‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांनी निर्वाणापूर्वी साधारण ३ मास एक नवीन प्रथा चालू केली. कुणीही भक्त आला की, त्याने प्रथम दिनूच्या (प.पू. बाबांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘दिनकर’ होते.) चरणांवर डोके ठेवायचे आणि मगच सद्गुरु (श्री अनंतानंद साईश) त्याचा नमस्कार स्वीकारायचे. ‘सद्गुरूंनी ही नवीन प्रथा का चालू केली ?’, हे कुणालाच कळेना. पुढे सद्गुरूंचे महानिर्वाण झाले. त्यानंतर सर्वांच्या लक्षात आले, ‘आपल्याला सद्गुरूंनी दिनूला नमस्कार करायला सांगितले, त्याच दिवशी त्यांनी ‘दिनू माझ्या गादीचा वारस आहे’, हे अप्रत्यक्षपणे सुचवले होते !’
वर्ष १९९३ मध्ये गोवा येथे प.पू. बाबांची गुरुपौर्णिमा साजरी झाली. त्या दिवशी साधक आणि भक्त व्यासपिठावर बसलेल्या प.पू. बाबांचे दर्शन घेत होते. शिष्य डॉ. जयंत आठवले तेव्हा प.पू. बाबांच्या शेजारी थांबून त्यांना साधक आणि भक्त यांची ओळख करून देत होते. साधक आणि भक्त प.पू. बाबांच्या पाया पडून झाल्यानंतर डॉक्टरांच्याही (शिष्य डॉ. आठवले यांच्याही) पाया पडत होते. तेव्हा डॉक्टरांना संकोच वाटून ते ‘माझ्या पाया पडू नका; प.पू. बाबांच्याच पाया पडा’, असे सांगू लागले. त्यावर प.पू. बाबा डॉक्टरांना म्हणाले, ‘‘त्या सर्वांचा भाव आहे, तर पाया पडू द्या.’’ प.पू. बाबांनी सर्वांना डॉक्टरांच्या पाया पडण्यास सांगून डॉक्टरांना अप्रत्यक्षपणे ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून नियुक्त केले होते. (यापूर्वी प.पू. बाबांनी ‘प.पू. रामानंद महाराज’ आणि ‘प.पू. अच्युतानंद’ यांना प्रकटपणे स्वतःचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केलेलेच होते.)
– (पू.) संदीप आळशी (३.२.२०२२)