कोरोनाचे रुग्ण घटत असल्याने अतिरिक्त निर्बंध मागे घ्या ! – केंद्र सरकारची राज्यांना सूचना  

नवी देहली – देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या घसरत चाललेल्या संख्येचा आढावा घेऊन कोरोनाविषयीचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना केली आहे. आसाम आणि हरियाणा या राज्यांनी आधीच अतिरिक्त निर्बंध मागे घेतले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे, ‘कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीनंतर अनेक राज्यांनी त्यांच्या सीमा आणि विमान प्रवास यांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले. जनता आरोग्य संकटाला तोंड देत असतांना या उपाययोजना करणे आवश्यक आहे; मात्र राज्यातील प्रवेशद्वारांवर तेथील सरकारांनी लागू केलेल्या अतिरिक्त निर्बंधांमुळे प्रवास आणि आर्थिक व्यवहार यांना अडथळा येऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी.’