माघ शुक्ल पक्ष द्वितीया (२.२.२०२२) या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या इंग्लंड येथील साधिका ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. ॲलिस स्वेरदा (वय २४ वर्षे) यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
‘नुकतेच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘चामुंडा याग’ झाला. त्या वेळी मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात वास्तव्य करत असल्याने यज्ञाला उपस्थित राहू शकले. यज्ञ चालू असतांना सूक्ष्मातून मला यज्ञकुंडातून श्री चामुंडादेवीचे तांत्रिक आणि मारक रूप बाहेर पडतांना दिसले. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्री चामुंडादेवीच्या चित्राविषयी जाणवलेली सूत्रे
१ अ. डोळे : देवीमध्ये मारकतत्त्व कार्यरत झाल्याने तिचे डोळे उघडलेले आणि मोठे होते. तिच्यातील मारक शक्तीमुळे डोळ्यांच्या बुबुळाभोवतीचा जो पांढरा भाग असतो, तो लाल रंगाचा झाला होता. चित्रात देवीचे डोळे रेखाटत असतांना ‘देवी माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवले.
१ आ. केस
१. देवीचे केस मोकळे सोडलेले आणि ताठ होते. वाईट शक्ती आणि राक्षस यांना मारण्यासाठी देवी तिच्या मोकळ्या केसांतून मारक शक्ती सोडत होती.
२. देवीचे केस रेखाटत असतांना मला एक सूत्र शिकायला मिळाले की, तिच्या केसांची लांबी जेवढी अधिक, तेवढी तिची शक्ती अधिक होती.
३. ‘देवीच्या हातांची स्थिती किंवा तिच्या हातांतील शस्त्रे कशी रेखाटावी ?’, हे मला लक्षात येत नव्हते. त्या वेळी देवीने मला विचार दिला, ‘तू माझे केस रेखाटायला आरंभ कर, हात रेखाटण्याविषयी तुला योग्य विचार येतील.’ त्यानंतर मी देवीचे दोन हात रेखाटू शकले.
४. चित्र काढतांना मला देवीचे अन्य हात दिसत नव्हते. तेव्हा देवी मला म्हणाली, ‘आधी केसांचे बारकावे पूर्णतः रेखाटून केसांचा रंग अधिक गडद कर आणि त्यानंतरच माझे बाकीचे रूप रेखाटण्यास तुला आवश्यक ती शक्ती मिळेल.’
५. देवीच्या केसांचे बारकावे पूर्ण रेखाटल्यावर मला ‘देवी साक्षात माझ्या समोर उभी आहे’, असे जाणवू लागले. मी चित्रात जसे दाखवले होते, अगदी तसेच देवीने तिचे केस पूर्ण मोकळे सोडले होते. ‘देवीनेच हे चित्र रेखाटले आहे. मी केवळ एक माध्यम आहे’, याची मला जाणीव झाली आणि कृतज्ञतेने मी तिच्या चरणी नतमस्तक झाले.
१ इ. कांती : चित्रात देवीच्या त्वचेला राखाडी रंग देत असतांना ‘देवीचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे मला जाणवले. देवीच्या त्वचेचा रंग पालटत होता; म्हणजे गडद राखाडीचा फिकट राखाडी झाला आणि नंतर तो फिकट पिवळा झाला.
१ ई. हात
१. देवीला दशभुजा (दहा हात) होत्या. देवीमध्ये पुष्कळ मारक शक्ती असल्याने तिचे हात ताठ होते.
२. चित्र काढतांना आरंभी मला देवीच्या हातांची बोटे उघडलेली दिसली. जसजसे मी चित्र काढत गेले, तसे देवीने काही हातांच्या मुद्रा केल्याचे, तर तिच्या काही हातांमध्ये शस्त्रे असल्याचे मला दिसले.
३. देवीने सर्वांत वरच्या दोन हातांची (अंगठा आणि तर्जनी यांची टोके एकमेकांना जोडून) ध्यानमुद्रा केली होती. वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी अशी मुद्रा करून देवी मारक शक्ती निर्माण करत होती. देवीने सर्वांत खालच्या हातांचीही ध्यानमुद्रा केली होती. सर्वांत खालच्या हातांच्या या मुद्रेतून निर्माण झालेली मारक शक्ती देवी पाताळाच्या दिशेने सोडत होती.
१ उ. पाय : देवीचे पाय युद्धासाठी सिद्ध असलेल्या स्थितीत होते, म्हणजे आरंभी एक पाय भूमीवर आणि दुसरा पाय वर उचलला होता, नंतर पुन्हा दोन्ही पाय सामान्य स्थितीत होते. पाताळातील, तसेच पृथ्वीवरील वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी देवीच्या पायांतील बोटांतून भूमीवर मारक शक्ती प्रवाहित होत होती.
१ ऊ. पोशाख : देवीने खांद्यापासून कमरेपर्यंत राखाडी रंगाचे पातळ कापड आणि कमरेभोवती बिबट्याची कातडी परिधान केली होती. बिबट्याच्या कातडीचे चित्र मी यापूर्वी कधीच काढले नव्हते. त्यामुळे मी देवालाच शरण गेले आणि त्यानंतर माझ्याकडून आपोआपच बिबट्याच्या कातडीचे चित्र काढले गेले.
१ ए. माळ : देवीने गळ्यात मुंडक्यांची माळ घातली आहे.
१ ओ. देवीने उजव्या हातात हातोडा आणि डाव्या हातात रक्ताने माखलेला विळा धारण केला होता. हातोडा खरबरीत असून ‘तो एखाद्या दैवी लोहाराने बनवला आहे’, असे मला वाटले.
१ औ. देवीच्या एका हातात डमरू असून ती तो अखंड वाजवत होती. चित्र काढतांना सूक्ष्मातून मला डमरूचा नाद ऐकू येत होता.
२. चामुंडादेवीचे चित्र काढतांना आलेल्या अनुभूती
२ अ. जेव्हा मी देवीचे चित्र रेखाटण्यासाठी आरंभ करत असे, तेव्हा मला पुष्कळ त्रास होत असे.
२ आ. चामुंडादेवीचे चित्र काढण्यास असमर्थ असल्याचे वाटून देवीला प्रार्थना होणे, त्यानंतर साधिकेला वात्सल्य, प्रेम आणि आनंद जाणवून ती देवीचे चित्र काढू शकणे : एकदा चित्र काढण्यास आरंभ करण्यापूर्वी मी देवीला प्रार्थना केली, ‘हे देवी, मला तुझी शक्ती सहन होत नाही. तुझे चित्र रेखाटण्याची, तसेच माझ्यात तुझी शक्ती सहन करण्याची क्षमता वाढव; कारण ‘माझ्यातील असमर्थतेमुळे साधक तुझ्या शक्तीपासून वंचित राहू नये’, असे मला वाटते. साक्षात श्रीविष्णुचे अवतार असलेले परात्पर गुरु डॉक्टर तुझ्या भेटीची वाट पहात आहेत. हे देवी, परात्पर गुरुदेव तुला भेटण्यासाठी जितके आतुर आहेत, त्यापेक्षा अधिक तू त्यांना भेटण्यासाठी अधिक आतुर झाली असणार. त्यामुळे तुला यावेच लागेल. देवी माझ्यावर कृपा कर आणि माझ्या माध्यमातून तू हे चित्र काढून घे.’ प्रार्थना केल्यावर हळूहळू मला आतून वात्सल्य, प्रेम आणि आनंद जाणवू लागला. त्यानंतर मी चित्र काढण्यास आरंभ करू शकले.
२ इ. ‘जसजसे मी देवीचे चित्र रेखाटत होते, तशी देवी जागृत होत आहे’, असे मला जाणवत होते.
चामुंडादेवीची शक्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा यांमुळेच मी चामुंडादेवीच्या मारक रूपाचे चित्र पूर्ण करू शकले. त्यासाठी मी चामुंडादेवी आणि परात्पर गुरुदेव यांच्या कोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. ॲलिस स्वेरदा, इंग्लंड (२६.१०.२०२१)
कु. ॲलिस स्वेरदा यांनी काढलेल्या चामुंडादेवीच्या चित्राकडे पाहिल्यावर देवी मारक रूपात असूनही तिचे डोळे कृपाळू वाटणे
‘मी जेव्हा ॲलिसने काढलेल्या मारक रूपातील चामुंडादेवीच्या चित्राकडे पाहिले, तेव्हा देवी मारक रूपात असूनही तिचे डोळे मला कृपाळू वाटत होते. तिच्या डोळ्यांत भक्तांप्रतीचा वात्सल्यभाव जाणवत होता. देवतेच्या मारक रूपात तारक रूपाचीही अनुभूती येऊ शकते, असे प्रथमच झाले आहे. यातून ‘देवी मला शिकवत आहे की, ‘असुर आणि दुर्जन यांसाठी देवी मारक आहे; मात्र तिच्या भक्तांसाठी ती कृपाळू आणि आशीर्वाद देणारीच आहे’, असे मला जाणवले.
– कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२१)
|