‘गुरुमाऊली, तुझ्या कृपेमुळे मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’ या ग्रंथाशी संबंधित सेवा करण्याची संधी मिळाली. ही सेवा करतांना ‘प्रत्येक सेवा आणि प्रसंग यांच्या माध्यमातून साधक घडावा अन् पुढे जावा’, ही तुला असलेली तीव्र तळमळ प्रकर्षाने जाणवली. या सेवेच्या कालावधीत तुझी सर्वज्ञता, प्रत्येक क्षणी तू माझी घेतलेली काळजी आणि सकारात्मक रहाण्यासाठी दिलेली प्रेरणा पदोपदी अनुभवता आली. तू दिलेली अनुभूतीपुष्पे तुझ्या चरणी कृतज्ञतेने अर्पण करत आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रकृतीविषयी विचारणा करणे आणि त्रास सहन करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जाही देणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’ या ग्रंथाशी संबंधित सेवा चालू होण्याच्या आदल्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तेव्हापासून माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरुदेवांनी मला प्रकृतीविषयी का विचारले असावे ?’ त्यानंतर २ दिवसांनी मला पुष्कळ थकवा, शरिरातील हाडे, नसा आणि स्नायू दुखणे, डोळे जड होणे, सर्वांग पिळवटून गेल्यासारखे वाटणे, असे शारीरिक त्रास होऊ लागले. काही कालावधीनंतर मला सेवेला बसणेही अशक्य होत होते. या त्रासासाठी मी औषधे आणि वेदनाशामक गोळ्या घेणे अन् आध्यात्मिक स्तरावरील उपाय चालू केले; पण त्याचा काही परिणाम होत नव्हता. या त्रासामुळे मला दिवसा ४.३० घंटे झोपून रहावे लागले. तेव्हा ‘आज सेवा झाली नाही’, असा विचार येऊन मला वाईट वाटायचे. तेव्हा सहसाधिका सौ. अवंतिका दिघे मला म्हणाल्या, ‘‘गुरुस्मरण कर. त्यांनी काय सांगितले ते आठव.’’ तेव्हा ‘गुरुदेवांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस का केली ?’, याचा मला उलगडा झाला. ‘मला शारीरिक त्रास होणार आहे’, हे त्यांना आधीच ठाऊक होते. त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करून ‘मला त्रास सहन करण्याची आध्यात्मिक ऊर्जा आधीच दिली’, याची जाणीव झाली.
२. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्राणांतिक त्रास आनंदाने भोगणे
माझ्या मनात विचार आला, ‘श्रीरामाने १४ वर्षांचा खडतर वनवास भोगला. त्या वेळी श्रीराम म्हणाला, ‘‘हे माझे प्रारब्ध आहे.’’ ‘साक्षात् श्रीविष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाला कसले आले प्रारब्ध ?’ मनुष्यापुढे आदर्श ठेवण्यासाठी श्रीरामाने सार्या हालअपेष्टा आनंदाने भोगल्या. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भातही असेच घडत आहे. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे साक्षात् श्रीविष्णूचे अवतार आहेत.’ मग त्यांना कसले आले प्रारब्ध ? त्यांनी वर्ष २००७ पासून साधकांवर होणारी अनिष्ट शक्तींची आक्रमणे स्वतःवर झेलली. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ते अत्यल्प प्राणशक्ती किंवा मृत्यूसदृश्य स्थिती आदी त्रास आनंदाने भोगत आहेत.
(क्रमश: सोमवारच्या अंकात)
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०१७)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/554998.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |