सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या भिंतींना एकच रंग दिलेला असूनही विविध मजल्यांवरील जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘प्रत्येक आध्यात्मिक घटकाचा रंग निराळा असतो. उदा. प्रीतीचा गुलाबी, भावाचा निळा, चैतन्याचा पिवळा, आनंदाचा गुलाबी किंवा मोरपिशी अन् शांतीचा पांढरा. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांच्याकडून वातावरणात कधी प्रीती, कधी चैतन्य, कधी आनंद, तर कधी शांती यांच्या लहरी प्रक्षेपित होतात. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या भिंतींना एकच रंग दिलेला असूनही जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा दिसून येते. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा दिसण्यामागील सूक्ष्म स्तरावरील विविध कारणे

१ अ. आश्रमातील जिन्याच्या भिंतींवर श्रीविष्णूच्या सगुण स्तरावरील तत्त्वलहरींमुळे निळसर रंगाची छटा दिसणे आणि निर्गुण स्तरावरील तत्त्वलहरींमुळे त्या लहरींमध्ये पुष्कळ प्रमाणात निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य कार्यरत झालेले असणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सतत विष्णुतत्त्वाने युक्त असलेली तारक-मारक शक्ती आणि चैतन्य यांच्या सूक्ष्म लहरींचे प्रक्षेपण होत असते. जिन्याच्या भिंती या एका मजल्याला दुसर्‍या मजल्याशी जोडत असतात. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी श्रीविष्णूच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्तरांवरील तत्त्वलहरींचा संगम झालेला आहे. श्रीविष्णूच्या तत्त्वलहरींचा रंग निळसर आहे. त्यामुळे आश्रमातील जिन्याच्या भिंतींवर श्रीविष्णूच्या सगुण स्तरावरील तत्त्वलहरींमुळे निळसर रंगाची छटा आलेली आहे आणि निर्गुण स्तरावरील तत्त्वलहरींमुळे त्या लहरींमध्ये पुष्कळ प्रमाणात निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य कार्यरत झालेले आहे. त्यामुळे जिन्यातून ये-जा करणार्‍या साधकांना श्रीविष्णूच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्तरांवरील लहरींमुळे पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळून त्यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर व्यष्टी अन् समष्टी स्तरांवरील साधना करण्यासाठी दैवी पाठबळ मिळते. त्यामुळे सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यावर सर्व साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगल्या प्रकारे होते.

क्रमांक १ ते ३ या ठिकाणी जिन्यावर निळ्या रंगाची छटा अधिकाधिक गडद होत गेलेली छायाचित्रात दिसत आहे.

१ आ. सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि विविध देवता यांच्याप्रती भक्तीभाव असणारे अनेक संत आणि भाव असणारे साधक रहात असल्यामुळे आश्रमातील विविध मजल्यांवरील जिन्यांच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा आलेली असणे : सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि विविध देवता यांच्याप्रती भक्तीभाव असणारे अनेक संत आणि भाव असणारे साधक रहातात. संतांकडून भक्तीच्या आणि भाव असणार्‍या साधकांकडून भावाच्या लहरींचे आश्रमातील वातावरणात प्रक्षेपण होते. आश्रमातील चैतन्यामुळे या भक्तीभावमय लहरींचे जिन्याच्या भिंतींच्या ठिकाणी घनीकरण झाले आहे. भाव आणि भक्ती यांचा रंग निळसर असल्यामुळे त्यांचे घनीकरण झालेल्या विविध मजल्यांवरील जिन्यांच्या जवळील भिंतींवर निळसर रंगाची छटा दिसून येते.

१ इ. आश्रमात कार्यरत झालेले श्रीरामतत्त्व आश्रमातून संपूर्ण पृथ्वीकडे सूक्ष्म स्तरावर प्रक्षेपित होतांना त्याचे घनीकरण आश्रमातील विविध मजल्यांवरील जिन्यात झाल्यामुळे तेथील भिंतींवर निळसर रंगाची छटा आलेली असणे : सनातनचा रामनाथी आश्रम हे हिंदु राष्ट्राचे लघु रूप आहे. रामराज्याचे प्रतिरूप असणारे हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी प्रभु श्रीरामाच्या तत्त्वाची आवश्यकता असते. प्रभु श्रीराम हा श्रीविष्णूचा ७ वा अवतार असून त्याच्या तत्त्वलहरींचा रंग निळसर आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरच होणार आहे. त्यासाठी साधनेचे बळ वाढवण्यासाठी देश-विदेशातील अनेक जिज्ञासू, धर्माभिमानी, साधक आणि संत सनातनच्या रामनाथी आश्रमात येतात. आश्रमात कार्यरत झालेले श्रीरामतत्त्व आश्रमातून संपूर्ण पृथ्वीकडे सूक्ष्म स्तरावर प्रक्षेपित होते. या तत्त्वलहरींचे घनीकरण आश्रमातील विविध मजल्यांवरील जिन्यात झाल्यामुळे तेथील भिंतींवर निळसर रंगाची छटा आलेली आहे.

२. आश्रमातील विविध मजल्यांच्या जिन्यांच्या भिंतींवर दिवसभरात विविध वेळी आणि माळ्यांच्या क्रमानुसार दिसणार्‍या रंग छटांमागील अध्यात्मशास्त्र

२ अ. आश्रमातील विविध मजल्यांच्या जिन्यांकडे दिवसाच्या विविध वेळी बाहेरच्या बाजूने पाहिल्यावर त्यांच्यावर दिसणार्‍या निळसर रंगाच्या छटेमध्ये होणारे पालट आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र : सकाळी १०-११ वाजल्यापासून दुपारी ३-४ वाजेपर्यंत आश्रमातील चौथा ते पहिला मजला अशा उतरत्या क्रमाने जिन्याच्या बाहेरच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा होती. सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान दुपारपेक्षा अधिक निळसर रंगाची छटा पहिल्या मजल्याच्या भिंतीवर अधिक गडद होती. तेथून चौथ्या मजल्यापर्यंत छटा अल्प झाल्याचे दिसते. सकाळचे वातावरण सात्त्विक असल्यामुळे त्या वेळी वातावरणात दैवी शक्तींचे प्राबल्य अधिक असते. दुपारनंतर वातावरणातील सात्त्विकता न्यून होऊन रजोगुण वाढू लागतो. सायंकाळनंतर रजोगुणाचे प्रमाण न्यून होऊन वातावरणातील तमोगुण वाढू लागतो. त्यामुळे सकाळी दैवी शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत असतात आणि रात्रीच्या वेळी वाईट शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत होतात. आश्रमात रहाणार्‍या साधकांवर वाईट शक्ती दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात आक्रमण करतात. आश्रमातील पहिला मजला हा भूमीच्या जवळ असल्यामुळे पाताळातून, म्हणजे अधोदिशेने होणारी सूक्ष्मातील आक्रमणे आश्रमातील वरच्या मजल्यांच्या तुलनेत खालच्या मजल्यावर अधिक प्रमाणात होतात. त्यामुळे आश्रमात रहाणार्‍या साधकांवर पाताळातील मांत्रिक सायंकाळी आणि रात्री सूक्ष्मातून करत असलेल्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी आश्रमाच्या वरच्या मजल्यांच्या तुलनेत पहिल्या मजल्यावरील जिन्याच्या बाहेरील भिंतीवर निळसर रंगाची छटा अधिक गडद दिसत होती.

२ आ. सायंकाळी जिन्याच्या पहिल्या मजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत निळसर रंगाची छटा कमी कमी झाल्याचे दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र

२ आ १. देवतांच्या तत्त्वलहरी : देवतेच्या तत्त्वाचे तेजतत्त्वाच्या स्तरावर घनीकरण सगुण स्तरावर झाल्यामुळे देवतेच्या तत्त्वलहरींचा रंग गडद दिसतो. जसजसे निर्गुण तत्त्व वाढत जाते, तसतसे त्यातील वायू आणि आकाश या तत्त्वांचे प्रमाण वाढून तेजतत्त्वाचे प्रमाण न्यून होते. त्यामुळे देवतांच्या तत्त्वलहरींचे घनीकरण न होता, त्या सूक्ष्म स्तरावर वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावर अधिक प्रमाणात कार्यरत होतात. त्यामुळे देवतांच्या तत्त्वलहरींचा रंग फिकट होतो.

२ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या श्रीविष्णुतत्त्वातील निर्गुण तत्त्व : जिन्याच्या पहिल्या माळ्यापासून वरच्या मजल्यापर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या श्रीविष्णुतत्त्वातील निर्गुण तत्त्वाचे प्रमाण सायंकाळपर्यंत चढत्या क्रमाने वाढत गेल्यामुळे आश्रमाच्या पहिल्या मजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत निळसर रंगाची छटा कमी कमी झाल्याचे दिसते.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून सूक्ष्मतर स्तरावर प्रक्षेपित झालेल्या श्रीविष्णुतत्त्वामुळे आश्रमातील जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाच्या छटेमध्ये काळ आणि मजला यांनुसार पालट दिसणे : रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून निर्गुण-सगुण स्तरावरील श्रीविष्णुतत्त्वाच्या प्रक्षेपणाचा परिणाम आश्रमातील विविध मजल्यांना जोडणार्‍या जिन्यांच्या भिंतींवर झालेला दिसतो.

३. आश्रमातील जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा येण्यामागील विविध कारणे, त्यांमागील कार्यरत घटक आणि त्यांचा स्तर अन् प्रमाण

कु. मधुरा भोसले

टीप – विष्णुतत्त्व, रामतत्त्व आणि भक्तीभाव यांचा सूक्ष्मातील रंग निळसर आहे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या श्रीविष्णुतत्त्वामुळे सात्त्विक जिवांना दैवी ऊर्जा मिळणे

पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी श्रीविष्णूचे अंशावतार आणि ज्ञानावतार असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून विष्णुतत्त्वमय चैतन्यलहरी आणि ज्ञानशक्तीच्या लहरी संपूर्ण वातावरणात प्रक्षेपित होतात. ज्ञानशक्तीच्या लहरींमुळे संपूर्ण विश्वातील स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर कार्यरत असणार्‍या जिवांच्या कारणदेहाची शुद्धी होऊन त्यांची बुद्धी शुद्ध आणि सात्त्विक होते. त्यामुळे त्यांना धर्माचरण आणि साधना करण्याची प्रेरणा मिळते. या जिवांकडून विष्णुतत्त्वयुक्त चैतन्यलहरी ग्रहण झाल्यामुळे स्थुलातून नातेवाईक किंवा कुटुंबीय किंवा समाज यांच्याकडून आणि सूक्ष्मातून वाईट शक्तींचा साधनेसाठी विरोध होत असतांनाही संपूर्ण पृथ्वीवरील सात्त्विक जिवांना दैवी ऊर्जा मिळून ते धर्माचरण आणि साधना करण्यासाठी कृतीप्रवण होतात.

कृतज्ञता

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमातील विविध मजल्यांच्या जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा येण्यामागील अध्यात्मशास्त्र उमजले’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक