श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वास्तव्याने पावन झालेला रामनाथी येथील सनातनचा आश्रम हे साक्षात् भूवैकुंठच आहे ! त्याच्या भोवतीचा निसर्गही सुंदरच आहे. या निसर्गात आणि वातावरणात ईश्वराच्या अनेक दैवी लीला अनुभवता येतात. अर्थात् भगवंताच्या लीलांची नोंद घेऊन ती दृष्टी साधकांमध्ये निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हेच आहेत ! ते केवळ सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यास सांगत नाहीत, तर त्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा सांगून साधकांना निसर्गातील अध्यात्म अनुभवण्यास शिकवतात. आश्रम परिसरात दिसून आलेल्या निसर्गाची मनोहारी छायाचित्रे आणि याद्वारे घडलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणदर्शन याविषयी आज आपण पहाणार आहोत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सौंदर्यदृष्टी !
११ सप्टेंबर २०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात आले की, तेथील औदुंबराच्या झाडामागील पथदिव्यांच्या प्रकाशाकडे पहातांना ‘त्या झाडातूनच प्रकाशकिरण बाहेर पडत आहेत’, असे वाटते. (छायाचित्र १ पहा.) त्याचे आपण छायाचित्र काढून ठेवले. ३१ ऑगस्ट २०१७ या दिवशी त्याच औदुंबराच्या वृक्षामागील पथदिवा एका विशिष्ट कोनातून पाहिल्यास अशा प्रकारे दिसत होता की, जणू झाडामागे सूर्यच उगवला आहे. वास्तविक ती वेळ रात्रीची होती. (छायाचित्र २ पहा.) परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या सुंदर दृश्यांची छायाचित्रे काढण्यास सांगितली.
२. केवळ निसर्गसौंदर्य न दाखवता ‘हे स्वर्गलोकातील वातावरणाशी मिळतेजुळते आहे’, असे सांगून निसर्गातील पालट अनुभवण्याची दैवी दृष्टी साधकांमध्ये निर्माण करणे
अलीकडे निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी शहरी लोक पर्यटनाला जातात. निसर्ग पहाणे आणि त्याच्या सहवासात छायाचित्रे काढणे एवढेच निसर्गसुख सामान्य व्यक्तीला अनुभवता येते. अध्यात्मातील उन्नत निसर्गसुखाच्या पलीकडे जाऊन निसर्गातील दैवी पालट अनुभवतात. २४ सप्टेंबर २०१७ या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतरचे वातावरण नेहमीपेक्षा वेगळे, म्हणजे फिकट तांबूस रंगाचे जाणवत होते. ‘हे वातावरण स्वर्गलोकातील वातावरणाशी मिळतेजुळते आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले. त्यांनी आश्रमातील साधकांना त्या वातावरणाचा अनुभव घेण्यास सांगितले. (छायाचित्र ३ पहा.) एकदा जनलोकातील वातावरणाप्रमाणे वातावरण झाल्याचे जाणून त्यांनी तेही साधकांना अनुभवण्यास सांगितले होते.
बर्याचदा वातावरण गुलाबी, पिवळसर, लालसर अशा रंगांचे होते. आकाशात इंद्रधनुष्य दिसते. निसर्गचक्रानुसार होणार्या पालटांमागील दैवी अनुभूतींचा साधकांना परिचय करवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेव आहेत. अध्यात्म जगणार्यांसाठी उच्च लोकांतील वातावरण पृथ्वीवर अनुभवता येणे, हे महत्भाग्याचे आहे. त्यामुळेच वातावरण असे दैवी बनले की, परात्पर गुरु डॉक्टर आश्रमातील साधकांना ते अनुभवण्यास सांगतात. पुढील पिढ्यांनाही असे काही असते, ते कळण्यासाठी छायाचित्रे काढून संग्रही ठेवण्यास सांगतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निसर्गातील आनंदाविषयी वेळोवेळी काढलेले उद्गार !१. निसर्ग आनंद देतो, तसा कोणालाही देता येत नाही ! : ‘फुले, झाडे, नदी, धबधबा, आकाश इत्यादी निसर्गातील सर्व घटक इतरांना आनंद देतात. सुंदर व्यक्तीकडे पाहिल्यावर केवळ तात्कालिक सुख वाटते, तर निसर्गाकडे बघितल्यावर नित्य नूतन आनंद मिळतो ! बरे झाले मला प.पू. भक्तराज महाराज यांनी मुंबईहून गोव्याला पाठवले, नाहीतर मला मुंबईत आनंददायी निसर्ग दिसलाच नसता. गोव्यातही देवाने मला निसर्ग बघण्यासाठी चांगली खोली दिली.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१२.२०१७) २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना निर्गुणाची अनुभूती देणारा निसर्ग ! : ‘सध्या ज्या खोलीत बसून मी ग्रंथ-संकलन करत आहे, तेथेच पुढील जन्मात बसून ग्रंथ-संकलन करायला आवडेल; कारण तेथून दिसणारा निसर्ग बघत रहावा, निर्गुणाची अनुभूती देणारा असा आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.४.२०२०) |
३. निसर्गातील पालटांतील अध्यात्म अनुभवण्यास साधकांना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
३ अ. श्री दुर्गादेवीची मूर्ती साधकांना दर्शनासाठी ठेवलेल्या दिवशी आकाशात पसरलेल्या लालसर रंगाच्या छटेमागील आध्यात्मिक भावार्थ सांगणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सनातनचे मूर्तीकार साधक श्री. गुरुदास खंडेपारकर, ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. रामानंद परब आणि श्री. राजू सुतार हे श्री दुर्गादेवीची मूर्ती बनवत आहेत. मूर्ती बनवण्याची प्रक्रिया चालू असतांनाच तिच्यात पुष्कळ सकारात्मक स्पंदने असल्याचे लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २२ जुलै २०२० या दिवशी आश्रमातील साधकांना दर्शन घेण्यासाठी ती मूर्ती उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्या मूर्तीचे दर्शन घेतांना साधकांना मूर्तीतील अत्यंत जागृत तेजतत्त्वाच्या संदर्भात पुष्कळ अनुभूती आल्या. त्या दिवशी आकाशात लालसर रंगाची छटा पसरली होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेली शक्तिस्वरूपिणी श्री दुर्गादेवीची मूर्ती साधकांना दर्शनासाठी ठेवणे आणि त्याच दिवशी आकाशात शक्तीची अनुभूती देणारी लालसर रंगाची छटा दिसून येणे, ही देवीने साधकांना दिलेली प्रचीती होती. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आकाशातील हे दैवी पालट टिपून त्याची छायाचित्रे काढून ठेवण्यास सांगितले. (छायाचित्र ४ पहा.)
३ आ. पावसाच्या थेंबाकडे पाहून आनंद का जाणवतो, यासंदर्भात प्रयोग करण्यास सांगणे : वर्ष २०१६ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘पावसाळ्यात भूमीवर पडणार्या पावसाच्या थेंबांकडे पाहून मनाला काय जाणवते ?’, याचा प्रयोग करण्यास सांगितले होते. त्या थेंबांकडे पाहून मनाला आनंद जाणवतो, हे त्यांनी या प्रयोगातून लक्षात आणून दिले. एरव्ही ‘पडत्या पावसाकडे पहाणे’, हा सर्वांचा आवडता छंद असतो; मात्र त्याची अशी शास्त्रीय कारणमीमांसा करणारे परात्पर गुरु डॉक्टरांविना दुसरे कोण आहे ?
येथे हे प्रसंग केवळ उदाहरणादाखल लिहिले आहेत. अशा सहस्रो प्रसंगांतून परात्पर गुरु डॉक्टर साधकांना घडवत आहेत. त्यांच्यामुळे साधक चराचर सृष्टीतील आनंद अनुभवू शकत आहेत. अशा आनंदस्वरूप श्रीगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(३१.१.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |