हावेत आणि पुढेही होऊ नयेत, यांसाठी करण्यात येणार्या उपायांना ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय’, असे म्हणतात. सध्या बहुतेकांनाच अल्प-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास आहे. ‘खडे मीठमिश्रित पाण्याने किंवा गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान करणे’, हा आध्यात्मिक स्तरावरील प्रभावी उपाय आहे. ‘खडे मीठमिश्रित पाण्याने किंवा गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणे
या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास (टीप) असलेला १ साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला १ साधक सहभागी झाले होते. पहिल्या प्रयोगात त्यांना १ बालदी साध्या पाण्यात १०० ग्रॅम खडे मीठ घालून त्या पाण्याने स्नान करण्यास सांगण्यात आले. त्यांनी खडे मीठमिश्रित पाण्याने स्नान करण्यापूर्वी आणि स्नान केल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.
दुसर्या प्रयोगात त्यांना १ बालदी साध्या पाण्यात १० मि.ली. गोमूत्र (सनातन-निर्मित गोमूत्र-अर्क) घालून त्या पाण्याने स्नान करण्यास सांगण्यात आले. त्यांनी गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान करण्यापूर्वी आणि स्नान केल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.
टीप – आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
१ अ. खडे मीठमिश्रित पाण्याने आणि गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी होणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. त्याने खडे मीठमिश्रित पाण्याने आणि गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्यावर त्याच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा न्यून झाली आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.
टीप १ – तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये आरंभी अल्प प्रमाणात ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. त्याने खडे मीठमिश्रित पाण्याने आणि गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान करण्यापूर्वी त्याच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी अनुक्रमे ८० आणि १२० अंशाचे कोन केले. (‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.)
टीप २ – दोन्ही प्रकारे स्नान केल्यानंतर साधकामध्ये ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. (तेव्हा साधकाच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी ० अंशाचा कोन केला.)
१ आ. खडे मीठमिश्रित पाण्याने आणि गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्यानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकातील सकारात्मक ऊर्जा वाढणे : आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. त्याने खडे मीठमिश्रित पाण्याने आणि गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्यानंतर त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. खडे मीठमिश्रित पाण्याने स्नान केल्याने व्यक्तीच्या स्थूलदेहाची शुद्धी होणे : खडे मिठात रज-तमात्मक लहरींना खेचून घेऊन त्या घनीभूत करून ठेवण्याची क्षमता असते. खडे मिठाभोवती असणारा आपतत्त्वयुक्त सूक्ष्म कोष हा बाह्य वातावरणातील रज-तमाला खेचून घेण्यात अग्रेसर असतो. अंघोळीच्या पाण्यात मीठ घातल्याने मिठाच्या संपर्काने देहातून खेचून घेतलेल्या रज-तमात्मक लहरी लगेचच पाण्यात विसर्जित होतात आणि त्यांची कार्य करण्याची तीव्रता लगेचच न्यून होते. पाण्याच्या संपर्कामुळे मिठातील रज-तम लगेचच पाण्यात सोडले जाते; त्यामुळे व्यक्तीच्या स्थूलदेहाची शुद्धी होते.
२ आ. गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्याने व्यक्तीच्या देहाभोवती चैतन्याचे कवच निर्माण होऊन देहाभोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होणे : गोमूत्रातील सात्त्विकता आणि अंघोळीच्या पाण्यातील गोमूत्रात आकृष्ट झालेले देवतातत्त्व यांमुळे व्यक्तीच्या देहाभोवती चैतन्याचे कवच निर्माण होते. हे कवच हळूहळू देहातील सर्व त्रासदायक स्पंदने आणि देहाभोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट करते. गोमूत्रातील सात्त्विकतेमुळे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होतात.
२ इ. खडे मीठमिश्रित पाण्याने आणि गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्याने चाचणीतील साधकांना पुढीलप्रमाणे आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे
२ इ १. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक : या साधकाला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. त्याच्याभोवती त्रासदायक शक्तीचे (नकारात्मक स्पंदनांचे) आवरण आहे. या साधकाला त्रास देणार्या वाईट शक्तीने साधकाच्या देहात त्रासदायक शक्तीचे स्थान निर्माण करून त्यामध्ये त्रासदायक शक्ती साठवली आहे. साधकाने खडे मीठमिश्रित पाण्याने आणि गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्यावर त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी झाली.
२ इ २. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक : या साधकाला आध्यात्मिक त्रास नाही. त्याच्यामध्ये नकारात्मक स्पंदने नसून सकारात्मक स्पंदने होती. साधकाने खडे मीठमिश्रित पाण्याने आणि गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्यावर त्याच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.
थोडक्यात ‘खडे मीठमिश्रित पाण्याने किंवा गोमूत्रमिश्रित पाण्याने स्नान केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील उपायांचा लाभ होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.२.२०२०) ई-मेल : [email protected]
|