‘ईश्वराच्या ईश्वरत्वाचा आणि अन्य सर्वच दैवी गुणांचा उगम त्याच्या ‘निरपेक्ष प्रीती’ या गुणातून होत असतो. त्या ब्रह्मांडनायकाचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अलौकिक प्रेम हेच आम्हा साधकजिवांचे इहलोकीचे आणि परलोकीचे वैभव आहे. तेच या सृष्टीचे, म्हणजे आपल्या जन्माचे कारण आणि आनंदप्राप्तीचे कार्यही तेच आहे. तेच भगवंताने पृथ्वीवर दहा अवतार घेण्याचे कारण असून भक्तांवरील प्रीतीमुळेच ईश्वर धर्मसंस्थापनेचे कार्य करतो. ईश्वराची प्रीती हीच धारणाशक्ती असून तोच धर्म आहे. ईश्वराच्या ‘प्रीती’ या अनन्यसाधारण गुणांमुळेच सर्व जिवांना त्याची ओढ लागते. त्याच्या प्रीतीविना सूर्य, चंद्र आणि तारांगणे एका क्षणात निष्प्रभ होतील अन् आपले सर्वांचे जीवन कवडीमोल होईल.
१. ‘आपत्काळ येणारच आहे’, असे द्रष्टे पुरुष आणि संत यांनी भाकीत केलेले असणे अन् ते ईश्वराचे नियोजन असणे
१ अ. शिशिर ऋतूत पानझड होऊन वसंत ऋतूचे आगमन झाल्यावर झाडांना नवी कोवळी पाने फुटणे आणि त्याप्रमाणे आपत्काळानंतर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन भूलोकी सात्त्विकतेची लाट येणे, हे निसर्गाचे चक्रच असणे : उत्पत्ती, स्थिती आणि लय हे निसर्गाचे चक्र आहे. लयाची देवता ‘शिव’ आहे. भूलोकात जे अमंगल किंवा वाईट किंवा रज-तमात्मक (सत्त्वहीन) आहे, त्याचा लय होतो. जे जीर्ण, टाकाऊ आणि हीन असते, ते नष्ट होते. त्यानंतर मांगल्याचा उदय होऊन नवनिर्मिती होते. शिशिर ऋतूत पानझड होते. त्यानंतर येणार्या वसंत ऋतूत झाडांना नवी कोवळी पाने येतात. त्याप्रमाणे आपत्काळानंतर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊन भूलोकी मांगल्य आणि सात्त्विकता यांची लाटच येणार आहे. हेच निसर्गाचे चक्र आहे.
१ आ. पूर्वीच्या दोन युगांप्रमाणे कलियुगातही धर्म-अधर्माचा लढा होईल. नैसर्गिक संकटे आणि तिसरे महायुद्ध होऊन जे अमंगल आहे, त्याचा लय होईल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.
१ इ. ‘आपत्काळानंतर हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : परात्पर गुरु डॉक्टरांनीही २० वर्षांपूर्वीच ‘आपत्काळ आणि त्याची भीषणता’ यांविषयी कथन केले आहे. संपत्काळात आनंदप्राप्तीसाठी साधना करायची असते; पण साधकांना पुढे होणार्या भीषण संहारात स्वतःचे रक्षण होण्यासाठी, म्हणजे जगण्यासाठी साधना करावी लागेल. आपत्काळात ईश्वरच सात्त्विक जिवांचे रक्षण करणार आहे. त्यासाठी आज नव्हे, तर आताच साधनेला आरंभ करा. ‘आपत्काळानंतर हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, हेही सूत्र त्यांनी सांगितले आहे.
१ ई. ‘साधकांनी आपत्काळात रक्षण होण्यासाठी सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी दृढ निष्ठा ठेवून त्यांचे आज्ञापालन करावे’, असे महर्षींनी नाडीभविष्यात सांगणे : महर्षींनीही नाडीभविष्यात सांगितले आहे, ‘आगामी काळ हा घोर आपत्काळ आहे. पुढे नैसर्गिक आपत्ती येतील. सर्व नष्ट होईल. या आपत्काळात साधकांचे रक्षण होणे, ही गुरुकृपाच असेल; म्हणून साधकांनी सनातनच्या तिन्ही गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) चरणी दृढ निष्ठा ठेवून त्यांचे आज्ञापालन करावे.’
२. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आपत्काळाची सर्व स्तरांवर सिद्धता करायला सांगणे’, हे त्यांचे दिव्य अलौकिक कार्य असून या विश्वव्यापी कार्यामुळेच ‘ते ब्रह्मांडपालक भगवान विष्णूचा अवतार आहेत’, हे जाणवणे
‘आपत्काळ येणार’, असे सांगणारे अनेक आहेत; पण ‘त्यातून तरून जाण्यासाठी मानवाने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर कशी सिद्धता करायला हवी ?’, हे सांगणारे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले एकमेव आहेत.
अ. ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांमध्ये ‘आपत्काळातील महायुद्ध, भूकंप इत्यादी संकटांना प्रत्यक्षात सामोरे कसे जावे ?’ ही लेखमाला कुणासाठी चालू केली ? आपल्यासाठीच (मानवजातीसाठीच) ना !
आ. आपत्काळात उद्भवणार्या समस्यांवर मार्गदर्शन करणारी आपत्कालीन ग्रंथमालिका कुणासाठी छापली ? आपल्यासाठीच (मानवजातीसाठीच) ना ! आपण ते वाचून त्याचा अभ्यास करूया आणि कृतीत आणूया.
इ. आपत्कालीन भावसत्संग कुणासाठी चालू केला ? आपल्यासाठीच (मानवजातीसाठीच) ना !
ई. महर्षींच्या सांगण्याप्रमाणे साधकांच्या (मानवजातीच्या) रक्षणासाठी परात्पर गुरु डॉक्टर सहस्र याग करत आहेत.
उ. आईचे सारे जीवन तिच्या लेकरांसाठी असते. त्याप्रमाणे प.पू. गुरुमाऊलीचे सारे जीवन साधक, मानवजात आणि धर्मसंस्थापना यांसाठी आहे. ‘देवाला आपत्काळात सर्वांचे रक्षण व्हावे’, असे वाटते; पण देवाने सांगितलेले आपण ऐकत नाही. आपले अयोग्य कर्मच आपल्या आड येते. (क्रमश: उद्याच्या अंकात)
– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी प्रकाश मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.३.२०२१)