एस्.डी.पी.आय. या जिहादी संघटनेच्या धर्मांध नेत्याचा जामीन कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला !

बेंगळुरू येथे ऑगस्ट २०२० मध्ये हिंसाचार घडवल्याचे प्रकरण

ऑगस्ट २०२० मध्ये बेंगळुरूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचे दृश्य

बेंगळुरू – ऑगस्ट २०२० मध्ये पूर्व बेंगळुरूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’चा (‘एस्.डी.पी.आय.’चा) नेता इम्रान अहमद याचा जामीन अर्ज कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला. अहमद याच्या विरोधात प्रविष्ट केलेले आरोपपत्र पहाता त्याच्यावरील आरोप मान्य करण्यात वाजवी कारणे आहेत, असे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने म्हटले आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने अहमद याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अहमद याने कर्नाटक उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज प्रविष्ट केला होता.

१२ ऑगस्ट २०२० मध्ये काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने प्रेषित महंमद पैगंबर यांच्या संदर्भात फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट (लिखाण) प्रसारित केल्यामुळे धर्मांध संतप्त झाले. ते निषेध करण्यासाठी मूर्ती यांच्या निवासस्थानाच्या समोर जमा झाले. त्यानंतर हा जमाव हिंसक झाला आणि त्यांनी श्रीनिवास मूर्ती यांच्या निवासस्थानावर आक्रमण केले. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले होते. हा हिंसाचार एस्.डी.पी.आय.च्या कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याचे सांगण्यात येत होते. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अहमद याला अटक केली होती.