राजकारण्यांचे स्वार्थी आणि व्यक्तीनिष्ठ कार्यकर्ते !

लोकशाही कि भ्रष्टशाही ?

सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करता झोपलेले मतदार !

सध्याचे भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे. गेल्या ७४ वर्षांत अशा अनेक निवडणुका झाल्या, जनतेला विविध आश्वासने दिली गेली; परंतु प्रत्यक्षात जनतेचा भ्रमनिरासच झाला. या पार्श्वभूमीवर लोकशाहीतील त्रुटी, प्राचीन भारतीय आदर्श राज्यव्यवस्था आदींविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने याविषयीची लेखमालिका प्रसिद्ध करत आहोत. आतापर्यंत आपण ‘स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील आदर्श पितृतुल्य शासनव्यवस्था’, ‘लोकशाही – यथा प्रजा, तथा राजा ?’, ‘गलेलठ्ठ वेतन घेणार्‍या लोकप्रतिनिधींच्या फलनिष्पत्तीचा विचार करावा’ आणि ‘जागृत मतदार, तर सुदृढ लोकशाही’, आदी विषयांवरील सूत्रे वाचली. आज त्याच्या पुढचा भाग येथे देत आहोत.


श्री. रमेश शिंदे

‘लोकशाहीत नेता किंवा राजकारणी यांचे सामर्थ्य कार्यकर्त्यांच्या बळावरच मानले जाते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे महत्त्व निश्चितच असते. स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील युवक हे देशभक्तीने, तसेच स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने झपाटलेले असत. त्यांना टिळक, सावरकर, भगतसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे निःस्वार्थी नेते मिळाल्यावर, तर ते देशासाठी सर्वाेच्च बलीदान करण्यासही सिद्ध असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र हळूहळू राजकारणाचे सत्ताकारणात रूपांतर झाले. ‘कोणत्याही मार्गाने सत्तेत येऊन वर्चस्व निर्माण करायचे आणि पुढच्या निवडणुकीसाठी शक्य होईल तेवढी संपत्ती गोळा करायची’, हे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे उद्दिष्ट बनू लागले. यातही प्रारंभीच्या काळात कामगार संघटना किंवा राजकीय पक्ष यांच्या साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्वनिष्ठ अशा विचारसरणींना बांधील असणारे कार्यकर्ते असत. त्यामुळे ते आपल्या संघटनेचे किंवा पक्षाचे कार्य हे घरातील कार्य असल्याच्या भावनेने निरपेक्षपणे करत असत; मात्र जसजसे राजकीय नेत्यांनी स्वार्थासाठी पक्षबदल करणे चालू केले, तसेच सत्तेत पद मिळाल्यावर धन-मालमत्ता गोळा करणे चालू केले, तसतसा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही पालट होऊ लागला. कार्यकर्ते विचारसरणी किंवा संघटन यांच्यापेक्षा राजकीय नेत्यांशी व्यक्तीनिष्ठ राहू लागले. नेत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष आणि विचारसरणी पालटली की, त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्या समवेत नवीन पक्षात जाऊ लागले. एखादा नेता त्याचे पक्षात काही बिनसले किंवा त्याच्या मोठ्या पदाच्या मागण्या मान्य न झाल्यास, स्वतःवर अन्याय होत असल्याचा आरोप करून नवीन पक्षात प्रवेश करून स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करतो. त्यासाठी काही नेते हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीच्या पक्षातून थेट ‘सेक्युलरवादी’ (धर्मनिरपेक्षतावादी) पक्षात प्रवेश करून स्वार्थ साधण्यास सिद्ध होतात. अशा वेळी कार्यकर्त्यांवर प्रत्यक्ष कोणताही अन्याय झालेला नसतांनाही, तसेच कालपर्यंत पक्षात हिंदुत्वाच्या विचारांसाठी लढणारे कार्यकर्ते नेत्यासमवेत पक्षांतर करून एका क्षणात सेक्युलरवादी बनून त्याच हिंदुत्वाचे विरोधक म्हणून उभे रहातात ! त्यांच्या दृष्टीने धर्म, पक्ष, ध्येयवादी विचारसरणी आदींना काही महत्त्व उरलेले नसते. अशा व्यक्तीनिष्ठ कार्यकर्त्यांमुळे राजकीय नेत्यांचे अधिकच फावते. पुन्हा मोठी संधी बघून ते नवीन पक्षात जाण्याची सिद्धता करत असतात. अर्थात् सगळेच कार्यकर्ते स्वार्थी नसून त्यात काही कार्यकर्ते अजूनही विचार आणि सिद्धांत यांना महत्त्व देणारे आहेत; मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

राजकारण्यांच्या जनताद्रोहाच्या पापाचे समभागीदार होणारे कार्यकर्ते !

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे एक कारण राजकीय स्वार्थ असले, तरी काही कार्यकर्त्यांना नेत्यांनी अडचणीच्या काळात साहाय्य केलेले असते किंवा काही कार्यकर्त्यांवर आंदोलनात पोलिसांनी खटले प्रविष्ट केलेले असतात, त्यामुळे ‘सुरक्षित रहाण्यासाठी नेत्यांच्या समवेत रहाणे’ त्यांना अनिवार्य वाटत असते. यासाठी ते राजकारण्यांची ‘हांजी हांजी’ करण्यात धन्यता मानतात. काही महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की, आपण ज्या नेत्याशी सतत निष्ठावान राहिलो आहोत, त्या नेत्याने पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आदी निवडणुकांमध्ये आपल्याला उमेदवारी मिळवून द्यावी, वेळोवेळी अर्थसाहाय्य करावे, मुलांना शाळा-महाविद्यालयांत प्रवेश मिळवून द्यावा, तसेच नातेवाईकाला नोकरी मिळवून द्यावी इत्यादी. स्वतःचा हा स्वार्थ साधण्यासाठी आपल्या नेत्याकडून होणारा भ्रष्टाचार, भूमी बळकावून केला जाणारा अपहार, गुंडगिरीच्या दबावतंत्राने केली जाणारी वसुली, हे सर्व गैरप्रकार ते दुर्लक्षित करत असतात, किंबहुना अनेकदा तेच त्यात सहभागी होतात. एकही कार्यकर्ता आपल्या नेत्याला त्याच्या मूळ सिद्धांतांची आठवण करून देत नाही किंवा गरीब जनतेवर केले जाणारे अन्याय रोखण्याचा प्रयत्न करत नाही. याद्वारे ते एकाअर्थी राजकारण्यांच्या जनताद्रोहाच्या पापाचे समभागीदारही असतात. राजकारणीही अशा स्वार्थी कार्यकर्त्यांना चांगले ओळखून असतात. त्यांचा वापर ते चलाखीने बुद्धीबळातील प्याद्याप्रमाणे करून घेतात. अशा प्रकारे आजची लोकशाही स्वार्थी नेते आणि त्यांचे संधीसाधू कार्यकर्ते यांच्या स्वार्थी राजकारणाची बटीक बनलेली आहे.

अशा स्थितीत ज्या नेत्याकडे नि:स्वार्थी कार्यकर्ते असतील, तो नेता लोकशाहीतील खर्‍या अर्थाने धनवान नेता मानावा लागेल. त्यादृष्टीने विचार केल्यास सध्याचे राजकारणी दरिद्रीच म्हणावे लागतील. विद्यमान लोकशाहीची हीसुद्धा एक मोठी शोकांतिका आहे.’

(क्रमश: वाचा रविवारी)

– श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती