स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेस नसती, तर भारतातील लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती !

पंतप्रधान मोदी यांचा राज्यसभेत काँग्रेसवर प्रचंड घणाघात

नवी देहली – स्वातंत्र्यानंतर जर देशात काँग्रेस नसती, तर भारतातील लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती. हा देश विदेशी ऐवजी स्वदेशीच्या संकल्पावर चालला असता, आणीबाणीचा कलंक लागला नसता, देशात जातीयवाद राहिला नसता, शिखांचे हत्याकांड झाले नसते, आतंकवाद नसता, काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडावे लागले नसते, तसेच सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी वाट पहावी लागली नसती, अशा कठोर शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेवर टीका केली. ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. यापूर्वी त्यांनी लोकसभेतही भाषण केलेे. ‘स्वातंत्र्य मिळत असतांना ‘काँग्रेस विसर्जित करा’, असे म.  गांधी म्हणाले होते. हे जर झाले असते, तर देशात काय झाले असते’, हे सांगत मोदी यांनी काँग्रेसने केलेल्या चुकांचा पाढा वाचला.

मोदी पुढे म्हणाले की,

१. काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे कधीच विचार केला नाही. देशाला सर्वांत मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते, तेव्हा सर्वांत पहिले गुणवत्तेला लक्ष्य केले जाते. सर्व पक्षांनी त्यांच्या त्यांच्या पक्षात लोकशाही अंमलात आणली पाहिजे. काँग्रेसने याचा सर्वांत आधी याचा विचार केला पाहिजे.

२. काँग्रेस तिच्या राजवटीत साध्या साध्या गोष्टींसाठी मुख्यमंत्र्यांना हटवत होती. काँग्रेसने आतापर्यंत जवळपास १०० वेळा निवडून आलेल्या विविध राज्य सरकारांना फेकून (विसर्जित केले) दिले होते. आता ते कोणत्या तोंडाने लोकशाहीविषयी बोलत आहेत ? एका पंतप्रधानाने ५० राज्य सरकारांना फेकून दिले आहे. याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. आज त्याचीच ते शिक्षा भोगत आहेत. काँग्रेसच्या सत्तेच्या नशेमुळे आज तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कटुता निर्माण झाली आहे.

नेहरूंमुळे गोवा भारताच्या स्वातंत्र्यानंतरही १५ वर्षे पारतंत्र्यात राहिला !

पंतप्रधान मोदींनी गोव्याचे उदाहरण देत काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले की, सरदार पटेल यांनी हैदराबाद आणि जुनागढ यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्युहूरचना आखली. तशीच व्युहूरचना गोव्यासाठीही आखली गेली असती, तर गोव्याला आणखी १५ वर्षे पारतंत्र्यात रहावे लागले नसते, पोर्तुगिजांचे अत्याचार सहन करावे लागले नसते; पण तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी जगातील त्यांची प्रतिमा महत्त्वाची वाटत होती. ती जपण्यासाठी गोव्यातील जनतेला वार्‍यावर सोडण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कविता म्हटली; म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांना काँग्रेसने आकाशवाणीवरून काढले !

या वेळी मोदी म्हणाले की, लता मंगेशकर यांचे कुटुंब गोव्याचे होते. त्यांच्या कुटुंबाला कशी वागणूक देण्यात आली, ते देशाला कळायला हवे. लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना ‘ऑल इंडिया रेडिओ’मधून काढण्यात आले. त्यांचा गुन्हा इतकाच होता की, त्यांनी सावरकर यांच्यावरील कविता रेडिओवर सादर केली होती.

रेडिओवर ही कविता सादर करण्यापूर्वी हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली होती. त्या वेळी ‘माझी कविता रेडिओवर सादर करून तुम्हाला कारागृहात जायचे आहे का ?’ असा प्रश्‍न सावरकरांनी त्यांना विचारला होता. मंगेशकरांनी या घटनेचा उल्लेख एका मुलाखतीत केला होता. हृदयनाथ यांनी सावरकरांची कविता रेडिओवर सादर केल्यानंतर पुढील ८ दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.