चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या बळकावलेल्या भूमीवर ! – केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

सरकारने अशी माहिती देण्यासह ‘चीनने बळकावलेला भाग परत घेण्यासाठी काय करत आहोत ?’, हेही सांगायला हवे ! – संपादक

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेल्या पूलाचे उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र

नवी देहली – चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या कह्यात  घेतलेल्या भूमीवर बांधण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली. भारत सरकारने वर्ष १९६२ पासून चीनचे हे अतिक्रमण कधीही स्वीकारलेले नाही, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् म्हणाले की, पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एल्.ए.सी.वरील) उर्वरित भागासंदर्भात निर्णय घेण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात परराष्ट्राविषयी, तसेच सैनिकी माध्यमांद्वारे संवाद चालू आहे. (चीनसमवेत चर्चा करून गेल्या ६० वर्षांत भारताचा बळकावलेला भाग चीनने परत केलेला नाही. त्यामुळे अशा निष्फळ चर्चा करण्यात वेळ घालवण्याऐवजी भारताने सैनिकी स्तरावर हा भाग परत मिळवणे अपेक्षित आहे ! – संपादक)