साधकांची साधना होण्यासाठी जीवनातील प्रत्येक प्रसंगात त्यांची काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हेच साधकांचे खर्‍या अर्थाने माता-पिता आहेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या कौतुकाचा भावार्थ काही काळ गेल्यावर लक्षात येणे

‘आमचा विवाह झाल्यावर मी आणि माझी पत्नी सौ. रूची प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना (परात्पर गुरुदेवांना) भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी ‘सुयोग्य जोडी आहे’, असे म्हणून आमचे कौतुक केले होते. त्या वेळी त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ आमच्या लक्षात आला नाही. त्या वेळी ‘आम्ही दोघे एकमेकांना अनुरूप असणार म्हणून त्यांनी असे विधान केले असावे’, असे आम्हाला वाटले. काही काळानंतर आम्ही स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवायला आरंभ केला. त्या वेळी ‘माझ्यात ज्या गुणांचा अभाव आहे, ते गुण रूचीत आहेत आणि तिच्यात ज्या गुणांचा अभाव आहे, ते गुण माझ्यात आहेत’, असे आमच्या लक्षात आले, उदा. रूचीमध्ये नियोजनकौशल्य आहे; पण माझ्यात या गुणाचा अभाव आहे. त्यामुळे आम्ही उभयतांनी स्वभावदोष निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेत एकमेकांचे साहाय्य घेण्यास आरंभ केला अन् परात्पर गुरुदेवांच्या त्या वाक्याचा खरा अर्थ आम्हाला समजला. त्यावरून आम्हाला ‘एकमेकांचे स्वभावदोष आणि गुणवैशिष्ट्ये यांच्याकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन कसा असावा ?’ आणि ‘साधनेत पुढे जाण्यासाठी एकमेकांच्या गुणांचा लाभ कसा करून घ्यावा ?’, हे शिकायला मिळाले.

श्री. वाम्सीकृष्णा गोल्लामुडी

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वज्ञतेमुळे त्यांना साधकांच्या अंतर्मनातील विचार समजणे आणि त्यांनी साधकाला त्याविषयी मार्गदर्शन करणे

रूची ६ मासांची गरोदर असतांना आम्हाला प.पू. गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्या वेळी माझ्या मनात हे नवीन कौटुंबिक दायित्व स्वीकारण्याच्या संदर्भात संघर्ष होत होता. ‘माझा पुष्कळ वेळ कुटुंबियांची काळजी घेण्यात जाईल आणि त्यामुळे सेवा अन् साधना यांवर लक्ष केंद्रित करता येणार नाही’, असे मला वाटत होते. वास्तविक त्या सत्संगात मी कोणताही प्रश्न विचारला नाही; मात्र प.पू. गुरुदेवांनी माझ्या मनातील विचार ओळखला. ते मला म्हणाले, ‘‘ईश्वरप्राप्तीचे ‘निवृत्ती’ आणि ‘प्रवृत्ती’ असे दोन मार्ग असतात. यांपैकी निवृत्ती मार्गाचा साधक साधनेसाठी मायेचा त्याग करतो अन् प्रवृत्ती मार्गाचा साधक कुटुंबात राहून साधना करतो. तुमचा प्रवृत्ती मार्ग असल्याने तुम्हाला पत्नी, मुलगा आणि समाज यांच्या समवेत राहून साधना करावी लागेल.’’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सहज बोलण्यातून साधकाच्या मनात हिंदु धर्म आणि धर्माचरण यांविषयी प्रेम निर्माण करणे

वर्ष २००७ मधे मला प.पू. गुरुदेवांना भेटायची संधी मिळाली. त्या भेटीत ते सहजच म्हणाले, ‘‘आपला धर्म किती महान आणि अद्भुत आहे ना ?’’ त्यानंतर माझ्या मनात हिंदु धर्म आणि धर्माचरण करण्याविषयी पुष्कळ विचार येऊ लागले. प.पू. गुरुदेवांनी त्यांच्या सहज बोलण्यातून मला संपूर्णपणे नवीन जीवन जगण्याचा एक मार्ग दाखवला. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी अतीव कृतज्ञता दाटून आली.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांच्यातील नम्रता दिसणे

एकदा मी आणि माझी पत्नी प.पू. गुरुदेवांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी त्यांनी स्वतः आम्हाला बसायला दोन आसंद्या आणल्या आणि त्यानंतर आम्हाला मार्गदर्शन केले.

५. भारतात परत येण्याचा निर्णय घेण्यात येणार्‍या अडचणींत परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा अनुभवणे

५ अ. भारतात परत येण्याचा विचार मनात येणे; परंतु निर्णय घेण्यात अडचणी येणे : वर्ष २०१३ मध्ये मला ‘साधनेसाठी भारतात परत जावे’, असे वाटू लागले; मात्र माझ्या मनात त्याविषयी संघर्ष चालू होता आणि ‘त्यातून कसे बाहेर पडावे ?’, हे मला समजत नव्हते. ‘माझ्या व्यावहारिक दायित्वांमुळे मी मेलबर्नमध्ये अडकलो आहे आणि त्यामुळे भारतात परत जाण्यात काही अर्थ नाही अन् अशा प्रकारचा विचार प्रत्यक्षात येणे अशक्य आहे’, असेही मला वाटत होते. वर्ष २०१४ मध्ये श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क मेलबर्न येथे आले होते. त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनीच मला माझ्या कुटुंबियांच्या समवेत भारतात परतण्याविषयी समजावले. त्यामुळे माझ्या मनात भारतात परत येण्याचे विचार येऊ लागले. ‘या विचारांमागे परात्पर गुरुदेवांची प्रेरणा आहे’, हे लक्षात आल्याने मला त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी भारतात परत येण्यासाठी विविध पर्याय शोधू लागलो; परंतु हे सर्व पर्याय अयशस्वी ठरत होते. त्यामुळे मी निराश झालो. वर्ष २०१५ मध्ये श्री. शॉन आणि सौ. श्वेता क्लार्क पुन्हा मेलबर्नला आले. त्या वेळी त्यांनी मला ‘रूचीला भारतात पाठवून द्यावे’, असे सुचवले; मात्र याविषयी ‘रूचीला कसे समजवावे ?’, हे मला कळत नव्हते. त्यामुळे मी परात्पर गुरुदेवांना शरण गेलो. मला ‘या परिस्थितीत तेच मला मार्ग दाखवतील’, अशी माझी श्रद्धा होती.

सौ. रूची गोल्लामुडी

५ आ. भाड्याची घरे सतत पालटावी लागल्याने कंटाळून पत्नीने भारतात घर घेण्याची सिद्धता दर्शवणे आणि त्याच वेळी ‘आम्ही भारतात परत येऊ’, असे परात्पर गुरुदेवांनी सांगणे : येणार्‍या आपत्काळाचा विचार करून आम्ही मेलबर्नमध्ये असतांना स्वतःचे घर न घेता भाड्याच्या घरात रहात होतो. आम्हाला ५ वेळा घरे पालटावी लागली. सतत घरे पालटत राहिल्याने आम्हाला आर्थिक हानीही सोसावी लागत होती. त्यामुळे आम्हाला पुन्हा घर पालटायची इच्छा नव्हती. ‘अधिक काळ रहाता येईल’, याच अटीवर आम्ही नवीन घरात जायचे ठरवले. आम्ही ज्या नवीन घरात रहायला गेलो, त्या घराच्या मालकाला ते घर विकायचे असल्याने त्याने ११ मासांनंतर आम्हाला ते घर सोडून जाण्याविषयी सांगितले. त्या दिवशी रूचीला हा प्रसंग स्वीकारता न आल्याने ती अतिशय निराश झाली. भारतात रहाण्यासाठी कायमचे घर मिळत असल्यास तिथे परत जाण्याची तिची सिद्धता असल्याचे तिने मला सांगितले. त्याच दिवशी आम्हाला श्री. शॉन आणि सौ. श्वेता यांचा दूरभाष आला. त्यांनी ‘सौ. रूची आणि श्री. वाम्सी लवकरच भारतात परत येतील’, असे परात्पर गुरुदेवांनी सांगितल्याचे आम्हाला सांगितले.

५ इ. गोव्यात आल्यावर एका आठवड्यात घर मिळणे : त्यानंतर आश्रमाच्या जवळ घर शोधण्यासाठी मी गोव्याला येण्याचे ठरवले. मला केवळ १ आठवडा सुटी मिळाली होती. माझ्याकडे वेळ अल्प असल्यामुळे मी मेलबर्न येथूनच घरांचा शोध घ्यायला आरंभ केला होता; पण गोव्याला आल्यावर मेलबर्न येथे असतांना पाहिलेले कोणतेही घर मला आवडले नाही. त्यानंतर मला एका आठवड्यातच आश्रमाच्या जवळ माझ्या आवडीचे घर मिळाले. ही सर्व परात्पर गुरुदेवांची कृपा होती. ‘ज्या वेळी परात्पर गुरुदेव एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा तिच्याशी संबंधित प्रत्येक घटक अनुकूल होत जातो’, याची मला जाणीव झाली.

५ ई. परात्पर गुरुदेवांनी साधकाची परिस्थिती स्वीकारण्यासाठी सिद्धता करून घेणे : त्यानंतर माझी पत्नी सौ. रूची आणि मुलगा कु. तेज भारतात परत आले. मी माझे काम संपवून फेब्रुवारी २०१७ मध्ये परत येणार होतो. तत्पूर्वी मी रामनाथी आश्रमात आलो असतांना ‘माझे फेब्रुवारी २०१७ मध्ये परत येण्याचे नियोजन आहे’, असे परात्पर गुरुदेवांना कळवले. हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. त्यानंतर त्यांनी मला कळवले, ‘‘तुम्हाला काही कारणांसाठी मेलबर्नमध्ये अधिक काळ थांबावे लागेल.’’ मी मेलबर्नला परत गेलो. तेव्हा गुरुदेवांनी म्हटल्याप्रमाणेच झाले. आस्थापनात मी ज्या प्रकल्पावर काम करत होतो, त्या आस्थापनाने तो प्रकल्प बंद केला होता. याच प्रकल्पासाठी मी भारतात येऊन काम करणार होतो. परिस्थितीमध्ये अकस्मात् पालट होऊनही मला आश्चर्य वाटले नाही. मला शरणागतभावाने ही परिस्थिती सहज स्वीकारता आली.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– श्री. वाम्सीकृष्णा गोल्लामुडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०१९)


उर्वरित भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/553936.html

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक