मुंबई – महापालिका क्षेत्रातील ४ सहस्र आरोग्यसेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १७ जानेवारी या दिवशी १ दिवसाचा संप केला. त्यांच्या संघटनेने प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासह कोरोनाबाधितांना शोधून त्यांना रुग्णालयात भरती करण्यासाठी काम या आरोग्यसेविकांनी केले आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वर्ष २०१५ पासून किमान वेतन मिळावे, प्रतिदिन ३०० रुपये कोविड भत्ता देण्यात यावा, भविष्यनिर्वाह निधी आणि निवृत्तीवेतन मिळावे, प्रसूती सुटी आणि इतर सुट्या (रजा) देण्यात याव्यात, ६५ वर्षे वयानंतर निवृत्त आरोग्यसेविकांना ५ सहस्र रुपये निवृत्तीवेतन आणि उपदान त्वरित देण्यात यावे, ५ लाख रुपयांचा गट विमा योजना लागू करावी.
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या मागण्यांसाठी १ दिवसाचा संप करण्यात येणार आहे; परंतु प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पुढे वॉर्ड प्रतिनिधींची समिती बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेईल, अशी चेतावणी प्रकाश देवदास यांनी दिली आहे.