मुंबई – १० वी आणि १२ वीची परीक्षा रहित करण्यासाठी ३१ जानेवारी या दिवशी मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, धाराशिव, बीड येथील सहस्रो विद्यार्थ्यांनी हिंसक निदर्शने केली. या विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपाप्रकरणी विकास पाठक उपाख्य हिंदुस्तानी भाऊ यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दहावी आणि बारावी च्या परीक्षा ‘ऑफलाईन’ घेण्यात येतील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषित केल्यानंतर विकास पाठक यांनी या निर्णयाला विरोध केला. तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांना ‘रस्त्यावर उतरून ताकद दाखवा’, अशी चिथावणी समाजमाध्यमावर त्यांनी दिली होती. ‘मी ३१ जानेवारी या दिवशी धारावीत जाऊन वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करेन’, असेही त्यांनी समाजमाध्यमावर घोषित केले होते. इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली. त्याच्या या संदेशांमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूर आदी शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी विकास पाठक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.