देश, राज्य आणि राष्ट्र !

देश, राज्य आणि राष्ट्र हे तीन वेगवेगळे विचार आहेत. देश हा ‘दिक्’ शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ दिशा आहे. भारताच्या उत्तर दिशेला हिमालय, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामध्ये जो भूभाग आहे तो म्हणजे भारत. राज्य म्हणजे राज्यव्यवस्था अथवा प्रणाली, उदा. भारतातील न्यायव्यवस्था, भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस्.), लोकशाहीचे ४ स्तंभ आहेत. रामराज्याचा उल्लेख, ‘तेथील व्यवस्था आदर्श होती’, या अर्थी आहे.

राष्ट्र हे सहजासहजी बनत नाही. राष्ट्र हे सीमांमध्ये नसते, ते कोणा व्यक्तीच्या आतही जीवित असू शकते; म्हणून इस्रायल हे राष्ट्र आहे. त्यांच्या संसदेने २३ जुलै २०१८ या दिवशी प्रस्ताव पारित केला की, इस्रायल हे ज्यू राष्ट्र आहे. राष्ट्र बनण्यासाठी काही गोष्टी असणे आवश्यक आहे. त्यामध्ये भूमी, जनसमूह, संस्कृती, सभ्यता, इतिहास, धर्म, साहित्य, कला, राजनीती, राजजीवन दर्शन या दहा गोष्टी जिथे आहेत, त्याला ‘राष्ट्र’ म्हणतात.

श्री. रमेश शिंदे

इस्रायलकडे २ सहस्र वर्षे भूमी नव्हती. तरी त्यांच्या मनातील राष्ट्र संपलेले नव्हते. त्यांनी त्यांची संस्कृती, सभ्यता जिवंत ठेवली आणि राष्ट्र निर्माण केले.

याउलट स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याकडे अद्याप इंग्रजी भाषा आहे. ग्रेगेरिअन कालगणना स्वीकारली आहे. हिंदु पंचांग स्वीकारले नाही. भारतात तीन ऋतू आहेत. जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात. त्यांच्या कालगणनेनुसार आपण का चालतो ?, हा खरा प्रश्न आहे. हिंदु राष्ट्राच्या अनुषंगाने मूलभूत काही गोष्टींमध्ये पालट व्हायला हवा ते म्हणजे मातृभाषा आणि शिक्षणपद्धती. या दोन गोष्टी प्रथम ठरवायला हव्यात.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती