(म्हणे) ‘अंबानी आणि अदानी रोजगार निर्माण करतात; म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे !’ – भाजपचे खासदार के.जे. अल्फोन्स

पूजा ही केवळ देवतांची केली जाते, कुठल्याही व्यक्तीची नाही. त्यामुळे अशी विधाने करतांना निदान भाजपच्या नेत्यांनी तरी याचे भान राखले पाहिजे, असेच सामान्य जनतेला वाटते ! – संपादक

भाजपचे खासदार के.जे. अल्फोन्स

नवी देहली – मी अशा लोकांची नावे घेतो ज्यांनी या देशात नोकर्‍या निर्माण केल्या आहेत. रिलायन्स असो, अंबानी असो, अदानी असो, कुणीही असो, त्यांची पूजा केली पाहिजे; कारण ते रोजगाराच्या संधी निर्माण करतात. या देशात पैसा कमावणारा प्रत्येक उद्योगपती रोजगार निर्माण करतो. त्यामुळे त्यांचा आदर करणे आवश्यक आहे, असे विधान भाजपचे खासदार के.जे.अल्फोन्स यांनी राज्यसभेत केले. ‘गेल्या ३ वर्षांत सुमारे १० सहस्र लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या आहेत’, अशी माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रश्‍नाच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली. या उत्तरानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी बेरोजगारीच्या सूत्रावरून केंद्र सरकारवर टीका केली. त्या वेळी अल्फोन्स बोलत होते.

अल्फोन्स पुढे म्हणाले की, दोन जणांच्या (मुकेश अंबानी आणि अदानी) संपत्तीत वाढ झाल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. उद्योगपती एलॉन मस्क यांच्या संपत्तीत १ सहस्र १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुम्हाला याची जाणीव होती का ? ‘गूगल’चे संस्थापक लॅरी पेज यांच्या संपत्तीतही १२६ टक्कयांनी वाढ झाली आहे. उद्योगपती बेझोस यांच्या संपत्तीतही ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रमुख १० उद्योगपतींमध्ये बिल गेट्स सर्वांत खालच्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती केवळ ३० टक्क्यांनी वाढली आहे. तुम्ही स्वीकारा किंवा स्वीकारू नका; पण जागतिक विषमता ही वस्तूस्थिती आहे. जगातील ३०० कोटी लोक दिवसाला ३७० रुपयांपेक्षाही अल्प पैशांमध्ये उदरनिर्वाह करतात. त्यामुळे जागतिक असमानता ही वस्तूस्थिती आहे.