संभाजीनगर – शहरात ६ ते ८ दिवसांनी पाणी मिळत असल्याने १८ जानेवारी या दिवशी सिडको एन्.-७ भागातील महिला आणि नागरिक यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना घेराव घालून आंदोलन केले होते. आंदोलक ज्या भागात रहात होते, त्या ठिकाणी त्या दिवशी रात्री पाणीपुरवठा झाला; मात्र इतर अनेक वसाहतींतील पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी माजी नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्या नेतृत्वात २० जानेवारी या दिवशी रिकाम्या हंड्यांसह पाणीपुरवठा कार्यालयात २ घंटे ठिय्या आंदोलन केले. दुपारी १२ वाजता प्रशासक पांडेय यांनी दांडगे यांच्याशी संपर्क साधून आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी माघार घेतली. सायंकाळी ५.३० वाजता सर्व वसाहतींना पाणी मिळाले. (याचा अर्थ नागरिकांनी आंदोलन केल्यानंतरच त्यांची पाण्यासारखी मूलभूत गरज भागणार का ? असे प्रशासन काय कामाचे ? – संपादक)