अमेरिकेतील टेक्सास येथे ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर आतंकवाद्याचे आक्रमण !

आतंकवादाच्या सावटाखाली अमेरिका !

  • आतंकवादी सुरक्षायंत्रणांच्या कारवाईत ठार

  • महिला आतंकवादीच्या सुटकेसाठी ४ अमेरिकी नागरिकांना ठेवले ओलीस

वाशिंग्टन – अमेरिकेच्या टेक्सास येथील ज्यूंच्या धार्मिक स्थळावर एका आतंकवाद्याने आक्रमण केले. त्यानंतर त्याने तेथे उपस्थित असलेल्या ४ अमेरिकी नागरिकांना ओलीस ठेवून पाकिस्तानी वंशाची महिला आतंकवादी आफिया सिद्दीकी हिच्या सुटकेची मागणी केली. या ओलिसांमध्ये एका यहुदी धर्मगुरुचाही समावेश होता. काही काळाने त्यांपैकी एकाची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ओलीस ठेवण्यात आलेल्या अमेरिकी नागरिकांची सुटका करण्यात सुरक्षारक्षकांना यश मिळाले आहे. सुरक्षायंत्रणांच्या कारवाईत आतंकवादी ठार झाला आहे.

कोण आहे आफिया सिद्दीकी ?

जिहादी आतंकवादी आफिया सिद्दीकी

अमेरिकेच्या कारागृहात बंद असलेली जिहादी आतंकवादी आफिया सिद्दीकी ही पाकिस्तानी नागरिक असून शास्त्रज्ञ आहे. अमेरिकी सैनिकाला मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. अमेरिकी सुरक्षायंत्रणांनी वर्ष २००८ मध्ये आफियाला अफगाणिस्तानमधून अटक केली होती. त्या वेळी ती न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिज आणि एम्पायर स्टेट बिल्डिंगवर आक्रमणाची योजना आखत होती. ती सध्या टेक्सासच्या फोर्ट वर्थ येथील कार्सवेल येथे ८६ वर्षांची शिक्षा भोगत आहे. तिला ‘लेडी अल कायदा’ म्हणूनही ओळखले जाते. तिच्यावर एफ्बीआय अधिकार्‍याची हत्या केल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे.