परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले चि. नारायण पाटील अन् भावपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांची गुणवैशिष्ट्ये !

हसतमुख आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले चि. नारायण पाटील अन् परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांची गुणवैशिष्ट्ये !

चि. नारायण पाटील यांची गुणवैशिष्ट्ये !

चि. नारायण पाटील

श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘नारायणदादा सतत हसतमुख असतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटते.

२. साधकांना आधार देणे

अ. मला दादाशी सहजतेने बोलता येते आणि सेवेत त्यांचे साहाय्य घेता येते.

आ. साधकांना ‘त्यांना येणारी अडचण दादांना सांगितली की, दादा ती तत्परतेने सोडवणारच’, असा विश्वास वाटतो. साधकांना एखादी सेवा करायला शक्य होत नसतांना त्याविषयी नारायणदादांना सांगितल्यावर ते तत्परतेने साहाय्य करतात.

इ. दादा बांधकामाच्या संबंधित सेवा करतात. साधकांना बांधकामाच्या दृष्टीने येणार्‍या लहान-मोठ्या अडचणी दादांना विचारल्यावर ते त्यावर लगेच उपाययोजना काढतात आणि कृती करून अडचणी सोडवतात.

३. पुढाकार घेऊन सेवा करणे : आश्रमातील बांधकामांतर्गत गवंडीकाम, रंगकाम, पावसाळी कामे इत्यादी सेवांचे दायित्व घेऊन नारायणदादा कामगारांकडून सेवा पूर्ण करवून घेतात. त्यांना येणार्‍या अडचणी दादा संबंधितांना विचारून घेऊन तत्परतेने सोडवतात. दादा कामगारांशी प्रेमाने वागत असल्याने कामगारांना दादांचा आधार वाटतो. दादांनी सेवा सांगितल्यावर कामगार केव्हाही आणि परिपूर्ण सेवा करायला सिद्ध असतात.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य चांगले होण्याच्या दृष्टीने ते सतत प्रयत्न करतात.’

श्री. संजय नाणोसकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. अभ्यासू वृत्ती : ‘नारायणदादांना आश्रमातील काही सूत्रांसंदर्भात अभ्यास करायला सांगितल्यास ते ती सूत्रे अभ्यासपूर्ण मांडतात.

२. शिकण्याची वृत्ती : त्यांना प्रथम रंगकामाची सेवा देण्यात आली होती. ती सेवा संपल्यावर त्यांनी नळजोडणी आणि दुरुस्ती सेवाही शिकून घेतल्या. नळजोडणी सेवेचे दायित्व असलेला साधक गावी गेल्यावर दादांनी नळजोडणी संबंधित दुरुस्तीच्या सेवा केल्या.

३. निर्भीडपणा : दादा त्यांची मते निर्भीडपणे मांडतात. त्या वेळी ते ‘अधिक योग्य काय असेल ?’, हे लक्षात घेऊन मांडण्याचा प्रयत्न करतात.

४. प्रांजळपणा : त्यांना एखाद्या सूत्राविषयी काही शंका असल्यास ते लगेचच विचारून घेतात, तरीही त्यांच्या लक्षात आले नसल्यास ते तसे प्रांजळपणे सांगतात.

श्री. दीपक गोडसे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

नियोजनबद्धता : ‘नारायणदादा अल्प कालावधीत अधिक सेवा कशा प्रकारे पूर्ण करता येतील ?’, असा विचार करून सेवांचे नियोजन करतात. ‘आश्रमात सेवेसाठी आलेल्या बाहेरील कामगारांचा वेळ वाया जायला नको’, अशा प्रकारे दादा त्यांच्या सेवांचे नियोजन करून त्यांच्याकडून योग्य प्रकारे सेवा करवून घेतात.’

सौ. मनीषा दीपक परब, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ असलेले नारायणदादा साधकांच्या अडचणीच्या वेळी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता धावून जातात.’

(१३.१.२०२२)

पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली चि.सौ.कां. सोनाली वसंत गायकवाड यांची गुणवैशिष्ट्ये !

पू. शिवाजी वटकर

‘देवद आश्रमात कु. सोनालीताईंचा माझ्याशी काही वर्षांपासून सेवेच्या संदर्भात अधूनमधून संबंध येतो. त्या वेळी मला त्यांच्यातील अनेक गुण आणि साधकत्व लक्षात आले. त्यातील काही उदाहरणे येथे दिली आहेत.

१. सोनालीताई आश्रमातील साहित्य आणि सुविधा यांचा साधक अन् गुरुकार्य यांसाठी अधिकाधिक लाभ होण्याच्या दृष्टीने कटाक्षाने प्रयत्न करतात.

२. साधकसंख्या अल्प असतांना तळमळीने आणि सकारात्मक राहून सेवा करणे : वर्षभर आश्रमात असणारे साधक दिवाळी आणि गणेशोत्सव या कालावधीत घरी जातात. त्या वेळी आश्रमात साधकसंख्या अल्प असल्याने आश्रमातील नियमित सेवांचे नियोजन करतांना अडचणी येतात. वर्ष २०२१ च्या दिवाळीच्या कालावधीत बरेच जण घरी गेल्याने सोनालीताईंनी घरी जाण्यापेक्षा आश्रमात रहायचे ठरवले. मी त्यांची अधूनमधून विचारपूस करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच सोनालीताई स्थिर राहून, तळमळीने आणि निष्ठेने सेवा करत आहेत’, असे मला जाणवले. पूर्वी ताईंवर सेवेचे दायित्व वाढल्यावर त्यांना ताण येऊन त्यांची चिडचिड व्हायची; मात्र त्यांनी या दिवाळीच्या कालावधीत सेवा करतांना पुढील दृष्टीकोन आणि भाव ठेवला होता. तो त्यांच्याच शब्दांत देत आहे.

२ अ. ईश्वर त्याचे कार्य करवून घेणारच आहे, मला केवळ त्यात सहभागी होण्याची संधी मिळत आहे : ‘आतापर्यंतच्या माझ्या अनुभवावरून साधकसंख्या कितीही अल्प असली, तरी देवाने आश्रमातील कार्य नेहमीप्रमाणेच करवून घेतले आहे, उदा. साधकांना महाप्रसाद वेळेतच मिळाला आहे. प्रसाधनगृहाची स्वच्छता प्रतिदिन होते. हे ईश्वरी कार्य असल्याने ईश्वर करवून घेणार आहे. ईश्वराने ते केलेलेच आहे. मला केवळ त्यात सहभागी होण्याची संधी मिळत आहे.

२ आ. मी नकारात्मक विचार करून ताण घेण्यापेक्षा मला सकारात्मक विचार करून शिकण्याच्या स्थितीत रहायचे आहे.

२ इ. सहसाधकांकडे असलेली सेवा करणे, म्हणजे त्यांच्यातील गुण स्वतःत बाणवण्याची संधी असणे : माझ्या समवेत सेवेसाठी सौ. स्नेहा हाके असते. आता ती आश्रमात नसल्याने तिची सेवाही मला करायची आहे. स्नेहाताई सर्वांशी बोलून जवळीक साधते. मला तिची सेवा करत असतांना केवळ ते कार्य पूर्ण करायचे नसून तिच्यातील गुण माझ्या अंगी बाणवायचे आहेत. सौ. पूजा गरुड आश्रमात नाही. तिच्या सेवेचे दायित्व सांभाळतांना मला तिच्यातील गुण आत्मसात करायची ही संधी आहे, उदा. तिच्याकडे कितीही सेवा असली, तरी ती कसलेही गार्‍हाणे न करता चिकाटीने सेवा पूर्ण करते. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी मला अधिकाधिक सेवेचे दायित्व दिलेले आहे. यातून त्या माझी क्षमता वाढवून घेत आहेत. त्या आश्रमात नसल्या, तरीही मी त्यांना माझी अडचण सांगून त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकते. त्यांचा मला आधार आहे. त्या माझ्याकडून सर्व सेवा करवून घेणारच आहेत.

३. गुरुदेवांनी पाठवलेला खाऊ आणि प्रसाद वात्सल्यभावाने साधकांना देणे : साधकांचा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लेख छापून आल्यावर, तसेच गुरुपौर्णिमा किंवा सण या प्रसंगी परात्पर गुरु डॉ. आठवले संत आणि साधक यांना खाऊ (प्रसाद) पाठवतात. सोनालीताईंकडे ते संबंधितांना देण्याचे दायित्व असते. त्या ही सेवा निरपेक्षभावाने करत असतांना मला त्यांच्यात आईसारखा वात्सल्यभाव जाणवतो. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना कसे घडवले आहे’, याची जाणीव होऊन माझा भाव जागृत होतो. मी सोनालीताईंना याविषयी विचारल्यावर ‘त्या पुढील दृष्टीकोन आणि भाव ठेवतात’, असे त्यांनी मला सांगितले.

अ. ‘कधी कधी खाऊ चांगल्या स्थितीत आहे कि नाही ?’, हे मला चाखून बघावे लागते. ‘त्या वेळी साधकांना चांगला खाऊ मिळावा’, असा माझा उद्देश असतो.

आ. साधकांना खाऊ देण्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांचा निरोप असतो. त्यांचा खाऊ म्हणजे त्यांचे चैतन्य अन् आशीर्वाद साधकांपर्यंत पोचवण्याच्या सेवेची संधी मला गुरुदेवांनी दिली आहे.

इ. गुरुदेवांचे सर्वत्र लक्ष असते. खाऊ वितरणाची सेवा करतांना गुरुदेवांचे माझ्याकडेही लक्ष आहे. मला ती सेवा परिपूर्ण, भावपूर्ण आणि त्यांना अपेक्षित अशीच केली पाहिजे.’

‘असे अनेक दैवी गुण असणार्‍या सोनालीताई म्हणजे लक्ष्मीचे लहानसे रूप आहेत’, असे मला वाटते. आता या लक्ष्मीचा विवाह देवद आश्रमातील अत्यंत कृतीशील अन् सद्गुणी साधक श्री. नारायण यांच्याशी होत आहे. या ‘लक्ष्मी-नारायण’ जोडीची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांना जीवनात सदैव आनंद मिळो’, अशी मी विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.१.२०२२)

चि.सौ.कां. सोनाली वसंत गायकवाड यांची गुणवैशिष्ट्ये !

चि.सौ.कां. सोनाली वसंत गायकवाड

सौ. छाया दशरथ राऊत (मोठी बहीण), हडपसर, पुणे. (११.१.२०२२) 

१. समंजस : ‘आम्ही एकूण ५ बहिणी आहोत (१. सौ. धनश्री अण्णासाहेब शिंदे, जळगाव सेवाकेंद्र, २. सौ. मनीषा महेंद्र साळुंके, हडपसर, पुणे ३. सौ. जयश्री अविनाश क्षीरसागर, करंजे, बारामती ४. सौ. छाया दशरथ राऊत, हडपसर, पुणे ५. चि.सौ.कां. सोनाली वसंत गायकवाड, सनातन आश्रम, देवद, पनवेल). आम्हा बहिणींत कु. सोनाली लहान आहे. आमची आई गावाला जात असतांना सोनालीने कधीही हट्ट केला नाही, तसेच तिने कधीही कोणत्याही वस्तूसाठी हट्ट केला नाही. ती पुष्कळ समजूतदार आहे.

२. प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ करणे : ‘सोनाली लहान असल्यापासून प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ करते. ती कपड्यांच्या घड्या अतिशय व्यवस्थित घालते. ती भाज्यांच्या फोडी एकसमान चिरते. तिचे हस्ताक्षरही चांगले आहे.

३. जवळीक साधणे : ती नातेवाइकांकडे गेल्यावर, तसेच आम्हा बहिणींच्या सासरी आल्यावरही सर्व कामे पुढाकार घेऊन आणि पटापट करते. त्यामुळे सर्व जण तिचे कौतुक करून म्हणतात, ‘‘ही पुष्कळ वेगळी आहे.’’ ती लहान मुले, मोठी माणसे आणि वृद्ध यांच्याशी अल्प वेळेत जवळीक साधते. त्यामुळे ‘ती येणार आहे’, असे समजल्यावर सगळ्यांनाच पुष्कळ आनंद होतो.

४. प्रेमभाव : ती कधीही कुणाशीही भांडली नाही किंवा तिने कधीही कुणाला दुखावले नाही. त्यामुळे ती सगळ्यांना हवीहवीशी वाटते. ती लहान असल्यापासूनच तिला एखाद्या व्यक्तीविषयी तिच्या मागे बोललेले आवडत नाही, तसेच कुणी अनावश्यक बोलल्यास ती संबंधितांना चुकीची लगेचच जाणीव करून देते. पूर्वी ती अबोल होती; पण आता ती समोरच्या व्यक्तीला चुका स्पष्टपणे, कुणाचेही मन न दुखावता आणि प्रेमाने सांगते.’

५. तत्वनिष्ठपणा : ती आम्हा बहिणींना आध्यात्मिक स्तरावर आणि तत्त्वनिष्ठतेने सांगते.

परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेमुळे लहानपणापासूनच अनेक दैवी गुण असलेली बहीण आम्हाला लाभली. ‘तिच्यातील सर्व गुण आमच्यातही येऊन आम्हाला तिच्याकडून सतत शिकता येऊ दे’, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे.’

केला उद्धार गुरुदेवा, हे लक्ष्मी-नारायण स्वयंवर रचूनी ।
अश्विन नक्षत्री जन्म असे सोनालीचा ।
पू. अश्विनीताईने (टीप १) सदैव हात दिला स्नेहाचा (टीप २) ।। १ ।।

आम्ही सर्व अजाण होतो, या संचितापासूनी ।
केला उद्धार गुरुदेवा, हे लक्ष्मी-नारायण (टीप ३) स्वयंवर रचूनी ।। २ ।।

कृष्ण गोड हसूनी सांगत असे रुक्मिणीला (टीप ४) ।
बघ या स्वयंवरात मी रचलेली अगाध लीला ।। ३ ।।

तीव्र प्रारब्ध सोसून मन खळखळत राहिले नर्मदे (टीप ५) परि ।
गुरुमाऊलींनी फुलवली सुमने (टीप ६) वसंता परि ।। ४ ।।

या स्वयंवराचे निमित्त करून केला उद्धार या पंचकळ्यांचा (टीप ७) ।
यावर वरदहस्त असे सदैव गुरुदेव (टीप ८) आणि सद्गुरु माता यांचा (टीप ९) ।। ५ ।।

टीप १ – पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार
टीप २ – सौ. स्नेहा सचिन हाके
टीप ३ – चि.सौ.कां. सोनाली वसंत गायकवाड आणि चि. नारायण कृष्णा पाटील
टीप ४ – श्री. नारायण पाटील यांचे वडील – श्री. कृष्णा पाटील, श्री. नारायण पाटील यांची आई – सौ. रुक्मिणी पाटील
टीप ५ – चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांच्या आईचे नाव – सौ. नर्मदा गायकवाड, चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांच्या वडिलांचे नाव – श्री. वसंत गायकवाड
टीप ६ – श्री. नारायण पाटील यांची बहीण (सौ. सुमन अरुण पाटील, बेळगाव)
टीप ७ – आम्ही ५ बहिणी (१. सौ. धनश्री अण्णासाहेब शिंदे, जळगाव सेवाकेंद्र, २. सौ. मनीषा महेंद्र साळुंके, हडपसर, पुणे ३. सौ. जयश्री अविनाश शिरसागर, करंजे, बारामती ४. सौ. छाया दशरथ राऊत, हडपसर, पुणे ५. चि.सौ.कां. सोनाली वसंत गायकवाड, सनातन आश्रम, देवद, पनवेल)
टीप ८ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप ९ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

– सौ. धनश्री अण्णासाहेब शिंदे (चि.सौ.कां. सोनाली यांची मोठी बहीण), जळगाव (११.१.२०२२)

श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणे : ‘कु. सोनालीताई सेवेशी एकरूप होऊन सेवा करतात. त्या सहसाधक आणि उत्तरदायी साधक यांचे मार्गदर्शन घेऊन सेवा करत असल्यामुळे त्यांनी केलेल्या सेवेत परिपूर्णता असते. त्यांच्यातील नेतृत्वगुणामुळे कोणतीही मोठी सेवा त्या सहजतेने करू शकतात. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याप्रती मनात भाव ठेवून भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करत असल्याने त्यांच्या सेवेची फलनिष्पत्तीही चांगली असते.

२. साधकांना साधनेत साहाय्य करणे : ‘साधकांना साधनेत साहाय्य करणे’, हा कु. सोनाली यांच्यातील गुण सदैव कार्यरत असतो. साधकांना मनाच्या स्तरावर येणार्‍या अडचणी स्वतःहून ओळखून त्या साधकांना साहाय्य करतात. साधकही स्वतःहून त्यांना अडचणी सांगून त्यांचे साधनेसाठी साहाय्य घेतात. काही मासांपूर्वी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सोनालीताईंना स्वयंपाकघरातील साधकांना भावजागृतीच्या प्रयत्नांसाठी साहाय्य करायला सांगितले. तेव्हा सोनालीताईंनी प्रतिदिन एक घंटा भाववृद्धी सत्संग घेऊन भावजागृतीचे प्रयत्न वाढवण्यासाठी साधकांना साहाय्य केले. त्यामुळे साधकांना भाववृद्धी होण्यासाठी आणि स्वभावदोषांवर मात करण्यासाठी दिशा मिळाली. ‘त्या भाववृद्धी सत्संगात सांगत असलेले भावप्रयोग ऐकूनच समोरच्या साधकातील भाव वृद्धींगत होतो’, असे लक्षात आले.’

श्री. विनायक आगवेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

भाव  : ‘सोनालीताई सेवेला भावाची जोड देत असल्याने त्यांना विविध सूत्रे सुचतात. ताईंमध्ये ‘प्रत्येक गोष्ट घडत आहे, ती भगवंताची कृपाच आहे’, असा कृतज्ञताभाव जाणवतो. त्या प्रत्येक परिस्थिती स्वीकारून त्यात समाधानी रहाण्याचा प्रयत्न करतात.’

सौ. मनीषा दीपक परब, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ‘सोनालीताई दिवसभर सेवेत व्यस्त असल्या, तरीही त्या नामजपादी उपाय आणि व्यष्टी साधनेची सूत्रे तळमळीने पूर्ण करतात.

२. तत्त्वनिष्ठतेने साधकांच्या साधनेचा आढावा घेणे : ताई साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या वेळी त्या साधकांना तत्त्वनिष्ठतेने हाताळतात. त्या प्रसंगी कठोर शब्दांत साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देतात. (त्या वेळी आई जसे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रसंगी त्यांच्याशी कठोरपणे वागते, तसे ताईंचे वागणे जाणवते.)

३. अष्टपैलू व्यक्तीमत्त्व : त्या आश्रमात अनेक सेवा लीलया करतात. सोनालीताई अनेक प्रकारच्या सेवांमध्ये कितीही व्यस्त असल्या, तरीही समोरच्या व्यक्तीला स्मितहास्य करत प्रतिसाद देतात. त्यांना ‘दैवी गुणांनी युक्त अष्टपैलू व्यक्तीमत्त्व’ असे संबोधले, तर वावगे ठरू नये.’

(१६.१.२०२२)


नवीन सेवा शिकण्याची तळमळ असलेले आणि परिपूर्ण सेवेतून संतांचे मन जिंकणारे चि. नारायण पाटील !

१. परिपूर्ण सेवेतून संतांचे मन जिंकणे : ‘नारायणदादा प्रत्येक सेवा परिपूर्ण करतात. आश्रमातील पिठाची घरघंटी (घरगुती पिठाची गिरणी) जुनी दिसत होती. त्याचे रंगकाम करायचे होते. तेव्हा दादांनी ती सेवा केली. पू. (सौ.) अश्विनी पवार घरघंटी पाहून म्हणाल्या, ‘‘नारायणदादा, रंगकाम पुष्कळ छान केले आहेत. ‘घरघंटी जुनी आहे’, असे वाटतच नाही. तुम्ही सेवा मनापासून आणि भावपूर्ण करता.’’ तेव्हा ‘दादा सेवेतून संतांचे मन जिंकतो’, हे माझ्या लक्षात आले.

२. नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ : काही मासांपूर्वी दादांना सेवा करण्यासाठी संगणक शिकायचा होता. त्यांना दुपारच्या वेळेत संगणक शिकायला सांगितले होते. खरेतर ते दुपारी विश्रांती घेतात; पण विश्रांती न घेता ते प्रतिदिन दुपारी २ ते ३ या वेळेत संगणक शिकत असत.’

– श्री. सचिन हाके, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१.२०२२)


सौ. स्नेहा सचिन हाके आणि श्री. हृषिकेश गायकवाड, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. सहनशील : ‘एखाद्या वेळी ताईला काही त्रास झाला, तर ती त्याची वाच्यता करत नाही. त्या वेळी ‘तिच्या त्रासामुळे इतरांचा वेळ जायला नको’, असा तिचा विचार असतो.

२. प्रांजळपणा : ताई स्वतःच्या साधनेची स्थिती आणि चुका यांविषयी प्रांजळपणे सांगते. तिच्या बोलण्यातून तिच्यातील प्रांजळपणा स्पष्ट जाणवतो.

३. नकारात्मक विचारांवर मात करणे : काही वेळा तिच्या मनात नकारात्मक विचार आले, तर त्या वेळी ती संयम ठेवून प्रयत्नपूर्वक त्या विचारांशी लढते.

४. आध्यात्मिक त्रासाशी लढून सेवा करण्याची तळमळ असणे : तिला आध्यात्मिक त्रास होत असला, तरीही ती सतत सेवारत रहाते. काही वेळा सेवा अधिक असल्यामुळे तिला नामजपादी उपाय करणे शक्य झाले नाही, तरी ‘ती सेवेत न्यून पडली’, असे होत नाही.’

(१७.१.२०२२)

साधनेचे ध्येय गाठावे दोघांनी एकमेकांच्या साहाय्याने ।
सोनालीताई (टीप १) असे समजूतदार ।
लवकर संत होऊन ती सर्वांना आनंद देणार ।। १ ।।

भाव अन् गुण यांद्वारे संतांचे मन तिने जिंकले ।
बोलण्यात असे तिच्या प्रांजळपणा हे सहसाधकांनी अनुभवले ।। २ ।।

सकारात्मक राहून आध्यात्मिक त्रासाशी लढतसे ।
शिकण्याच्या स्थितीत राहून साधनेत प्रगती ती करतसे ।। ३ ।।

अनेक सेवा करूनही कर्तेपणा कधी न घेतला ।
प्रत्येक प्रयत्न तिने भगवंताच्या चरणी अर्पिला ।। ३ ।।

साधनेचा आता नवा मार्ग (टीप २) स्वीकारला तिने ।
साधनेत दिला नारायण (टीप ३) समवेत भगवंताने ।। ४ ।।

साधनेचे मार्गक्रमण व्हावे दोघांचेही गतीने ।
साधनेचे ध्येय गाठावे दोघांनी एकमेकांच्या साहाय्याने ।। ५ ।।

टीप १ – चि.सौ.कां. सोनाली गायकवाड
टीप २ – प्रवृत्ती मार्ग
टीप ३ – चि. नारायण पाटील (चि.सौ.कां. सोनाली गायकवाड यांचे भावी पती)

– श्री. हृषिकेश गायकवाड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.१.२०२२)

श्री. जगदीश पाटील आणि श्री. सिद्धेश पुजारी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१. कार्यपद्धतीचे पालन करणे : ‘नारायणदादा कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन करतात.

२. व्यवस्थितपणा : सेवेच्या ठिकाणी आणि अन्य ठिकाणीही त्यांचा व्यवस्थितपणा असतो.

३. राष्ट्र आणि धर्म यांविषयी आदर : दादांना राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रेम आहे. त्यांना समाजातील दुष्प्रवृत्तीविषयी चीड येते.

(१५.१.२०२२)