चीनने अमेरिकेच्या विमानांच्या फेर्‍या रहित केल्यानंतर अमेरिकेकडून चिनी विमानांच्या फेर्‍या रहित !

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनने कोरोना निर्बंधांचे कारण पुढे करत अमेरिकेला जाणार्‍या काही विमानांच्या फेर्‍या स्थगित केल्या. यानंतर अमेरिकेनेही चीनच्या ४ विमान आस्थापनांच्या अमेरिकेहून चीनला जाणार्‍या ४४ फेर्‍या रहित करण्याचा निर्णय घेतला. विमानांची ही उड्डाणे ३० जानेवारीपासून स्थगित होणार आहेत.

याविषयी वॉशिंग्टनमधील चिनी दुतावासाचे प्रवक्ते ली पेंगीऊ म्हणाले की, चीनमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठीचे धोरण हे चिनी विमान आस्थापने आणि इतर देशांच्या विमान आस्थापनांसाठी समान आहे. ते न्याय्य आणि पारदर्शक आहे. याउलट अमेरिकेचे धोरण हे समर्थनीय नाही. त्यांनी चिनी आस्थापनांच्या नियमित प्रवासी सेवांवर निर्बंध आणून अडथळे आणू नयेत.