स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन !

 २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित !

अनेक गायक आणि मान्यवर यांच्याकडून लतादीदींना श्रद्धांजली

मुंबई – आठ दशके भारताच्या स्वरविश्‍वात आशयघन आणि अमृतस्वरांचे सिंचन करून मंत्रमुग्ध करणार्‍या अन् श्रोत्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेणार्‍या स्वरसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारीला सकाळी ८.१२ वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे आणि नंतर न्युमोनिया झाल्यामुळे त्या गेले २८ दिवस रुग्णालयात उपचार घेत होत्या. अनेक अवयव निकामी झाल्यामुळे (मल्टीपल ऑर्गन फेल्युअर) उपचाराच्या वेळी त्यांचे निधन झाले ! ‘भारताच्या गानकोकिळा‘ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लतादीदी सुमधूर गीतांमुळे जगाच्या कानाकोपर्‍यात पोचल्या होत्या. ‘त्यांच्या निधनामुळे भारताच्या संगीत क्षेत्रातील एका स्वरयुगाची समाप्ती झाली’, असे उद्गार अनेक मान्यवरांनी काढले.

दादर येथील शिवाजी पार्कवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह अनेक मान्यवर त्यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी उपस्थित होते. त्यांच्या निधनाविषयी केंद्र सरकारने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. त्यामुळे संसद, राष्ट्रपती भवन, मुंबईत मंत्रालय यांसह सर्व सरकारी कार्यालयांच्या ठिकाणचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर करण्यात आला. लतादीदी यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून काही वेळ प्रभूकुंज येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त आज राज्यात सार्वजनिक सुटी घोषित !

मुंबई – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. तसेच राज्य सरकारने ७ फेब्रुवारी या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिली आहे.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, लता मंगेशकर त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्‍वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वहाण्यासाठी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुटी घोषित करण्यात येत आहे.

राष्ट्रीय दुखवटा घोषित झाल्यानंतर काय होते ?

  • ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.
  • सार्वजनिक सुटी घोषित करण्यात येते.
  • शासकीय सन्मान प्राप्त व्यक्तीचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात येते.
  • अंत्यसंस्काराच्या वेळी बंदुकांची मानवंदना देण्यात येते.

लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार !

‘प्रभुकुंज’ या लता मंगेशकर यांच्या निवासस्थानाकडून त्यांचे पार्थिव पेडर रोड, वरळी नाका, श्री सिद्धीविनायक मंदिर तेथून शिवाजी पार्क येथे आणण्यात आले. या वेळी त्यांना अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा सहस्रो लोकांची गर्दी जमली होती, तसेच अंतिम यात्रेत उत्स्फूर्तपणे सहस्रो लोक सहभागी झाले होते. तत्पूर्वी त्यांच्या घराजवळ पोलीस आणि सैन्य यांच्याकडून मानवंदना देण्यात आली. ज्या पुरोहितांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अंत्यविधी केला, त्यांनी लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या वेळी भगवद्गीतेचा १४ वा अध्याय म्हणण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन लतादीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडूलकर, गायक शंकर महादेवन, अभिनेते शाहरूख खान, अमिर खान, दिग्दर्शक अशोक पंडित इत्यादी अनेकांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. या वेळी सर्व मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते.
भारताच्या तिन्ही सैन्यदलांकडून या वेळी लता मंगेशकर यांना मानवंदना देण्यात आली.

लता मंगेशकर यांचा थोडक्यात जीवनप्रवास

लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर (मध्यप्रदेश) येथे २८ डिसेंबर १९२९ या दिवशी झाला. त्यांनी वयाच्या ५ व्या वर्षापासून वडील दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. लतादीदींचे वडील त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी वारले. त्या कुटुंबात मोठ्या असल्याने त्यांच्यावर कुटुंबाचे दायित्व आले. परिणामी वर्ष १९४२ पासून त्यांनी पार्श्‍वगायनाला प्रारंभ केला. त्यानंतर पुढील ६ दशके त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांनी २२ भाषांमध्ये ५० सहस्रांहून अधिक गाणी गायली आहेत. वर्ष १९७४ ते १९९१ या काळात सर्वाधिक गाण्यांचे ध्वनीमुद्रण करण्याचा जागतिक विक्रम त्यांनी केला. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी चित्रपटांना संगीत दिले. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वर्ष २००१ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’नेे सन्मानित करण्यात आले होते. दादरा नगरहवेली मुक्ती संग्रामाला निधी संकलित करता यावा, यासाठी त्यांनी गाण्याचा कार्यक्रम केला. ‘शास्त्रीय गायन करण्यास मिळाले नाही’, अशी खंत त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

लता मंगेशकर यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रभाव !

स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्याचा यज्ञ केलेले वीर सावरकर यांचा लता मंगेशकर यांच्यावर पुष्कळ प्रभाव होता. वेळोवेळी त्यांनी ते व्यक्त केले होते. वीर सावरकर यांच्यावर टीका करणार्‍यांचा लतादीदींनी कणखर समाचार घेतला होता. एका ट्वीटमध्ये त्यांनी ‘जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना वीर सावरकर यांच्या देशभक्तीविषयी आणि स्वाभिमानाविषयी माहिती नाही’, असे नमूद केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीविषयी ट्वीट करतांना ‘त्यांच्या वक्तव्याला आणि देशभक्तीला मी प्रणाम करते. वीर सावरकर आणि मंगेशकर कुटुंब यांचे घनिष्ट संबंध होते. त्यामुळे वीर सावरकर यांनी (माझ्या) वडिलांसाठी ‘संन्यस्थ खड्ग’ हे नाटक लिहिले होते.’

गायकांनी लता मंगेशकर यांना दिलेली मानवंदना !

श्री. श्रीधर फडके – त्यांनी स्वत:च्या सुरांनी जगावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या सहवासात जेव्हा जेव्हा आलो आहे, तेव्हा विलक्षण शक्ती, ऊर्जा जाणवायची. आमच्यासाठी त्या चालते-बोलते विद्यालयच होत्या. त्या राष्ट्रभक्त होत्या. त्या आमच्यासाठी पुष्कळ मोठा ठेवा ठेवून गेल्या आहेत.

सौ. आरती अंकलीकर-टीकेकर, गायिका – त्या गानसरस्वतीच होत्या. वसंत पंचमीला मला सरस्वतीदेवीच्या ठिकाणी त्यांचीच प्रतिमा दिसली. त्यांच्या गाण्यात जीवंतपणा होता. त्यांचे गाणे आतून असायचे. त्यामुळे ते अबालवृद्धाच्या मनाचा ठाव घ्यायचे. प्रत्येकाला त्यातून प्रेरणा मिळायची. त्यांना आपण स्वरमाऊलीच म्हणू शकतो.

श्री. राहुल देशपांडे – लतादीदी आमच्यासाठी मार्गदर्शक होत्या. त्या स्वरांच्या माऊली म्हणजे स्वरमाऊली होत्या. ‘मोगरा फुलला’ या गाण्याप्रमाणे त्यांचे प्रत्येक गाणेच चांगले आहे.

सौ. पद्मजा फेणाणी-जोगळेकर, गायिका – लतादीदींच्या जाण्यामुळे प्रत्येकालाच ‘माझ्या घरातील कुणीतरी गेले’, अशीच भावना निर्माण झाली आहे. ‘माझी संगीतातील आईच गेली’, असे मला वाटते. माझ्यासाठी त्या दैवतच होत्या.

श्री. सुदेश भोसले, गायक – लतादीदींसमवेत देश-विदेशांत शेकडो कार्यक्रम केले. त्या मोठ्या गायक होत्या, तरी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी त्या पुष्कळ सराव करायच्या. तसेच सरावाच्या वेळी मला ‘असे गायले तर चालेल ना, हे चालेल ना’, असे विचारायच्या. त्यांच्यातील नम्रता आणि परिपूर्ण करण्याचा गुण मला दिसला. त्यांचे प्रत्येक गाणे परिपूर्ण आहे. कोणत्याही दिग्दर्शकाच्या मनातील ओळखून त्या गाणे गायच्या. त्यामुळे त्यांना काही सांगावे लागायचे नाही. त्यांच्या समवेतच्या नवोदित, लहान कलाकारांनाही त्या प्रोत्साहन द्यायच्या.

संगीतकार ए.आर्. रहमान – त्या केवळ गायिका नव्हत्या, तर भारतीय संगीतसृष्टीचा आत्मा होत्या. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्‍वाची पुष्कळ हानी झाली आहे.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी – ज्यांच्या कंठातून माता सरस्वतीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत होता, त्या लतादीदी ब्रह्मलोकाच्या प्रवासाला निघाल्या आहेत. लतादीदींचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही जा, तेथे तुम्हाला लतादीदींचा स्वर ऐकू येईल आणि त्यांचे चाहते भेटतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – लतादीदींच्या जाण्याने एका स्वरयुगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे; पण त्या त्यांच्या अमृतस्वरांनी अजरामर आहेत, विश्‍व व्यापून राहिल्या आहेत; त्या अर्थाने त्या आपल्यातच रहातील. ‘अनादि आनंदघन’ म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत रहातील.

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती – वीर सावरकर असोत अथवा मा. बाळासाहेब ठाकरे ! भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांनी ‘सेक्युलर’ भूमिकेचा दिखाऊपणा न करता बेधडकपणे हिंदुत्वाच्या व्यासपिठावर उपस्थिती दर्शवली ! स्व. लतादीदी यांच्या चरणी विनम्र अभिवादन ! हीच ती लतादीदींची स्पष्ट भूमिका ! ‘जे लोक वीर सावरकर यांच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना सावरकर यांच्या देशभक्ती आणि स्वाभिमान यांविषयी माहिती नाही’, असे लतादीदी म्हणत.

पाकच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांकडून श्रद्धांजली

बीजिंग (चीन) – सध्या पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समवेत चीनच्या दौर्‍यावर असणारे पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसेन यांनी ट्वीट करून लता मंगेशकर यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांंनी उर्दू आणि इंग्रजी या भाषांमध्ये ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘लता मंगेशकर यांनी जगाला संगीताचे वेड लावले. अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणार्‍या या संगीत सम्राज्ञीचा आवाज लोकांच्या हृदयावर कायम राज्य करत राहील.’

भारतीय संघाकडून काळी फित बांधून लतादीदी यांना श्रद्धांजली

कर्णावती (गुजरात) – भारतीय क्रिकेट संघाने दंडावर काळी फीत बांधून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. कर्णावती येथे वेस्ट इंडिज संघासमवेतच्या एक दिवसीय सामन्याच्या प्रारंभी मौन बाळगून भारतीय संघाकडून श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.


भाजपच्या प्रचारासाठी आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ऑनलाईन’ सभा रहित

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात ३ दिवस दुखवटा

पणजी, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्याशी एक वेगळे नाते असलेल्या आणि गोवा मुक्ती लढ्यात योगदान दिलेल्या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह गोव्यातही शोककळा पसरली आहे. लताताईंच्या निधनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत दुखवटा घोषित करण्यात आला आहे, तसेच पंतप्रधान मोदी यांची ६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी उत्तर गोव्यातील मतदारांसाठी होणार असलेली ‘ऑनलाईन’ सभाही भाजपने रहित केली. भाजपने पक्षाचे सर्व कार्यक्रम, तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सभाही रहित केल्या. लताताईंना श्रद्धांजली वाहून केवळ लहान सभा घेणार असल्याचे भाजपच्या वतीने कळवण्यात आले.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडे आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे लताताईंना श्रद्धांजली वहाण्यासाठी ६ फेब्रुवारीला तातडीने मुंबईला पोचले. तसेच तृणमूल काँग्रेसनेही त्यांच्या ६ फेब्रुवारीला नियोजित सर्व पत्रकार परिषदा रहित केल्या.

लता मंगेशकर यांचे गोव्याशी अतूट नाते

लताताईंचे वडील तथा मराठी नाट्यक्षेत्रातील व्यक्तीमत्त्व मास्टर दिनानाथ मंगेशकर ज्यांना ‘दिना’ या नावाने ओळखले जात असे, त्यांचा जन्म गोव्यातील मंगेशी, फोंडा येथे झाला होता. लताताईंचा जन्म जरी मध्यप्रदेशातील इंदूर येथे झालेला असला, तरी गोवा हे त्यांच्या वडिलांचे जन्मस्थान असल्याने गोव्याशी त्यांचे अतूट भावनिक नाते होते. ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश…’ हे लताताईंनी गायलेले गाणेही प्रसिद्ध आहे. मंगेशी हे त्यांचे दैवत होय. त्यांनी कुटुंबियांसह अनेकदा मंगेशी येथील मंदिराला भेट देत असत. वर्ष २००० मध्ये ‘दीनानाथ मंगेशकर दर्शन सोहळा’ या कार्यक्रमाच्या वेळी २ दिवस त्यांनी गोव्यात वास्तव्य केले होते.

गोवा मुक्ती लढ्यातील सहभाग

लताताईंनी गोवा मुक्ती लढ्यात सहभाग घेतला होता. पोर्तुगिजांच्या विरोधात लढण्यासाठी शस्त्रे खरेदी करण्याच्या हेतूने निधी जमवण्यासाठी हिराबाग, पुणे येथे २ मे १९५४ या दिवशी एका गाण्याच्या कार्यक्रमात लताताईंनी कोणतीही बिदागी (मानधन) न घेता गाणे गायले होते. संगीतकार आणि क्रांतीसेनानी सुधीर फडके यांनी या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

लता मंगेशकर यांनी गोव्याविषयी व्यक्त केलेल्या भावना, तसेच सध्याचे संगीतक्षेत्र आणि तरुण पिढी यांच्याविषयी व्यक्त केलेले विचार !

लता मंगेशकर यांनी गोव्यातील काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्राला दूरभाषद्वारे मुलाखत दिली होती. त्या वेळी त्यांनी गोव्याविषयी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. त्यातील निवडक सूत्रे पुढीलप्रमाणे

१. गोवा राज्याविषयी

अ. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यावर मंगेशाची कृपा आहे. आम्ही आता जे आहोत (आम्हाला प्रतिष्ठा मिळाली आहे), ते मंगेशाच्या कृपेमुळेच !

आ. मी अधिक काळ गोव्यात राहू शकले नाही आणि मला गोव्यातील कोकणी भाषा येत नाही, याचे मला वाईट वाटते; परंतु मी गोव्यात पुष्कळदा आले. येथील माणसे अत्यंत प्रेमळ आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे; म्हणून ते मला ‘दैवत’ मानतात; परंतु मी असे काही केलेले नाही. ‘गोवा आमचे आहे’, असे मला वाटते.

इ. मला गोवा मुक्ती लढ्यात सहभाग घेता आला, याचा मला अभिमान आहे.

ई. गोव्याची भूमी आणि पाणी यांत संगीत आहे. त्यामुळे या मातीने संगीताला अनेक प्रसिद्ध लोक दिले.

२. सध्याच्या संगीतक्षेत्राविषयी

सध्याचे नवे संगीतकार कुणाचे तरी गाणे ऐकून त्याप्रमाणे गातात आणि त्यांना प्रसिद्धी मिळते; परंतु संगीत हे कुणाकडे तरी शिकले पाहिजे. आम्ही संगीत आमच्या गुरूंकडून शिकलो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले. त्यामुळे एवढी प्रगती करता आली. हे गुरु-शिष्याचे नाते असते; परंतु आता शिष्य गुरूंच्या डोक्यावर बसतात.

३. सध्याच्या तरुण पिढीविषयी

चांगले जाऊन वाईट येते. ते त्याचे अस्तित्व दाखवते; पण पुढे तेसुद्धा (वाईट गोष्टीसुद्धा) लोप पावणारच आहेत. सध्या महाविद्यालयात जाणार्‍या मुली तोकडे कपडे घालतात. कुणीही साडी नेसत नाही. तरुणी मद्य पितात. या सर्व वाईट गोष्टी पुढे लोप पावतीलच.


लताताईंविषयी मान्यवरांकडून श्रद्धांजली व्यक्त !

गोव्याची अपरिमित हानी ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

लता मंगेशकर हे नाव जगभरात देशाची ओळख बनले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनामुळे गोव्याची मोठी हानी झाली आहे. संगीत क्षेत्रात त्यांचे नाव अजरामर रहाणार आहे. ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या जाण्याचे दु:ख पेलण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना देवो, अशी प्रार्थना करतो.

गोव्याचे राज्यपाल पी.एस्.श्रीधरन् यांनीही लताताईंच्या निधनावर शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गोव्याच्या मातीतील अजरामर स्वराने विश्‍वाला संमोहित केले ! – पद्मश्री धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, श्रीक्षेत्र तपोभूमी

गोव्याच्या मातीतील अजरामर स्वराने विश्‍वाला संमोहित केले. भारतीय संगीताची ओळख लताताईंमुळे सर्व क्षेत्रांत पोचली. भारतरत्न लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली सादर ! तिच्या आत्म्यास सद्गती लाभो.

लताताईंनी ‘सेक्युलर’ भूमिकेचा दिखाऊपणा न करता हिंदुत्वाची स्पष्ट भूमिका घेतली ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वीर सावरकर असोत अथवा मा. बाळासाहेब ठाकरे ! भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ‘सेक्युलर’ भूमिकेचा दिखाऊपणा न करता बेधडकपणे हिंदुत्वाच्या व्यासपिठावर उपस्थिती दर्शवली ! हीच ती लताताईंची स्पष्ट भूमिका ! कै. लताताई यांच्या चरणी विनम्र अभिवादन ! ‘जे लोक वीर सावरकर यांच्या विरोधात बोलत आहेत, त्यांना सावरकर यांच्या देशभक्ती आणि स्वाभिमान यांविषयी माहिती नाही’, असे लताताई म्हणत.

गोमंतकाचा अभिमान आणि स्वाभिमान यांचा महत्त्वाचा मानबिंदू हरपला ! – प्रा. सुभाष वेलींगकर, भारतमाता की जय संघ

स्वतःच्या अलौकिक दैवी सुरांच्या सामर्थ्यावर संपूर्ण जगाच्या हृदयावर कित्येक दशके निर्विवाद अधिराज्य गाजवणार्‍या आणि विशेषत: गोवा मुक्तीसाठी दादरा-नगर हवेली संग्रामासाठी कार्यक्रम करून निधीसंकलनाचे दायित्व उचललेल्या कै. लता दीनानाथ मंगेशकर यांना विनम्र भावपूर्ण आदरांजली ! त्यांच्या निधनामुळे गोमंतकाचा अभिमान आणि स्वाभिमान यांचा एक महत्त्वाचा मानबिंदू हरपला आहे. लताताईंच्या निधनामुळे गानविश्‍वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आमच्या जीवनकाळात कै. लताताईंसारखी आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीतक्षेत्रात तळपणारी विभूती होऊन गेली, हे आमचे भाग्य समजतो. ‘त्या स्वर्गही पावन करतील’, असे वाटते.

स्वरसम्राज्ञी लताताईंच्या निधनाने पुष्कळ दु:ख झाले. गोव्याशी त्यांचे अतूट नाते होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना ! – श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, अध्यक्ष, गोमंतक मंदिर महासंघ

लताताईंची गायकी हे ईश्‍वराचे देणे ! – ह.भ.प. निशिकांत टेंग्से, पुरोहित, श्री परशुराम मंदिर, पैंगीण, काणकोण

संपूर्ण जग आज एका उच्च गायिकेला पोरके झाले आहे. त्यांची गायकी हे ईश्‍वराचे देणेच होते. त्या गानसम्राज्ञी या उपाधीला साजेशाच होत्या. एका महान गायिकेला आज संपूर्ण देश मुकला आहे. या महान गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.