हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियानात उत्तर महाराष्ट्रातील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

३८५ जणांनी घेतली सुराज्याची प्रतिज्ञा !

धर्मप्रेमींनी प्रथमच १४ ठिकाणी दिले निवेदन !

धुळे येथे राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता !

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालतांना धर्मप्रेमी

जळगाव, ३० जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हे राज्यव्यापी अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार येथील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या अभियानात विविध ठिकाणी निवेदन देणे, फलकप्रसिद्धी, सामूहिक ‘वन्देमातरम्’, क्रांतिकारकांच्या स्मारकाची स्वछता, ‘सुराज्याची प्रतिज्ञा’ असे उपक्रम राबवण्यात आले. यात ३५ धर्मप्रेमींनी सहभागी झाले होते. या मोहिमेच्या अंतर्गत ३८५ धर्मप्रेमींनी सुराज्याची प्रतिज्ञा घेतली.

धुळे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाची स्वच्छता करतांना धर्मप्रेमी

प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून धुळे येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करण्यात आली.

१४ ठिकाणी निवेदन देण्यात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

हिंगोणा, यावल येथील शाळेतील मुख्याध्यापकांना निवेदन देतांना धर्मप्रेमी युवती

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, स्वरक्षण वर्गातील प्रशिक्षक, तसेच धर्मप्रेमी यांनी एकूण १४ ठिकाणी निवेदन दिले. यावल, पाळधी, आवार, खर्ची, हिंगोना, मस्कावद, विदगाव, तुरखेडा, नांद्रा, धामणगाव येथे प्रशासन, शाळा आणि अन्य ठिकाणी निवेदन देण्यात आले.

वैशिष्ट्यपूर्ण सूत्र

१. यावल येथील गुणेश वारूळकर या धर्माभिमान्याला बाजारातून जातांना एका दुकानात प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीसाठी ठेवलेले दिसले. तेव्हा त्याने हिंदु जनजागृती समितीच्या साधकांकडून मार्गदर्शन घेतले आणि त्यानंतर त्याने त्या व्यापार्‍याला भेटून त्याचे प्रबोधन केले. प्रबोधनामुळे व्यापार्‍याने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री बंद केली.

२. पाळधी येथील धर्मप्रेमी जितेंद्र चौधरी यांना त्यांच्या कार्यालयात सजावटीसाठी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणलेले दिसले. तेव्हा लगेच त्यांनी कार्यातील सहकार्‍यांचे प्रबोधन करून त्यांना प्लास्टिकचे राष्ट्रध्वज लावण्यापासून परावृत्त केले. अशाप्रकारे राष्ट्रध्वजाचा मान राखला गेला.

३. खर्ची बु. येथील धर्मप्रेमींनी गावातील ग्रामपंचायत, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा येथे निवेदन दिले. तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखू’ अशी सामूहिक प्रतिज्ञा केली.

४. धुळे येथील पोलीस अधीक्षक श्री. प्रवीणकुमार पाटील यांना निवेदन दिल्यावर, त्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला. ‘‘शहरात राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेऊ. तुम्हाला कुठे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज दिसल्यास आम्हाला सांगा, आम्ही कारवाई करू’’, असे त्यांनी सांगितले.

५. धुळे येथील २ स्थानिक वृत्तवाहिन्यांवर समितीच्या मोहिमेला चांगली प्रसिद्धी मिळाली आणि या माध्यमातून १४ लाख दर्शकांपर्यंत हा विषय पोचला.