मुंबईतून कोरोना जाण्यास प्रारंभ !

दैनंदिन रुग्णसंख्या ६ सहस्रांपर्यंत खाली

मुंबई – शहरातील कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ओसरायला लागली असून दैनंदिन रुग्णसंख्या ६ सहस्रांपर्यंत खाली आली आहे. मुंबईत कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बर्‍यापैकी ओसरलेली असेल. फेब्रुवारीमध्ये हा संसर्ग पूर्णपणे अल्प होईल; परंतु राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, असे कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

सध्या कोरोनाचा अधिक संसर्ग चेंबूर (पश्चिम), कुलाबा, वांद्रे (पश्चिम) आणि अंधेरी (पश्चिम) या भागांमध्ये आहे. २१ डिसेंबरपासून कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्या २० सहस्रांपर्यंत गेली होती. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखाच्याही वर गेली होती; परंतु जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख न्यून होत आहे.