काँग्रेसच्या राज्यापेक्षा पंतप्रधान मोदी पाकिस्तानात अधिक सुरक्षित ?

पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित !

‘मला खात्री आहे की, या विषयाचे शीर्षक बघून मी अतिरेक किंवा अतिशयोक्ती करत आहे, असे वाटेल; कारण पाकिस्तान भारताचा शत्रूदेश आहे आणि गेली २५ ते ३० वर्षे या देशाने भारताशी सतत घातपात केला आहे. पाकिस्तानच्या सर्व शासकीय यंत्रणा, सैन्य मिळेल त्या दिशेने आणि मिळेल त्या मार्गाने भारतात घातपात अन् हिंसा घडवण्याचे उद्योग करत असतात. असा पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुरक्षित आहे आणि भारतातील काँग्रेसचे एखादे राज्य हे मात्र मोदींसाठी असुरक्षित आहे. हो कुणालाही अतिरेक वाटेल; पण मी अतिशय जागरूकपणे आणि दायित्वाने वरील शीर्षक दिले आहे. यातील प्रत्येक शब्द गंभीरपणे तपासला जाईल, याचीही मला खात्री आहे. त्यामुळे पंजाबच्या फिरोजपूर, भटिंडा भागात नरेंद्र मोदी सभेला गेले असतांना किंवा हुसेनीवाला येथे युद्ध संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेले असतांना ज्या प्रकारे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला, त्यातील पंजाबच्या काँग्रेस सरकारचे दायित्व टाळता येणार नाही; म्हणून मी अत्यंत दायित्वपूर्वक हे विधान, युक्तीवाद करत आहे. ज्या वेळी मी ‘पाकिस्तानात नरेंद्र मोदी सुरक्षित’ असल्याचे म्हणतो, तेव्हा त्याचा शेकडो लोक पुरावा मागतील, याची मला निश्चिती आहे. त्याच्याही पलीकडे पंतप्रधान मोदी पंजाबला गेले असतांना काही कारणास्तव त्यांना रस्त्याच्या मार्गाने तेथे यावे लागले आणि त्यांचा रस्ता अडवला गेला. त्यामुळे एका मोठ्या उड्डाण पुलावर ते जवळपास २० मिनिटे अडकून पडले होते. त्याच उड्डाण पुलावर रहदारीसाठी असलेल्या दुसर्‍या भागावर काही फुटांच्या अंतरावर निदर्शक आरडाओरडा करत होते.

पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेला फासला गेलेला हरताळ

हा सगळा पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेला फासला गेलेला हरताळ आहे आणि त्याला निवळ पंजाब सरकार अन् पंजाब पोलीस उत्तरदायी आहेत. ज्याअर्थी पंजाब पोलिसांकडून ही सगळी दिरंगाई आणि दायित्वशून्यपणा झालेला आहे, त्याचे दायित्व आपोआप सत्ताधारी काँग्रेस पक्षावर येते. ज्या पक्षाचे एक आजी आणि एक माजी असे दोन पंतप्रधान अशाच बेसावध अन् बेफिकीर सुरक्षाव्यवस्थेमुळे मारले गेले, त्या काँग्रेसकडून असे होणे, हे अधिक गंभीर आहे. त्यामुळे मी पाकिस्तानशी तुलना करत आहे.

संकलक : ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकर

पंतप्रधान मोदी अचानक शत्रूराष्ट्र पाकिस्तानमध्ये जाऊन सुखरूपपणे परतले; पण पंजाबमध्ये त्यांच्या जिवाला धोका उत्पन्न होणे

बरोबर ६ वर्षांपूर्वी कदाचित् २५ किंवा २६ डिसेंबर २०१५ या दिवशी भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी रशिया आणि जुन्या सोव्हिएत देशाच्या दौर्‍यावरून परत येतांना अफगाणिस्तानमध्ये थांबले होते. तेथील उद्घाटनाचे काही कार्यक्रम आटपून परत मायदेशी यायला निघाले. तेव्हा ते अचानक लाहोरला पोचले होते. विशेष म्हणजे हे त्यांच्या कुठल्याही आधीच्या कार्यक्रमामध्ये ठरलेले नव्हते. पंतप्रधानांचा कर्मचारी वर्ग विमानामध्ये बसत असतांना अगदी अचानकपणे शेवटच्या क्षणी त्यांना सुचवण्यात आले, ‘आपण काही घंट्यांसाठी पाकिस्तानमध्ये थांबणार आहोत. आपले विमान पाकिस्तानमध्ये उतरणार आहे. तेथे थोडा वेळ घालवून नंतर आपण देहलीकडे प्रस्थान करणार आहोत’, हे शेवटच्या क्षणी मोदी यांच्या निकटवर्तीयांना सांगण्यात आले होते आणि तसे झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तान चे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वडिलोपार्जित घरी एक घरगुती कार्यक्रम होता, तेथे नरेंद्र मोदी गेले. विशेष म्हणजे याविषयी पाकिस्तानच्या हेरखात्यालाही सुगावा लागला नव्हता, इतके अचानक नरेंद्र मोदी तेथे पोचले. त्यांनी निःशंकपणे शरीफ यांच्या घरी जाऊन त्यांच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर परत लाहोरच्या विमानतळावर येऊन तेथून भारतात परतले. त्यांच्या केसाला धक्काही लागला नाही. किंबहुना तशी आशंकाही व्यक्त होऊ शकली नाही आणि हे सगळे अचानक झाले ! हे का सांगायचे ? तर त्यांना शरीफ यांचे व्यक्तिगत पातळीवर निमंत्रण होते; म्हणून मोदी तिकडे गेले होते. यात दोन माणसांमधील विश्वास किती असतो ? हे पहाण्यासारखे आहे. पाकिस्तान हा शत्रूदेश आहे आणि शत्रूदेशाच्या पंतप्रधानाने आमंत्रण दिले असतांना त्याच्यावर विसंबून मोदी तेथे गेले होते. त्या पंतप्रधानांनी भारतासारख्या खंडप्राय देशाचा पंतप्रधान आपल्याकडे येत आहे आणि त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये, याची सर्व काळजी घेतली होती. नरेंद्र मोदी यांचे विमान तेथे सुरक्षितपणे उतरले, त्यांनी कार्यक्रम उरकले, ते विमानात बसले आणि परत त्यांचे विमान देहलीच्या दिशेने आले. हे सर्व सुरक्षित पार पडले. एवढेही पंजाबमध्ये होऊ शकलेले नाही.

ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर

काँग्रेस पक्ष, पंजाबचे प्रशासन आणि पोलीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षितता धोक्यात घालणे अन् ते या सर्वांना पुरून उरणे

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्याच संघराज्यामध्ये पंजाब नावाचे राज्य येते. ज्या पंजाबमध्ये आज काँग्रेस पक्षाचे सरकार असून तेथे अनागोंदी माजलेली आहे. त्यात मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणखी कोण कोण आहेत. काही मासांपूर्वीपर्यंत ज्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षातून बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केला, त्या कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही या सगळ्या घटनाक्रमावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, ‘त्याच मार्गाने मी आधी गेलो असतांना सर्व रस्ता मोकळा होता. अर्ध्या घंट्यानंतर पंतप्रधान तेथून जात असतांना त्या रस्त्यावर अचानक निदर्शक जमले आणि वाहतूक अडवली गेली.’ या वाहतूक कोंडीमध्ये २० मिनिटे अडकल्यानंतर पंतप्रधान मोदी भटिंडा विमानतळावर परत आले आणि तेथून देहलीला मार्गस्थ झाले. अर्थात् ठरलेली फिरोजपूर येथील सभा रहित करावी लागली. विमानतळावर आल्यानंतर परत देहलीला निघण्यापूर्वी मोदी यांनी तेथील पंजाबच्या पोलीस महासंचालकांना सांगितले, ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा की, मी सुखरूपपणे भटिंडा विमानतळावर पोचलो.’ यातला गर्भितार्थ लक्षात घ्या. ‘काँग्रेस पक्ष, पंजाबचे राज्य प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्या संगनमताने आपल्याशी घातपात करण्याचा बेत झाला होता’, असा संशय मोदी या एका वाक्यातून व्यक्त करत आहेत. ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, मी जिवंत भटिंडा विमानतळावर पोचलो’, हे वाक्य फार महत्त्वाचे आहे. त्यातून काँग्रेस कुठल्या थराला जाऊन व्यक्तीद्वेष करते, हे कळते; कारण या घटना घडल्यानंतर त्याचा गवगवा चालू झाला. तेव्हा ‘सभेला गर्दी नव्हती; म्हणून पंतप्रधान परत गेले’, इतकी निर्लज्ज प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाने दिली. नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी किती जमली, हा विषय नव्हता, तर देशाचा पंतप्रधान कोंडीत अडकला होता. त्याचा शिष्टाचार (प्रोटोकॉल) सांगतो की, पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत, तो संपूर्ण मार्ग आधीपासून सुरक्षित केला जातो. तेथे काही गडबड होणार नाही, याची काळजी स्थानिक पोलीस घेत असतात.

वातावरण वाईट असल्याने सभेच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने जाणे शक्य नव्हते. स्थानिक आणि पंजाब पोलीस यांनी अनुमती दिल्यानंतर ऐनवेळी रस्त्याने जायचे ठरले, हे पंजाब सरकारला ठाऊक होते. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणतात, ‘हे अचानक ठरले !’ हे अचानक ठरले नव्हते. तुम्ही पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार नाहीत, हे आदल्या रात्री ठरवले; पण तेथे तुमचे अर्थमंत्री मनजित सिंह बादल हे गेलेले होते. ‘आपण (पंतप्रधान) रस्त्याच्या मार्गाने जाणार आहोत’, हे तुमच्या अर्थमंत्र्यांना ठाऊक असेल, तर पंजाब सरकारला ठाऊक होते. पंजाबचे पोलीस आणि मनजित सिंह बादल यांनी अनुमती दिल्यानंतरच पंतप्रधान रस्त्याच्या मार्गाने जायला निघाले होते. त्या मार्गावर अचानक २०-२५ ट्रॅक्टर येतात आणि काही शेकडा निदर्शनकारी प्रदर्शक गोळा होतात, हे कसे शक्य आहे ? जर पंतप्रधान जाणार म्हणून तो रस्ता ‘सॅनेटाईज्ड’ (सुरक्षित) केलेला असेल, तर तेथे चिटपाखरूही जाऊ शकत नाही. मग हे अचानक कसे झाले ? कि जाणीवपूर्वक करण्यात आले होते ? नरेंद्र मोदी यांना पंजाबमध्ये मिळणारा जो प्रतिसाद आहे, त्याला घाबरून पंजाबच्या काँग्रेस सरकारने आणि पक्षाने असा अपशकुन घडवण्याचा प्रयत्न केला होता का ? आणि केला असेल, तर काही हरकत नाही; कारण नरेंद्र मोदी या सर्वांना पुरून उरलेले आहेत.