इराणी महिला पत्रकाराने हिजाब काढून टाकत असल्याचा व्हिडिओ प्रसारित करून महिलांना तसे अनुकरण करण्याचे आवाहन !

भारतातील तथाकथित महिलावादी नेत्या, संघटना, महिला आयोग आदी या इराणच्या महिला पत्रकाराला पाठिंबा देतील का ? – संपादक

तेहरान (इराण) – इराणी महिला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या मसिह अलीनेजाद यांनी महिलांवर हिजाबची केली जाणारी सक्ती धुडकावून लावली आहे. मसिह यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. व्हिडिओत काही सेकंदांसाठी मसिह या हिजाब परिधान केल्याचे दिसत आहेत. ‘इस्लामिक रिपब्लिक, तालिबान आणि इस्लामिक स्टेट या संघटना आपल्याला अशा प्रकारे पाहू इच्छितात’ असे त्यांनी त्यांच्या हिजाब घातलेल्या  रुपाविषयी म्हटले; मात्र नंतर लगेचच हिजाब काढून टाकत त्या ‘हे माझे खरे रुप आहे’ असे म्हणत असल्याचे दिसत आहेत. या वेळी त्यांनी मुसलमान महिलांना हिजाब न घालण्याचे आवाहन केले.

मसिह यांनी व्हिडिओत पुढे म्हटले आहे की,

१. हिजाब काढला, तर ‘इराणमध्ये मला केसांसह टांगले जाईल, शाळेतून हाकलून दिले जाईल, फटके मारले जातील, कारागृहात टाकले जाईल, दंड ठोठावला जाईल, रस्त्यावर पोलीस प्रतिदिन मारहाण करतील आणि माझ्यावर बलात्कार झाला, तरीही ती माझीच चूक असेल’, अशा अनेक धमक्या दिल्या जातील.

२. हिजाब काढला, तर माझ्याच मातृभूमीत एखाद्या स्त्रीसारखे मी जगू शकणार नाही. पाश्‍चिमात्य देशांत मला सांगितले गेले की, जर मी माझ्या कथा कुणाला सांगितल्या, तर ‘इस्लामोफोबिया’साठी (इस्लामविषयीच्या द्वेषासाठी) मीच उत्तरदायी असीन.

३. मी मध्यपूर्व आशियातील एक महिला आहे. मला इस्लामी कायद्यांची भीती वाटते. मी अनुभवलेल्या प्रत्येक क्रूरतेची मला भीती वाटते. ‘फोबिया’ (एखाद्या गोष्टीची भीती वाटणे) ही एक अतार्किक भीती आहे; पण माझ्या आणि मध्यपूर्वेतील अनेक महिलांच्या शरियत कायद्याखाली रहाणाच्या भीतीमागे एक तर्क आहे, चला बोलूया’ असे म्हणत त्यांनी महिलांनाही आवाहन केले आहे.

४. तुम्हाला असे किती देश ठाऊक आहेत जेथे महिलांना हिजाब न घातल्याने कारागृहात टाकले जाते किंवा फटके मारले जातात ? हिजाबाच्या सक्तीविरोधात आवाज उठवणार्‍या  किमान ५ कार्यकर्त्या कारागृहात आहेत. सबा कोर्दफशारी केवळ २० वर्षांची होती, तिला २७ वर्षांचा तुरुंगवास आणि यास्मानला १६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

५. हे २१ वे शतक असून आम्हाला त्रास न होता मुक्तपणे जगायची इच्छा आहे. कोणत्याही बंधनाविना कोणत्याही धर्मावर टीका करण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे.