श्री. वाम्सीकृष्णा गोल्लामुडी यांच्या जीवनातील परात्पर गुरुदेवांच्या कृपेच्या प्रसंगांमधील काही प्रसंग आपण १७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी पाहिले. आज आपण या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/553653.html
५. भारतात परत येण्याचा निर्णय घेण्यात येणार्या अडचणींत परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा अनुभवणे
५ उ. परात्पर गुरुदेवांनी कार्यालयात होणार्या त्रासाच्या काळात त्याची आध्यात्मिक स्तरावर काळजी घेणे : मी जेथे चाकरी करत होतो, तेथे नवीन वरिष्ठ अधिकारी महिला आल्या होत्या. त्या मला कार्यालयात पुष्कळ त्रास देत असत, तसेच त्या सतत माझ्या ज्ञानाला न्यून लेखत असत. आस्थापनाला माझ्या कामाचा काहीही लाभ होत नाही, हे दाखवण्याचा त्या प्रयत्न करत असत. त्यांना स्वतःच्या पसंतीच्या एका व्यक्तीला माझ्या पदावर नेमायचे होते. त्यामुळे मला चाकरीवरून काढण्यासाठी त्या अनेक प्रयत्न करत असत. मी या आस्थापनात ८ वर्षे काम केले असल्यामुळे त्यांना ते सहजासहजी शक्य होत नव्हते. यामुळे प्रतिदिन मला पुष्कळ ताण येत असे. त्या वेळी मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करत असे की, ‘माझ्या मनात कार्यालयातील स्थितीमुळे चाकरी गमावण्याचे आणि पैसे नसल्यास कुटुंबियांची काळजी कशी घेता येणार ? अशा प्रकारचे असुरक्षिततेचे विचार येतात. हे विचार माझ्यातील ‘हे माझे आयुष्य असून त्यावर माझे नियंत्रण आहे’, या कर्तेपणामुळे येत आहेत. प्रत्यक्षात आपल्याच हातात माझ्या आयुष्याची दोरी असून माझे जीवन वा मृत्यूही आपल्याच इच्छेने होणार आहे, अशी मला अनुभूती घेता येऊ दे.’
५ ऊ. आकाशात ‘एक ऋषी मला आशीर्वाद देत आहेत’, असे दिसणे आणि त्याच वेळी भारतात परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी आठवण काढत असल्याचे समजल्याने कृतज्ञतेने अश्रू येणे : एके दिवशी मी कार्यालयात जातांना सहज माझी दृष्टी आकाशाकडे गेली. त्या वेळी ‘एक ऋषी मला आशीर्वाद देत आहेत’, असे मला दिसले आणि त्यानंतर माझा आपोआप ‘परम पूज्य’ असा नामजप होऊ लागला. त्या दिवशी संध्याकाळी कार्यालयातून परत येतांना रामनाथी (गोवा) आश्रमातून माझी पत्नी सौ. रूची हिचा मला भ्रमणभाष आला. एका साधकाने ‘परात्पर गुरुदेव माझी आठवण काढत होते’, असे तिला सांगितल्याचे तिने मला सांगितले. ‘परात्पर गुरुदेवांच्या दृष्टीतून काहीही सुटत नाही’, याची सत्यता पटवणार्या या अनुभूतीमुळे माझ्या डोळ्यांत कृतज्ञतेने अश्रू आले.
५ ए. साधनेला अधिक वेळ देता यावा, यासाठी परात्पर गुरुदेवांनी व्यवहारात येणार्या अडचणींची काळजी घेणे : ‘एकदा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या जिज्ञासूंसाठी परात्पर गुरुदेवांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. मीसुद्धा या सत्संगाला उपस्थित होतो. त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘चाकरीतील कार्याचे दायित्व आणि सातत्याने करावा लागणारा प्रवास यांमुळे इतर साधकांसारखी मला सेवा करता येत नाही, याचे वाईट वाटते.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका. हे तात्कालिक आहे. लवकरच सगळे पालटेल.’’ त्यांचे हे शब्द काही मासांतच खरे झाले. मला दुसरी चाकरी मिळाल्याने मी या चाकरीचे त्यागपत्र दिले. नवीन चाकरीतील कामाच्या स्वरूपामुळे मला साधनेसाठी पुष्कळ वेळ मिळू लागला.’
६. साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘परात्पर गुरुदेवांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझी काळजी घेतली आहे. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. पूर्वी माझ्या स्वार्थी वृत्तीमुळे मी केवळ स्वतःची आध्यात्मिक पातळी आणि प्रगती यांच्याविषयी विचार करत असे; पण गुरुदेवांच्या कृपेने मला माझी चूक लक्षात आली आहे. परात्पर गुरुदेवांनी ज्या प्रकारे माझी काळजी घेतली आहे, त्याविषयी वाटत असलेल्या कृतज्ञतेमुळे माझ्या मनात त्यांची सेवा करण्याचे विचार येत आहेत. ‘मी करत असलेल्या सेवेमुळे त्यांच्या समष्टी कार्यात फारसा काही लाभ होणार नाही’, याची मला जाणीव आहे. त्यांच्या या व्यापक समष्टी कार्यात माझी सेवा म्हणजे ‘एखाद्या मुंगीने लहानसा मातीचा कण हलवल्यासारखे आहे.’
‘परात्पर गुरुदेव, मी करत असलेली सेवा मुंगीसारखी अल्प आहे. तिचा स्वीकार करावा आणि मला आपल्या चरणकमलांशी एकरूप करवून घ्यावे’, अशी आर्त प्रार्थना करतो.’
– श्री. वाम्सीकृष्णा गोल्लामुडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०१९)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |