सातारा, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – वाई तालुक्यातील युवक आणि ग्रामस्थ यांनी ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री ग्रामपंचायत कार्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती बैठा पुतळा चबुतरा बांधून स्थापन केला. दुसर्या दिवशी ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाने केंजळ गावाकडे धाव घेतली. या वेळी युवक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात बैठक झाली. रितसर अनुमती घेऊन पुतळा स्थापन करण्याविषयी पोलिसांनी विनंती केली; मात्र पुतळा हलवणार नाही, अशी भूमिका घेत केंजळ येथील युवक आणि ग्रामस्थ आमने-सामने आले. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या घटनेची माहिती कळताच ‘प्रतापगड उत्सव समिती’च्या निमंत्रक विजयाताई भोसले केंजळ येथे आल्या आणि त्यांनी ‘काही झाले, तरी पुतळा हटवणार नाही’, असा पवित्रा घेतला. विजयाताईंसमवेत भाजपचे सरचिटणीस सचिन घाडगे, विवेक भोसले आणि कार्यकर्ते उपस्थित झाले. त्यांची पुन्हा पोलीस आणि प्रशासन यांच्यासमवेत बैठक झाली; मात्र स्थापन केलेला पुतळा हटवणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होईल, अशी भावना त्यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली. त्यामुळे पुतळा हटवणार नसल्याचे युवक आणि ग्रामस्थ यांनी स्पष्ट केले. अजूनही ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात तोडगा निघालेला नाही. त्यामुळे केंजळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आलेले आहे.
मला अटक करा; परंतु पुतळा हटवण्यासाठी बळजोरी करू नका ! – विजयाताई भोसले
या वेळी ‘प्रतापगड उत्सव समिती’च्या निमंत्रक विजयाताई भोसले म्हणाल्या, ‘‘प्रतापगड येथील अनधिकृत बांधकाम आणि इतर कबरी काढण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढा दिला. अनधिकृत बांधकाम आणि इतर कबरी काढाव्या लागतील, हे कायद्याने सिद्ध करूनही प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही. मग आताच केंजळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यासाठी प्रशासन बळजोरी का करत आहे ? हवे तर या कारणासाठी तुम्ही मला अटक करा; परंतु पुतळा हटवण्यासाठी बळजोरी करू नका !’’