संभाजीनगर येथे विवाहाचे आमीष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा नोंद !

  • पोलिसी मनोवृत्तीची चुणूक !

  • पीडित महिलेला गर्भपात करण्यास भाग पाडले !

पोलिसांचे असाहाय्य महिलांसमवेत असलेले अशोभनीय वर्तन पोलीस खात्याला लज्जास्पद आहे. अशा पोलिसांना बडतर्फ करून कठोर शिक्षा देणे अपेक्षित आहे.- संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

संभाजीनगर – विवाहानंतर पतीशी पटत नसल्याने विभक्त रहाणार्‍या येथील विवाहित महिलेला विवाहाचे आमीष दाखवून फसवणे आणि गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप पवार यांच्या विरोधात महिलेने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पवार यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस शिपाई संदीप यांनी त्या महिलेला विवाहाचे आमीष दाखवून ‘तुला २ मुलांसमवेत स्वीकारतो’, असे वर्षभर सांगितले, तसेच ही महिला त्यांच्यापासून ६ आठवड्यांची गर्भवती राहिल्यानंतर तिने विवाहाची मागणी केली; मात्र त्यानंतर ‘गर्भपात कर नाहीतर तुला मुलांसहीत मारून टाकेन’, अशी धमकी दिली, तसेच एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपातही केला. संदीप यांनी या महिलेकडून ८ ते १० लाख रुपये घेतले आहेत. ‘माझ्यावर हत्येचा गुन्हा नोंद झाला असून तू माझे काहीही वाकडे करू शकणार नाहीस’, असे म्हणत त्याने पीडित महिलेवर अत्याचार चालूच ठेवले.

पीडितेवरही मारहाणीचा गुन्हा नोंद !

पीडित महिला आरोपी संदीप यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेली असता, तिने पोलिसाच्या पत्नीला मारहाण केली आहे, असा गुन्हा सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. ३ फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली आहे.