२५ जानेवारी या दिवशी असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त…
२५ जानेवारी २०२२ या दिवशी स्वामी विवेकानंद यांची तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे शिक्षणाविषयीचे काही अमूल्य विचार पुढे देत आहोत.
१. ‘माणूस’ निर्माण करणारे आणि चारित्र्य घडवणारे शिक्षण हवे !
‘आयुष्यभर आत्मसात न झालेला आणि मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला ज्ञानाचा भारा म्हणजे शिक्षण नव्हे ! आपले जीवन घडवणारे, ‘माणूस’ निर्माण करणारे, चारित्र्य घडवणारे आणि चांगले विचार आत्मसात करण्यास शिकवणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही ४ – ५ चांगले विचार आत्मसात करून ते आपले जीवन आणि आचरण यांत उतरवले, तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्यापेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरील !
२. ‘मनुष्य’ निर्माण करण्यास सर्वथा अयशस्वी ठरलेले आणि भयंकर दोष निर्माण झालेले आजचे शिक्षण !
आपल्या देशाच्या आध्यात्मिक आणि भौतिक शिक्षणाचा भार आपण घेतला पाहिजे, हे तुमच्या लक्षात येते का ? आज तुम्हाला मिळत असलेल्या शिक्षणात काही चांगल्या गोष्टी आहेत; पण त्यात एवढे भयंकर दोष आहेत की, त्यांच्यामुळे चांगल्या गोष्टी निरुपयोगी ठरत आहेत. पहिली गोष्ट अशी की, हे शिक्षण ‘मनुष्य’ निर्माण करणारे नाही, ते सर्वस्वी निषेधप्रधान आहे. निषेधप्रधान शिक्षण हे मृत्यूहून वाईट होय.’
(साभार : ‘शक्तीदायी विचार’, स्वामी विवेकानंद (सहावी आवृत्ती), रामकृष्ण मठ, नागपूर)