‘फेब्रुवारी २०२१ मध्ये मला ‘माझ्या छातीत गाठ आली आहे’, असे लक्षात आले. मी आधुनिक वैद्यांकडे तपासणीसाठी गेले. त्यांनी मला ‘सोनोग्राफी’ आणि रक्ताची चाचणी करायला सांगितली. त्यांचे अहवाल आल्यानंतर आधुनिक वैद्य कोळेकर यांनी मला डेरवण, तालुका चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील वालावलकर रुग्णालयातील आधुनिक वैद्य देसाई यांच्याकडे पाठवले. अहवाल पाहून त्यांनी मला रुग्णालयात भरती करून घेतले. ते आम्हाला म्हणाले, ‘‘दोन दिवसांनी गाठीचे शस्त्रकर्म करूया.’’
१. शस्त्रकर्माच्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितल्याप्रमाणे सतत नामजप करणे, शस्त्रकर्म झाल्यानंतर शुद्धीवर आल्यावर साधिकेला ‘नामजप चालू आहे’, असे लक्षात येणे आणि ‘ईश्वर आपली किती काळजी घेतो !’, असे वाटणे
२.३.२०२१ या दिवशी मला शस्त्रकर्म करण्यासाठी शस्त्रकर्म कक्षात नेले आणि सकाळी ७ वाजता माझे शस्त्रकर्म चालू झाले. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितल्याप्रमाणे मी सतत नामस्मरण करत होते. शस्त्रकर्मासाठी जवळजवळ ४ ते ५ घंटे लागले. सकाळी ११.३० वाजता मला अतिदक्षता विभागात आणले. रात्री ९ वाजता मी शुद्धीवर आले. तेव्हा ‘माझा श्रीकृष्णाचा नामजप चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘ईश्वर आपली किती काळजी घेतो !’, असे मला वाटले. ईश्वरकृपेमुळे मला कुठलाही त्रास झाला नाही.
२. अंथरुणात फुलपाखरू झोपले असल्याचे लक्षात आल्यावर ‘ईश्वर समवेत आहे’, याची जाणीव होणे
रुग्णालयात महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या अंथरुणात फुलपाखरू येऊन झोपले होते. सकाळी परिचारिकेला माझ्या पलंगावरील चादर पालटतांना ते लक्षात आले. ती मला म्हणाली, ‘‘फुलपाखराला जवळ घेऊन झोपलीस का ?’’ तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘माझा ईश्वर (त्याच्या रूपाने) माझ्या समवेत आहे.’’ त्या फुलपाखराचा फिकट पिवळा रंग पाहून मला आनंद झाला.
३. त्यानंतर मला सनातनचे सर्व संत दिसले आणि ‘ते मला आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.
मला दिलेल्या या अनुभूतीसाठी मी श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. प्रणाली मंगेश शेर्लेकर, वायरी, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. (२२.६.२०२१)