१. निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करणारे पू. भाऊकाका !
‘एकदा पू. भाऊकाका (पू. सदाशिव परब) आमच्या घरी आले होते. तेव्हा त्यांना आम्ही एक फळ दिले होते. त्यांनी घरातून निघतांना ते फळ माझ्या हातात दिले आणि सर्वांना खायला देण्यास सांगितले. पू. भाऊकाका भेटल्यानंतर किंवा कधी सेवेनिमित्त त्यांना भ्रमणभाष केला, तर ते कुटुंबातील सर्वांची आणि साधकांचीही आस्थेने विचारपूस करतात. त्यांच्याकडून मला निरपेक्ष प्रेम अनुभवता आले.
२. साधकाला सेवा शिकवून पुढच्या टप्प्याची साधना शिकवणे
पू. भाऊकाका डिचोली, गोवा येथील त्यांच्या घरी रहात असतांना ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करायचे. त्यांनी मलाही ती सेवा शिकवली. ते सकाळी ६.३० वाजता माझ्या घरी यायचे. आम्ही चालत दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरण करत असू. ते वयस्कर असूनही माझ्यापेक्षा जलद गतीने चालायचे. त्यांनी मला ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक कुठे ठेवायचे ?’, हे दाखवले. पू. भाऊकाकांनी मला सांगितले, ‘‘तुला दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा व्यवस्थित जमू लागल्यावर नवीन साधकाला सेवेत सिद्ध करून स्वतः पुढच्या टप्प्याची सेवा करायची.’’
मला त्यांच्यातील ‘गुरुसेवेची तळमळ आणि साधकाला सतत साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जाणे’, हे गुण लक्षात आले.’
– श्री. राहुल वझे, डिचोली, गोवा. (६.१२.२०२१)