निवडणूक : खोटी आमिषे आणि लाच देण्याचा हंगाम !

शनिवार ८.१.२०२२ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार’ या सदराखाली एक विचार होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘निवडणुका आणि सरकारविरुद्धच्या काही मोहिमा सोडल्यास राजकीय पक्ष नागरिकांचे अन् देशाचे भले व्हावे, म्हणून एकतरी मोहीम राबवतात का ? त्या संदर्भात ते काही करतात का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले’, असा तो विचार होता. हे वाचल्यावर माझी जी विचारप्रक्रिया झाली, ती येथे देत आहे.

१. निवडणुकांच्या काळात दिसून येणारी लोकप्रतिनिधी आणि मतदार यांची तामसिक वृत्ती

प्रत्येक ५ वर्षांनी भारतातील कोणत्या तरी राज्यात लोकशाहीचे मरणासन्न नृत्य चालू असते. सध्या ते गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांत चालू आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७४ वर्षांत आपल्या राष्ट्राची अंधःकारमय भविष्याकडे घसरण चालू आहे. या नृत्यातील मुख्य पात्रांना (लोकप्रतिनिधींना) ‘ते आणि त्यांची येणारी पिढी यांना एैषोरामात रहाता येईल’, यासाठी ही स्थिती पालटायची नाही. बराच काळ हे असेच चालू राहिल्यामुळे या कलाकारांना नागरिकांना फसवून स्वतःच्याच देशाला लुटण्याचे कौशल्य प्राप्त झाले आहे. ब्रिटिशांना सामील होऊन भारतियांच्या पाठीत खंजीर खुपसणार्‍यांची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. ‘दुर्दैवाने देश खड्ड्यात गेला, तरी स्वतःचा लाभ कसा होईल’, अशी तामसी वृत्ती लोकशाहीतील जनतेची बनली आहे.

श्री. अरविंद ठक्कर

२. केवळ ४० जागांसाठी १४ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असणे, हे राजकीय घोडेबाजाराला निमंत्रण !

गोव्याचे उदाहरण घेतल्यास याविषयीची कल्पना येईल. काही वर्षांपूर्वी गोव्यात काँग्रेस आणि मगो हे दोनच पक्ष होते. आज भाजप, काँग्रेस, मगोप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, गोवा फॉरवर्ड पक्ष, युनायडेट गोवन डेमोक्रेटिक पक्ष, गोवा सुरक्षा मंच, गोवा प्रजा पक्ष, गोवा सुराज्य पक्ष, गोवा विकास पक्ष, गोवा डेमोक्रेटिक पिपल्स फ्रंट यांसह आप आणि तृणमूल काँग्रेस हे गोव्यात नव्याने आलेले पक्ष त्यांना मिळणार्‍या संपत्तीच्या लालसेने ४० जागांसाठी निवडणूक लढवत आहेत. मी केवळ १४ राजकीय पक्षांचा उल्लेख केला आहे. याखेरीज या पक्षांनी उमेदवारी न दिलेले काही जण अपक्ष म्हणून उभे रहातील. यामुळे विधानसभेत कोणत्याच पक्षाला बहुमत प्राप्त न होता विधानसभा लोंबकळत राहिली (म्हणजे सरकार स्थापन करण्याएवढे उमेदवार निवडून न आल्याने सत्तास्थापनेविषयी पेच निर्माण झाला), तर हे लोक स्वतःचा खिसा भरण्याचा प्रयत्न करतील. (म्हणजे अन्य पक्षांकडून पुष्कळ पैसे, सरकारमध्ये मोठी मंत्रीपदे देण्याचे आश्वासन घेऊन त्या बदल्यात त्या पक्षासमवेत युती करून सरकार स्थापनेसाठीचे आवश्यक संख्याबळ जमवतील.) सामान्यतः याला ‘घोडेबाजार’ म्हटले जाते. खरे म्हणजे हा घोड्यांचाही अपमान ठरेल ! या १४ पक्षांखेरीज सध्या कार्यरत नसलेले अजून १२ राजकीय पक्ष आहेत.

उमेदवारी मिळवण्यासाठी पक्ष पालटण्याचेही प्रकार या काळात वाढतात. ‘गोव्याच्या कल्याणासाठी मी एक पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात गेलो’, असे या नेत्यांकडून सांगितले जाते. हा एक आता विनोद झाला आहे. या नेत्यांचे म्हणणे कुणीही गंभीरपणे ऐकत नाही. एका पक्षातून दुसर्‍या पक्षात उड्या मारणे, हे केवळ संपत्ती मिळवण्यासाठी आहे, हे आज लोकांना ठाऊक झाले आहे.

३. निवडून येण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेल्या अतर्क्य घोषणा !

आज कोणतेही वर्तमानपत्र पाहिल्यास त्यामध्ये राजकीय पक्ष आणि अपक्ष यांची अनेक विज्ञापने दिसतात. याखेरीज रस्ते, इमारती आणि वाहने यांवरही अनेक विज्ञापने दिसत आहेत. या सर्वांमध्ये ‘आम्ही सर्वकाही गरिबांच्या प्रगतीसाठी करत आहोत’, असे भासवले जाते. उदाहरण म्हणून आप, तृणमूल काँग्रेस, भाजप या पक्षांनी केलेल्या घोषणा आपण पाहू.

अ. प्रत्येक युवकाला प्रत्येक मासाला (महिन्याला) ३ सहस्र रुपये दिले जातील.

आ. हिंदु, मुसलमान आणि ख्रिस्ती यांना अनुक्रमे अयोध्या, अजमेर शरीफ दर्गा आणि वेलंकिणी या ठिकाणी तीर्थयात्रा घडवली जाईल.

इ. वीज विनाशुल्क दिली जाईल.

ई. सत्तेवर आल्यास ‘प्रत्येक महिलेच्या खात्यावर ५ सहस्र रुपये जमा केले जातील

उ. प्रत्येक युवकाला ४ टक्के व्याज दराने २० लाख रुपयांपर्यंतचे ‘क्रेडिट कार्ड’ दिले जाईल.

ऊ. इंधनावरील सवलतीत अडीच पटींनी वाढ केली जाईल.

अशा प्रकारे खोटी आमिषे आणि मतदारांना एक प्रकारे लाच देणे यांची सूची न संपणारी आहे. विनामूल्य वस्तू, सुविधा आणि अनुदाने यांचे पैसे कुणाच्या खिशातून दिले जाणार आहेत ? अशा प्रकारे हे तथाकथित लोकप्रतिनिधी लाच देऊ करतात; कारण ‘लोकच लाच मागतात’ कि ‘नेत्यांचीच लाचखोर वृत्ती आहे ?’ ‘यथा प्रजा तथा राजा’ कि ‘यथा राजा तथा प्रजा’ ?

४. आगामी निवडणुकीत अशा प्रकारचे भ्रष्ट नेते निवडून येऊ नयेत, यासाठी प्रार्थना करा !

लोकशाहीतील अशा भीषण परिस्थितीत परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला मार्गदर्शन करत असल्याने आपण सुदैवी आहोत. ‘वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘आगामी निवडणुकीत अशा प्रकारचे भ्रष्ट नेते निवडून येऊ नयेत आणि हिंदु राष्ट्राचा आरंभ गोव्यातून व्हावा’, अशी प्रार्थना सर्व गोमंतकियांनी करावी. ‘खोटी आमिषे आणि लाच देण्याचा हंगाम नष्ट होऊन पुढे निवडून येणारे नेते नागरिक अन् राष्ट्र यांच्या कल्यासाठी कार्य करतील’, अशी आशा आपण बाळगूया.

– श्री. अरविंद ठक्कर, गोवा. (८.१.२०२२)